विशेष लेखः ...म्हणे महाराष्ट्राने मृत्यू लपविले; एकदा नक्की पाहा हे आकडे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 01:08 PM2021-06-15T13:08:26+5:302021-06-15T13:10:06+5:30

Coronavirus Deaths in Maharashtra: स्वाईन फ्ल्यूचे मागील १२ वर्षांचे आकडे एकीकडे आणि कोविडचे केवळ एका दिवशीचे आकडे एकीकडे अशी परिस्थिती आहे. प्रचंड मोठ्या आकडेवारीचे संकलन आपली यंत्रणा करते आहे.

Coronavirus in Maharashtra: State has reported all covid deaths, not hiding numbers | विशेष लेखः ...म्हणे महाराष्ट्राने मृत्यू लपविले; एकदा नक्की पाहा हे आकडे!

विशेष लेखः ...म्हणे महाराष्ट्राने मृत्यू लपविले; एकदा नक्की पाहा हे आकडे!

Next

>> डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी

सध्या महाराष्ट्राने कोविड १९ आजाराचे मृत्यू लपविले अशी चर्चा काही माध्यमे करत आहेत. यावर काय बोलावे तेच कळत नाही. म्हणजे बघा भारतातील प्रत्येक पाचवा कोविड रुग्ण महाराष्ट्राने रिपोर्ट केला आहे. देशात या आजाराने झालेले एकूण मृत्यू ३.६१ लाख त्यापैकी १.०५ लाख महाराष्ट्रातील. म्हणजे देशातील प्रत्येक तिसरा मृत्यू महाराष्ट्राने रिपोर्ट केला आहे. देशातील सर्वाधिक मृत्यू आपल्या राज्याने रिपोर्ट केले, ही काही अभिमानाने सांगावी अशी बाब नाही. पण आपले रिपोर्टिंग इतर अनेक राज्यांच्या तुलनेत चांगले आहे, पारदर्शक आहे, हे यातून समजायला हरकत नाही. साथरोगशास्त्रातील एक महत्त्वाचा सिद्धांत आहे – तुमची समस्या नेमकी मोजा, तुमचे निम्मे उत्तर त्यात दडले आहे. आणि हे लक्षात घेऊनच आपण आपली सर्वेक्षण व्यवस्था अधिकाधिक बळकट करण्याचा प्रयत्न करत असतो.

काही तुलनात्मक बाबी पाहू…

>> युपी सारखे महाराष्ट्राच्या जवळपस दुप्पट लोकसंख्या असणारे राज्य २१,५९७ मृत्यू रिपोर्ट करते. याच्यापेक्षा अधिक मृत्यू मुंबई -ठाण्याने रिपोर्ट केले आहेत.

>> ७ कोटीहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या गुजरातने पुण्यापेक्षाही कमी मृत्यू रिपोर्ट केले आहेत.

>> पूर्ण ओरिसा राज्यापेक्षा अधिक मृत्यू अहमदनगर जिल्ह्याने रिपोर्ट केले आहेत.

>> नाशिकने रिपोर्ट केलेले मृत्यू आसाम आणि तेलंगणापेक्षा अधिक आहेत.

>> नागपूर – चंद्रपूर पेक्षा कमी मृत्यू मध्यप्रदेश राज्याने रिपोर्ट केले आहेत.

>> आणि बिहारने रिपोर्ट केलेले मृत्यू फार फार तर ठाण्याएवढे आहेत.

आणि तरीही काही जणांना वाटते, महाराष्ट्राने मृत्यू लपविले आहेत. आपण काही गोष्टी लक्षातच घेत नाही. कोविड पॅंडेमिक ही एक अभूतपूर्व घटना आहे. स्वाईन फ्ल्यूचे मागील १२ वर्षांचे आकडे एकीकडे आणि कोविडचे केवळ एका दिवशीचे आकडे एकीकडे अशी परिस्थिती आहे. प्रचंड मोठ्या आकडेवारीचे संकलन आपली यंत्रणा करते आहे. हे काम कशा पद्धतीने चालते, हे थोडे समजून घेतले तर त्यातील बारकावे लक्षात येतील.

