Coronavirus : राज्यातील कोरानाचा आकडा 33 वर, पुण्यात आणखी एक रुग्ण आढळला 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 08:28 PM2020-03-15T20:28:06+5:302020-03-15T20:47:49+5:30

Coronavirus : आज संध्याकाळी पिंपरी-चिंचवडमधील एका व्यक्तीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Coronavirus: one more corona positive patient in pune, 33 patient in Maharashtra rkp | Coronavirus : राज्यातील कोरानाचा आकडा 33 वर, पुण्यात आणखी एक रुग्ण आढळला 

Coronavirus : राज्यातील कोरानाचा आकडा 33 वर, पुण्यात आणखी एक रुग्ण आढळला 

Next
ठळक मुद्दे पिंपरी-चिंचवडमधील एका व्यक्तीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.आतापर्यंत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 33 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी मुंबईतील कस्तुरबा गांधी रूग्णालयाची पाहणी केली.

मुंबई : राज्यातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी कोरोनाच्या नवीन 2 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 33 वर पोहोचली आहे. 

आज संध्याकाळी पिंपरी-चिंचवडमधील एका व्यक्तीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पिंपरी चिंचवडमधील ही व्यक्ती जपानला जाऊन आली होती. त्या व्यक्तीची 14 मार्चला तपासणी करण्यात आली या तपासणीत त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात करोनाचे एकूण 16 रुग्ण झाले आहेत. तर राज्यातील हा आकडा 33 वर पोहोचला आहे. याआधी औरंगाबादमधील 59 वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे आज सकाळी समोर आले. रशिया व कझाकिस्तानचा प्रवासकरून ही महिला भारतात परतली आहे. सध्या औरंगाबादेतल्या धूत रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  

पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे शहरातील सर्व सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आता शहरातील काही भागांमध्ये जमावबंदी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून विचार सुरु आहे. आत्तापर्यंत परदेशातून आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. परंतु या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या इतर पाच नागरिकांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता प्रशासन विविध उपायांचा अवलंब करत असून पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर तसेच तालुक्यांच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कोविड -19 उपाययोजना अधिसूचना लागू झाल्याने आवश्यकता भासल्यास विलगीकरणासाठी खाजगी रुग्णालयातील बेडस् अधिग्रहित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबई येथील कस्तुरबा गांधी रूग्णालयाच्या प्रयोगशाळेमध्ये चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी बुधवारपासून यंत्रणा कार्यान्वित होणार असून येथे दिवसाला 350 चाचण्या करता येतील. यासोबतच के.ई.एम. रुग्णालयात दिवसाला 250 चाचण्या होतील अशी यंत्रणा सुरु करण्यात येणार आहे. सोबतच 15 ते 20 दिवसात जे.जे. रुग्णालय, हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुणे येथील बीजे महाविद्यालयात चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

Coronavirus: Instructions from the state govt to postpone MPSC exams, Health Minister information rkp | Coronavirus : MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारकडून सूचना, आरोग्यमंत्र्यांची माहिती

राज्यातील शाळा, महाविद्यालये, मॉल यासोबत आता पुरातन वस्तू संग्रहालये बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलाव्यात, असे आयोगाला कळविण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.  संशयित रूग्णांच्या चाचण्यांसाठी येत्या काही दिवसात राज्यभरातील धुळे, औरंगाबाद, मिरज, सोलापूर या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि संसर्ग टाळण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून पुरेशी खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत. गरजेनुसार प्रवास करण्याचे आणि अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन वारंवार नागरिकांना केले जात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक ठिकाणी निजर्तुंकीकरण करण्याकरिता संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये आवश्यकता भासल्यास कोरोनाच्या रूग्णांवर उपचारासाठी 450 व्हेंटिलेटर स्वतंत्ररित्या ठेवण्यात आले आहेत. गरज पडल्यास खाजगी रूग्णालयाकडून व्हेंटिलेटर घेण्यात येतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. 

राज्यात 13 मार्च 2020 पासून साथरोग अधिनियम कायदा 1897 लागू करण्यात आला असून त्यानुसार या अधिनियमाच्या खंड 2, 3 व 4 नुसार महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम 2020 ही अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.  या अधिनियमानुसार कोविड -19 उद्रेक प्रतिबंध व नियंत्रणासाठी आयुक्त, आरोग्य सेवा, संचालक आरोग्य सेवा, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त हे सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रात या उद्रेक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी त्यांना विशेषाधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. 

या अधिसूचनेनुसार, 

1. या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या सरकारी व खाजगी रुग्णालयात अलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येईल. 

2. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने प्राधिकृत केलेल्या प्रयोगशाळांमध्येच कोविड 19 या आजाराचे निदान करणे आवश्यक राहील.

3. 14 दिवसाचे घरगुती अलगीकरण किंवा अलगीकरण कक्षातील अलगीकरण हे नियमानुसार आवश्यक असून या सूचना न पाळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे अधिकार सक्षम अधिकाऱ्याला राहतील.

4. कोविड-19 या आजारासंदर्भात चुकीची माहिती अथवा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध अथवा प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना अंमलबाजावणीमध्ये अडथळा आणणाऱ्या व्यक्तीविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकारही या अधिसूचनेनुसार सक्षम अधिकाऱ्याला प्रदान करण्यात आले आहेत. 

5. एखाद्या भौगोलीक क्षेत्रात उद्रेक आढळून आल्यास हे क्षेत्र प्रतिबंधित करणे अथवा  उद्रेक नियंत्रणासाठी इतर आवश्यक निर्बंध घालणे इ. अधिकार सक्षम अधिकाऱ्याला राहतील.

 

Web Title: Coronavirus: one more corona positive patient in pune, 33 patient in Maharashtra rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.