CoronaVirus Lockdown News: ‘मिनी लॉकडाऊन’ विरोधात राज्यातील व्यापारी रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 01:22 AM2021-04-07T01:22:37+5:302021-04-07T06:59:15+5:30

दुकाने बंद ठेवण्यास विरोध; प्रशासनाने दिशाभूल केल्याचा आरोप

CoronaVirus Lockdown News: Traders on the streets of the state against 'Mini Lockdown' | CoronaVirus Lockdown News: ‘मिनी लॉकडाऊन’ विरोधात राज्यातील व्यापारी रस्त्यावर

CoronaVirus Lockdown News: ‘मिनी लॉकडाऊन’ विरोधात राज्यातील व्यापारी रस्त्यावर

Next

नागपूर/औरंगाबाद/पुणे : सरकारने अंशतः लॉकडाऊन जाहीर केले आणि प्रत्यक्षात ‘ब्रेक द चेन’ च्या नावाखाली संपूर्ण लॉकडाऊन लागू केल्याचा आरोप करीत राज्यात ठिकठिकाणच्या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांची दिशाभूल केली आहे. २५ दिवस दुकाने बंद ठेऊन कसे जगायचे असा संतप्त प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. हा ‘ब्रेक द चेन’ व्यावसायिकासाठी ‘ब्रेक द लाईफ’ ठरू शकतो, अशा प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या.

मराठवाडा : दुकाने बंद, पण नाराजी
औरंगाबाद : अंशतः लॉकडाऊन म्हटल्याने नेहमी प्रमाणे दुकाने उघडी राहतील, या विचाराने व्यापारी गाफील होते. पण जिल्हा प्रशासनाने रात्रीतून निर्णय बदलला होता. जालना जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी सकाळी दुकाने उघडली होती. परंतु, दुपारी पोलिसांनी शहरात फिरून सर्व दुकाने बंद केली. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सायंकाळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली नाराजी व्यक्ती केली. 

पश्चिम महाराष्ट्र : सरकारला दोन दिवसांची मुदत
पुणे : आम्ही दोन दिवस वाट पाहणार आहोत, दरम्यान मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती करू, ऐकले तर ठीक, अन्यथा निर्णय घ्यावाच लागेल असा इशारा पुणे शहर व्यापारी महासंघाने दिला आहे. महापालिका एक सांगते, मग राज्य सरकार दुसराच आदेश काढते, अशा शब्दांत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ॲड. फत्तेचंद रांका यांनी बंदच्या आदेशाविषयी संताप व्यक्त केला. कोल्हापुरातील व्यावसायिकांनी दुकाने सुरू ठेवली. साताऱ्यात व्यापाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. सांगलीत सलून वगळता इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स, झेरॉक्स सेंटर, बुक सेंटर, हॉटेल, मॉल वजा छोटे बझार दिवसभर सुरू होते. 

विदर्भ : व्यापाऱ्यांत असंतोष
नागपूर : व्यापारी आणि दुकानदारांनी संभ्रावस्थेत लॉकडाऊन पाळला, मात्र या निर्णयाविरोधात सर्वत्र संताप दिसला. काही दुकानदारांनी दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला. बुलडाण्यात विविध संघटना व व्यापाऱ्यांमधून विरोध होत आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे बुलडाण्यात रास्ता रोको करण्यात आला. 

Web Title: CoronaVirus Lockdown News: Traders on the streets of the state against 'Mini Lockdown'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.