Congress, NCP's culture is the root of looting: Sadabhau Khot | काँग्रेस, राष्ट्रवादीची संस्कृतीच मुळात लुटारु वृत्तीची : सदाभाऊ खोत यांचा घणाघाती आरोप 

काँग्रेस, राष्ट्रवादीची संस्कृतीच मुळात लुटारु वृत्तीची : सदाभाऊ खोत यांचा घणाघाती आरोप 

ठळक मुद्देकेंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधयेकाचे गुढी उभारुन स्वागत

पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विधेयकामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र काही ऐतखाऊ बांडगुळे याला विरोध करत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी विरोध केला कारण त्यांची संस्कृतीच मुळात लुटारु वृत्तीची आहे. असा आरोप रयत क्रांती संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. 
   तालुका हवेली, सोरतापवाडी गावात, केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाचे गुढी उभारुन स्वागत करण्यात आले. फुलांची उधळण करत बैल गाडीतुन बळीराजाची मिरवणुक काढण्यात आली. त्यावेळी  माजी मंत्री खोत बोलत होते. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, गणेश भेगडे , भानुदास शिंदे, प्रदीप कंद,  सुदर्शन चौधरी, प्रदीप कंद, आदी उपस्थित होते. 
   
माजी मंत्री खोत म्हणाले की, कृषी सुधारणा विधेयक मंजूर झाल्याने इडापीडा टळून बळीचे राज्य येणार आहे. ही मागणी अनेक वर्षांपासून स्व. शेतकरी नेते शरद जोशी करीत होते. या मागणीला यश आले आहे. कसायांच्या हातात शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. शेतकऱ्यांना आता मुक्तपणे शेतमाल विकता येणार आहे.  शेतकऱ्याला त्याचा माल मार्केट आवाराच्या बाहेर विकण्याचा अधिकार मिळाला आहे. विदेशी गुंतवणूक होणार आहे.  मार्केट कमिट्या बंद  होणार नाहीत. तसेच मार्केट कमिटीमध्येच शेतमाल विकण्यासाठी जावे लागत होते. आता मात्र शेतकऱ्यांना मालाची मार्केट आवाराच्या बाहेर विक्री करता येणार आहे. पूर्वी शेतमाल साठवण्यासाठी बंदी होती त्यावर कारवाई होत असे. त्यामुळे व्यापाऱ्याचा फायदा होत होता. आता यात बदल होऊन शेतमालाला चढा भाव मिळेल. 

 पुढे खोत म्हणाले की , गावागावात शेतकऱ्यांचा समूह गट स्थापन होईल. त्यामुळे प्रभावी व्यवस्था निर्माण होईल. कॉर्पोरेट कंपन्या शेत मालासाठी करार करतील. त्यामुळे मालाची किंमत पेरणी आधीच शेतकऱ्यांना समजेल. करारात काही झाले तरी कंपनीला शेतकऱ्यांच्या जमिनी घेता येणार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांच्या नरड्यावर पाय ठेवायला कोणी येत असेल तर त्याला धडा शिकवला पाहिजे. अनेकदा राजकीय नेत्याला मंत्री पद नको पण पुण्याचे किंवा मुबंईचे मार्केट कमिटी द्या अशी मागणी काहीजण करत असतात. अन काही दिवसांत सोन्याकडे हातात घालून फिरतात. फक्त लुटायचा धंदा सुरू आहे. 

............
राजू शेट्टी म्हणजे चाकरगडी
  या विधेयकाला स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विरोध केला आहे असे विचारले असता, शेट्टी नेमके शेतकऱ्यांचे नेते आहेत की दलालांचे हे त्यांनी तपासून बघितले पाहिजे. ते  काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची चाकरी करत आहेत. त्यामुळे चाकरी करणाऱ्या गड्यावर मी जास्त बोलू इच्छित नाही. अशा त्यांनी शब्दांत शेट्टी यांना उत्तर दिले.

शरद पवारांचा विरोध असेल तर स्वागतच 
 माजी कृषी मंत्री व खासदार शरद पवार यांचा जर या विधेयकाला विरोध असेल तर स्वागत करायला हवे. एका सदनात विरोध करायचा आणि दुसऱ्या सदनात अनुउपस्थित राहून समर्थन करायचे. त्यांचे नेतृत्व मुळातच बिनभरवशाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खरा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांनी बळीराजासाठी शेतात सोन्याचा नांगर फिरवला होता. 
 
मार्केट कमिट्यांना स्पर्धा करावी लागणार
 यात एक कोणतीही कार्पोरेट कंपनी येणार नाही तर अनेक कंपनी शेतकऱ्यांसोबत करार करतील. यामुळे स्पर्धा वाढणार आहे. करार शेतीमुळे मालाचा भाव वाढेल.  यामुळे आत्महत्या थांबतील. एकदा शेतीत मध्ये मोठ्या प्रमाणार गुंतवणूक आली तर शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Congress, NCP's culture is the root of looting: Sadabhau Khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.