भारत सरकारने कोविड डेटा गोळा करण्यासाठी दोन पोर्टल उपलब्ध करून दिली आहेत. सी व्ही ऍनालिटिक्स आणि कोविड पोर्टल. या शिवाय कोविड निदान करणा-या प्रयोगशाळांसाठी आर टी पी सी आर ऍप आणि कोविड रुग्णांवर उपचार करणा-या रुग्णालयांसाठी फॅसिलिटी ऍप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पण अनेकदा एक एक प्रयोगशाळा दिवसाला दोन दोन हजार तपासण्या करते पण त्या दोन हजार जणांची एंट्री त्याच दिवशी करणे अनेकदा प्रयोगशाळेला शक्य नसते. आणि जोवर प्रयोगशाळा पोर्टलवर एखाद्या व्यक्तीची माहिती भरत नाही तोवर तो रुग्ण पोर्टलवर दिसत नाही मग त्याचे पुढे काय झाले ही माहिती भरायलाही अडचण येते.

तीच गोष्ट हॉस्पिटलची ! आता मागच्या एप्रिल – मे मध्ये तर हॉस्पिटल ओसंडून वाहत होती. रुग्णालये उपचार, ऑक्सिजन, बेड व्यवस्थापन यात गुंतलेली. फ़ॅसिलिटी ऍपवर रुग्णांची माहिती त्या त्या दिवशी अपडेट होणे निव्वळ अशक्य ! कारण प्राधान्य प्रत्यक्ष उपचाराला देणे आवश्यकच असते.  जेव्हा लाट प्रचंड वेगात सुरु होती तेव्हा अनेक रुग्णालयांनी मॅन्युअल रॅपिड ऍंटीजन टेस्ट रिपोर्ट वर पेशंट भरती केले पण त्यांची पोर्टलवरील एंट्री राहिली. काही ठिकाणी रिपोर्टींग करणारी माणसेच स्वतः पॉझिटिव्ह आली. अशी एक ना अनेक कारणे ! आणि शिवाय ही पोर्ट्ल किंवा ऍप अगदी सुरळीतपणे चालत आहेत, असे नव्हे. त्यांच्यातही अनेक तांत्रिक त्रुटी निर्माण होतात. लॅबचा डेटा कोविड पोर्टलवर सिंक्रोनाईझ व्हायला काही काळ लागतो. या सगळयामध्ये काही पेशंटची एंट्री मागे राहते. ती उशीरा होते. मृत्य़ूबाबतही असे होते. पण आपण हे सारे मृत्यू कितीही जुने असले तरी त्यांची माहिती घेऊन ते पोर्टलवर अपडेट करतो आहोत. अगदी मागच्या १५ दिवसात अशा आठ हजारांहून अधिक मृत्यूंचा समावेश करण्यात आला आहे आणि ही प्रक्रिया सुरुच आहे. मृत्यू त्या त्या दिवशी रिपोर्ट होत नाहीत, याला ही अशी अनेक कारणे आहेत. आपण त्यामागील अपरिहार्यता समजून घेतली आणि ही प्रलंबित माहिती अद्ययावत करण्यासाठी यंत्रणेने केलेले प्रयत्न लक्षात घेतले तर सारेच उमजेल. उमजेल की यंत्रणा हे मृत्यू लपवत नाही आहे, हे मृत्यू उशीरा रिपोर्ट होताहेत ! पण मृत्यू उशिरा रिपोर्ट होणे ही असते वस्तुस्थिती आणि मृत्यू लपविले, हा असतो आरोप ! यातील गुणात्मक फरक लिहणाऱ्या–वाचणाऱ्या माणसाला तरी कळायला हवा.

मुळात या कोविड महामारीमध्ये महाराष्ट्र खूप पोळला आहे. खूप जणांनी आपली जवळची माणसे गमावली आहेत. डॉक्टर्स गेले आहेत, नर्सेस गेल्या आहेत, पोलिसांनी आपले प्राण गमावले आहेत, पत्रकार गेले आहेत, राजकारणी गेले आहेत. लाखभर माणसं जाणं ही सामाजिक शोकांतिका असते. खूप क्लेषकारक असते दोस्त, मृत्यूचा असा जाहीर हिशोब देणे. या जवळच्या माणसांचं जाणं टाळता आले असते तर किती बरे झाले असते पण असे झाले नाही. आता ही माणसं हरवल्याची नोंद लपवून काय होणार आहे ? या प्रत्येक माणसाला अखेरचा निरोप देताना महाराष्ट्राच्या डोळ्यांत आसू उमटले आहेत. महाराष्ट्राने मृत्यू लपविले नाहीत, या प्रत्येक मृत्यूसोबत डोळ्यात येणारे अश्रू मात्र नक्कीच लपविले आहेत आणि या वैराण काळात पुन्हा पुन्हा खंबीरपणे उभा राहायचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Coronavirus in Maharashtra: State has reported all covid deaths, not hiding numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.