Congress aggressive against BJP, agitating in the state tomorrow | मोदींच्या शिवरायांशी केलेल्या तुलनेविरोधात काँग्रेस आक्रमक, उद्या करणार राज्यात तीव्र आंदोलन

मोदींच्या शिवरायांशी केलेल्या तुलनेविरोधात काँग्रेस आक्रमक, उद्या करणार राज्यात तीव्र आंदोलन

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या 'आजके शिवाजी :नरेंद्र मोदी' या पुस्तकाविरोधात काँग्रेसने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवरायांचा वारंवार अवमान करणाऱ्या भाजपाविरोधात मंगळवारी राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. शिवरायांच्या नावावर मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपाकडूनछत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी करण्याचा खोडसाळपणा सुरू आहे, असा आरोप थोरात यांनी केला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या पुस्तकाला विरोध करताना थोरात म्हणाले की, ''छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. छत्रपतींच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपाकडून छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी करण्याचा खोडसाळपणा सुरू आहे. या अगोदरही अजयकुमार बिष्ट आणि विजय गोयल यांनी नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांशी करण्याचा प्रयत्न केला होता, आताही 'आजके शिवाजी :नरेंद्र मोदी' या पुस्तकातून छत्रपतींचा अवमान केला आहे. शिवरायांचा वारंवार अवमान करणाऱ्या भाजपाविरोधात मंगळवारी राज्यभर आंदोलन करुन तीव्र निषेध केला जाणार आहे.''
 
भाजपाच्या खोडसाळपणाचा समाचार घेताना थोरात पुढे म्हणाले की, व्यक्तिगत राजकीय स्वार्थासाठी CAA आणि NRC च्या माध्यमातून देशाला वेठीस धरणारे, धार्मिक तेढ निर्माण होईल अशा भूमिका घेणारे,  नोटबंदीच्या माध्यमातून सामान्य जनतेला वेठीस धरणारे आणि महत्वाचे म्हणजे हुकूमशाही पद्धतीने कारभार करू इच्छिणाऱ्या नरेंद्र मोदींची कोणत्याच अर्थाने छत्रपती शिवरायांसोबत तुलना होऊ शकत नाही.छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले नरेंद्र मोदी मात्र जाती धर्मात तेढ आणि विद्वेषाचे काम करत आहे. त्यामुळे महाराजांच्या नखाचीही सर मोदींना येणार नाही.

''शिवस्मारकातही घोटाळा करणाऱ्या भाजपला खरेतर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही घेण्याचा नैतिक अधिकार नाही. भाजपच्या या खोडसाळपणाचा काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर निषेध केला जाणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, टिळक भवन, मुंबई येथे भाजपाविरोधात मी स्वतः कार्यकर्त्यांसह आंदोलन करणार असून राज्यातील सर्वच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा व तालुकास्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या भाजपाविरोधात तीव्र आंदोलन करतील,'' असेही बाळासाहेब थोरात म्हणाले. 

Web Title: Congress aggressive against BJP, agitating in the state tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.