CoronaVirus News: रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होण्यास १५ एप्रिल उजाडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 03:42 AM2021-04-09T03:42:12+5:302021-04-09T07:19:59+5:30

CoronaVirus News: अनेक खासगी रुग्णालयांनी गरज नसताना रुग्णांची बिले वाढवण्यासाठी हे इंजेक्शन देणे सुरू केले. त्यामुळे सगळीकडेच रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे

CoronaVirus News: remdesivir supply will be restored on April 15 | CoronaVirus News: रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होण्यास १५ एप्रिल उजाडणार

CoronaVirus News: रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होण्यास १५ एप्रिल उजाडणार

Next

- अतुल कुलकर्णी

मुंबई : पहिली लाट ओसरल्यानंतर देशातील सातही कंपन्यांनी डिसेंबर २०२० मध्ये रेमडेसिवीरचे उत्पादन थांबवले आणि अचानक मोठ्या प्रमाणात दुसरी लाट आली. त्यातही अनेक खासगी रुग्णालयांनी गरज नसताना रुग्णांची बिले वाढवण्यासाठी हे इंजेक्शन देणे सुरू केले. त्यामुळे सगळीकडेच रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे लोकमतशी बोलताना म्हणाले, ‘‘या कंपन्यांनी डिसेंबर अखेरीस उत्पादन थांबवले होते; पण आता त्यांनी ते पुन्हा सुरू केले आहे. सध्या महाराष्ट्राला दररोज ५० ते ६० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिली जात आहेत आणि त्यांचा खपदेखील रोज तेवढाच आहे.’’ आता नवीन उत्पादनास सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात ते बाजारात जास्तीत जास्त उपलब्ध होण्यासाठी १५ ते २० एप्रिल उजाडेल; मात्र खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिवीरचा गैरवाजवी वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

सरकारी कोविड सेंटर्स किंवा सरकारी रुग्णालयात टास्क फोर्सच्या शिफारशीनुसार उपचार केले जात आहे. इंजेक्शन वापरण्याची उपचार पद्धती ठरवून देण्यात आलेली आहे; मात्र खासगी रुग्णालये स्वत:चे बिल वाढवण्यासाठी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. गरज नसतानाही याचा वापर होत आहे, तो थांबवला गेला तर परिस्थिती नियंत्रणात येईल. ही नफेखोरीची वेळ नाही. ज्यादा बिल आकारणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.   
- राजेंद्र शिंगणे, मंत्री, अन्न व औषध प्रशासन.

सरकारी इस्पितळात तुटवडा नाही
रेमडेसिवीरची मागणी राज्य सरकार करत नाही. सरकारी इस्पितळासाठी त्याचा दर करार करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी इस्पितळात तुटवडा नाही. खासगी रुग्णालय व दुकानदारांना कंपन्यांच्या वतीने पुरवठा होतो. त्याठिकाणी तुटवडा आहे, असेही काळे यांनी स्पष्ट केले.

रेमडेसिवीरचा वापर कोणत्या ठिकाणी किती हाेत आहे...
जिल्हा             सरकारी रुग्णालय    खासगी रुग्णालय 
राज्य              रुग्ण    रेमडेसिवीर    रुग्ण    रेमडेसिवीर
नागपूर           १५२६    ४९०    २४३७    २५९८
अकोला           २३९    १०७    ३११    २६८
यवतमाळ         ३८०    १२३    ३३१    ३५०
अमरावती         २३२    ८०    ४९३    ५००
सातारा             ४४५    ३५६    २३९    १९२
सांगली            २६८    २१४    २८९    २३२
सोलापूर          २२८९    १८३१    ३८३५             ३०६८
कोल्हापूर          २६१    २०९    ८२५    ६६०
नंदूरबार             २७०    २००    ६३०    ७००
एकूण             ५९१०    ३६१०            ९३९०    ८५६८

गुरुवारची रेमडेसिवीरची रूग्णालयातील स्थिती
विभाग    शासकीय     खासगी      एकूण
अमरावती    १५,१५२    ३२९५    १८,४४७
औरंगाबाद    ३६,३३२    १०,३५५    ४६,६८७
नागपूर    ०००    ८४०२    ८४०२
पुणे    १०,९०४    १६,४२१    २७,३२५
नाशिक    ९७०३    ३००५    १२,७०८
मुंबई    १०,५९१    ४८१६    १५,४०७
ठाणे    १४,०१२    ३१३०    १७,१४२

रेमडेसिवीरसाठी का लागत आहेत रांगा?
राज्यातल्या सरकारी रुग्णालयात हे इंजेक्शन उपलब्ध आहे. तेथे टास्क फोर्सच्या पद्धतीनुसार दिले जात आहे. दुसरी लाट आली आणि रुग्ण वाढू लागल्यामुळे खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्ण स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली. त्यांच्याकडे स्वत:चे मेडिकल स्टोअर नाही, त्यामुळे त्यांनी हे इंजेक्शन बाहेरुन आणा, असे सांगितले. 
ज्या खासगी रुग्णालयात स्वत:चे मेडिकल स्टोअर्स होते त्यांनी मर्यादित स्टॉक आहे, असे सांगत रुग्णांच्या नातेवाइकांनाही बाहेरुन इंजेक्शन घेऊन या, असे सांगणे सुरू केले. ज्यांनी ज्यादा पैसे देण्याची तयारी दर्शवली त्यांना खासगी रुग्णालयात हे इंजेक्शन मिळत आहे. परिणामी, राज्यभर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत.

Web Title: CoronaVirus News: remdesivir supply will be restored on April 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.