शिवसेना-राष्ट्रवादी ‘आमनेसामने’; सत्तेतील दोन पक्षांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे जनता त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 01:45 AM2020-06-28T01:45:48+5:302020-06-28T01:46:09+5:30

ठाणे जिल्ह्यात सेनेचा सर्व बंद करण्याकडे कल । राष्ट्रवादी काँग्रेसचे अनलॉकचे आदेश

Coronavirus: Shiv Sena vs NCP; conflicting roles of the two parties in power | शिवसेना-राष्ट्रवादी ‘आमनेसामने’; सत्तेतील दोन पक्षांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे जनता त्रस्त

शिवसेना-राष्ट्रवादी ‘आमनेसामने’; सत्तेतील दोन पक्षांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे जनता त्रस्त

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील बहुतांश महापालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता असल्याने कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्याकरिता वेगवेगळ्या भागांत बंद करण्याकडे सेनेचा कल आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडील खात्यांनी घरकाम कामगारांना घरी येऊ देण्याचे, वृत्तपत्र वितरणास विरोध करणाऱ्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत. एकाच महाविकास आघाडी सरकारमधील दोन पक्षांची ही परस्परविरोधी भूमिका नागरिक, व्यापारी, उद्योजक यांना खटकत आहे.

ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ वगैरे परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंटेनमेंट झोनमध्ये निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागातील अलीकडेच सुरू झालेली दुकाने बंद केली आहेत. शिवाय, ज्या इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत, त्या इमारतीमधील रहिवाशांना घराबाहेर पडण्यास बंदी केली आहे.

कंटेनमेंट झोनमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. कोरोनाला अटकाव करण्यात अपयश आले, रुग्ण प्रचंड वाढले व मोठ्या संख्येने मृत्यू झाले तर त्याचा परिणाम येणाऱ्या महापालिका निवडणुकांत भोगायला लागेल, याची भीती वाटत असल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांची बैठक घेऊन व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला.

त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे अनलॉककरिता आग्रही आहेत. गेले तीन महिने बंद असलेली सलून उद्या रविवारपासून सुरू करण्याचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापोटी सरकारने घेतला. मात्र, ठाणे जिल्ह्यात उद्यापासून सलून सुरू होणार किंवा कसे, याबाबत साशंकता आहे. राष्ट्रवादीकडील सहकार खात्याने शुक्रवारीच आदेश काढून घरकाम कामगारांना कामावर येण्यापासून रोखल्यास कारवाई करण्याचा इशारा देणारे आदेश जारी केले. ठाणे जिल्ह्यातील ज्या सोसायट्या वृत्तपत्र वितरकांना प्रवेश देत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही राष्ट्रवादीच्या पुढाकाराने दोन दिवसांपूर्वी निघाले आहेत. त्यामुळे आता यापैकी कायकाय ठाणे जिल्ह्यातील महापालिकांच्या हद्दीत सुरू होणार, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.

ठाण्यात आरोग्य व्यवस्था बरीच कमकुवत
मुंबईच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बरीच कमकुवत असल्याने कोरोनाचे गांभीर्य कमालीचे वाढले आहे. वर्षानुवर्षे ठाणे जिल्ह्यात सत्ता करूनही शिवसेनेने आरोग्य व्यवस्था भक्कम करण्याकरिता काडीमात्र प्रयत्न केले नसल्याचे परिणाम आता नागरिकांना भोगावे लागत आहेत. मात्र, सत्ताधाºयांना त्याच्या राजकीय परिणामांची भीती सतावत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते खासगीत बोलू लागले आहेत.

Web Title: Coronavirus: Shiv Sena vs NCP; conflicting roles of the two parties in power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.