'काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट'; विलासरावांच्या व्हिडिओद्वारे अशोक चव्हाणांची ममता बॅनर्जींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 01:24 PM2021-12-02T13:24:31+5:302021-12-02T13:27:05+5:30

'काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरंही जात नाही.'

'Congress moves like an elephant straight and direct'; Ashok Chavan criticizes Mamata Banerjee through Vilasrao Deshmukh's video | 'काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट'; विलासरावांच्या व्हिडिओद्वारे अशोक चव्हाणांची ममता बॅनर्जींवर टीका

'काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट'; विलासरावांच्या व्हिडिओद्वारे अशोक चव्हाणांची ममता बॅनर्जींवर टीका

googlenewsNext

मुंबई: नुकतच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांचीही भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि नेतृत्वार जहरी टीका केली. ममतांची टीका अनेक काँग्रेस नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ममतांवर एका व्हिडिओद्वारे टीका केली आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विटरवर काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओद्वारे त्यांनी ममतांवर अप्रत्यक्ष टोला लगावलाय. व्हिडिओत विलासराव देशमुख म्हणतात, "काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे. काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरंही जात नाही.'' या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये अशोक चव्हाण लिहीतात, 'अलीकडे काँग्रेसबाबत काही मंडळी़ंना झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमिवर स्व. विलासराव देशमुख यांच्या या विधानाची सहज आठवण झाली.'

काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी ?

मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिमो शरद पवार यांची भेट घेतली आणि काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधत भाजपविरोधात एकजुटीने लढा देण्यावर भर दिला. यूपीए आता आहे कुठे? यूपीए आता नाही, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वातील ‘यूपीए’ ऐवजी समविचारी पक्षांचा नवा पर्याय देण्याचे स्पष्ट संकेत बुधवारी दिले.

परदेशात राहून राजकारण अशक्य
यावेळी ममतांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवरही टीका केली. परदेशात राहून राजकारण करता येत नाही. रस्त्यावर उतरला नाही, तर भाजप तुम्हाला क्लीन बोल्ड करेल, असा टोला लगावला. तसेच, तुम्ही काँग्रेसच्या विरोधात का लढत आहात, असा प्रश्न उपस्थितांपैकी एकाने विचारला. यावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, काँग्रेस आणि डावे पक्ष आमच्याविरोधात बंगालमध्ये लढले. त्यामुळे आता आम्हीही काँग्रेसविरोधात कंबर कसली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी आपल्याला हा लढा द्यावाच लागेल, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

'ममता बॅनर्जी ईडी-सीबीआयला घाबरल्या'
ममता बॅनर्जींच्या वक्तव्याचा काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी खरपून समाचार घेतला. आमचे नेते राहुल गांधी शेतकऱ्यांसाठी, दलितांसाठी, महिलांसाठी, महागाईविरोधात लढा देत आहे. जेव्हा तुम्ही लढवय्यांबद्दल अशी टीका करता, तेव्हा त्याचा भाजपला फायदा होतो. मला वाटतं की, ममता ईडी आणि सीबीआयला घाबरुन अशी वक्तव्ये करत आहेत. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे फक्त भाजपलाच फायदा होणार आहे. मला वाटतं की, भाजपविरोधात लढा द्यायचा असेल, तर अशी वक्तव्ये टाळली पाहिजेत, असे खर्गे म्हणाले.
 

 

Web Title: 'Congress moves like an elephant straight and direct'; Ashok Chavan criticizes Mamata Banerjee through Vilasrao Deshmukh's video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.