Corona Vaccination: लसीकरणाला टंचाईची बाधा; राज्यातील अनेक केंद्रांवर तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 02:02 AM2021-04-09T02:02:05+5:302021-04-09T07:25:45+5:30

Corona Vaccination: सरासरी दोन दिवसांचा साठा उपलब्ध

Corona Vaccination Shortage of vaccine in many vaccination centers in maharashtra | Corona Vaccination: लसीकरणाला टंचाईची बाधा; राज्यातील अनेक केंद्रांवर तुटवडा

Corona Vaccination: लसीकरणाला टंचाईची बाधा; राज्यातील अनेक केंद्रांवर तुटवडा

Next

मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी देशभर लसीकरणावर भर दिला जात असताना, राज्यात मात्र मुंबईसह अनेक जिल्ह्यांत सध्या कोरोना लसींचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ‘लोकमत’च्या चमूने गुरुवारी राज्यांतून सर्व जिल्ह्यांतील प्रशासनाकडून घेतलेल्या माहितीत गोंदिया आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात लस उपलब्ध नसल्याचे आढळले, तर मुंबईत केवळ एक दिवसाच्या ६३,३३० हजार लस उपलब्ध असल्याचे चित्र समोर आले. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरी केवळ दोन दिवस पुरेल एवढाच साठा उपलब्ध आहे.

लसींवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप आणि राजकारण तापले असताना सर्वसामान्यांना मात्र लस कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ठाणे जिल्ह्यात सव्वा लाख, कोकणात रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात ९ हजार लस शिल्लक आहेत. कोरोनाचा मोठा संसर्ग असलेल्या पुणे जिल्ह्यात ४२,४८९, नागपूरमध्ये ३५ हजार, नाशिकला ९० हजार लस शिल्लक आहेत.जे. जे. रुग्णालयात शुक्रवारी लसीचे डोस संपतील, 
अशी भीती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी व्यक्त केली. अन्य खासगी रुग्णालयांतील केंद्रांवर लस नसल्याने अनेक लाभार्थ्यांनी नायर रुग्णालयात गर्दी केली होती. 

जास्तीत जास्त लसीकरणासाठी रविवारपासून देशभरात ‘लसाेत्सव’; पंतप्रधान माेदींचे आवाहन
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ११ ते १४ एप्रिल या कालावधीत देशभरात ‘लसाेत्सव’ साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले. ‘लसाेत्सव’ साजरा करून जास्तीत जास्त पात्र व्यक्तींचे लसीकरण करावे. एकही लस वाया जाऊ न देण्याची शपथ घेऊ, असेही पंतप्रधान म्हणाले. तरुण आणि सेलिब्रिटींनी पुढाकार घेऊन याबाबत जनजागृती करावी तसेच नियमांचे पालन करावे, असे माेदी म्हणाले. माेदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसाेबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते म्हणाले की, चाचण्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. दुसरी लाट थाेपविण्यात लवकरच यश मिळेल.

जादा लस, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरही द्या; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी
संपूर्ण देश कोरोनाशी लढत असताना महाराष्ट्र या लढ्यात मागे नव्हता आणि मागे राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून, आणखीही वाढविण्यात येत आहेत. आता केंद्राने लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सिजन सिलिंडर तसेच व्हेंटिलेटरदेखील उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.

गैरकारभार, नाचक्कीतून लसीचे राजकारण : देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारचा फक्त गैरकारभार सुरू असून त्यातच न्यायालयीन प्रकरणात सरकारचे पुरते वाभाडे निघत असल्याने त्यापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी केंद्राच्या नावाने खडे फोडत लसीकरणाचे राजकारण राज्य सरकार करीत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली.

महाराष्ट्राला ४० लाख डोस हवेत, देणार फक्त १७ लाख - राजेश टोपे
राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी दर आठवड्याला ४० लाख डोस देण्याची मागणी राज्याने केंद्र शासनाला केली आहे. मात्र, त्याला प्रतिसाद देताना केंद्राकडून गुरुवारी फक्त १७ लाख ४३ हजार डोस पाठविण्यात येतील, असे कळवल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लसपुरवठा अडचणीत?  
काेराेनाविराेधातील लसी पुरवठ्यात काही अडथळे निर्माण हाेण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि युराेपने लसीसाठी अतिशय आवश्यक असलेल्या कच्च्या मालाचा पुरवठा थांबविल्याची माहिती ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे सीईओ अदर पूनावाला यांनी दिली आहे. 

लस वाटपात केंद्र सरकारचा पक्षपात
ज्या महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे त्या राज्याला कोरोना लसीचे १७ लाख ४३ हजार २८० डोस तर ज्या गुजरातची लोकसंख्या ६ कोटी आहे त्या राज्याला मात्र १५ लाख ५७ हजार ८७० डोस येत्या पाच दिवसात मिळणार आहेत. केंद्र सरकारचा लस वाटपातील हा पक्षपात केवळ महाराष्ट्रापुरता नाही. भाजपशासित राज्यांना अधिक तर अन्य राज्यांना कमी लस देण्यात येत आहेत. यासंदर्भातील बोलकी आकडेवारीच समोर आली आहे.   

...तर लसीकरणाचा वेग मंदावेल
राज्यात १२ जानेवारीपासून १ कोटी ६ लाख २३ हजार ५०० कोरोना प्रतिबंधक लसींच्या डोसचा पुरवठा केंद्राने केला. आता राज्यात लसीचा साठा नाही. नव्याने लसींचा पुरवठा कधी होणार, याची निश्चित माहितीही नाही. राज्यात लसीकरणाचा वेग वाढविला आहे. नागरिकही लसीकरणाला प्रतिसाद देत आहेत. केंद्रांची संख्याही वाढविली आहे. त्या प्रमाणात लसींचा पुरवठा झाला पाहिजे. काही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस पुरेल इतक्याच लसींचा साठा आहे. त्यामुळे पुढील ७२ तासांनंतर राज्यात लसीकरणाचा वेग मंदावेल.
- डॉ. दिलीप पाटील, राज्य लसीकरण अधिकारी

Web Title: Corona Vaccination Shortage of vaccine in many vaccination centers in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.