अध्यक्ष महोदय म्हणायलाच लागतं का?; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 11:58 AM2019-12-01T11:58:35+5:302019-12-01T12:00:08+5:30

नाना पटोलेंचं अभिनंदन करताना फडणवीसांना चिमटा

cm uddhav thackeray taunts bjp leader devendra fadnavis in maharashtra assembly | अध्यक्ष महोदय म्हणायलाच लागतं का?; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

अध्यक्ष महोदय म्हणायलाच लागतं का?; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

Next

मुंबई: विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नाना पटोलेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलं. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांना 'अध्यक्ष महोदय'वरुन जोरदार टोला लगावला. त्यावेळी सभागृहात एकच हशा पिकला. नाना पटोले सर्वांना समान न्याय देतील, अशी अपेक्षा व्यक्त ठाकरेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

भाजपाचे उमेदवार किसन कथोरेंनी त्यांचा अर्ज मागे घेतल्यानं विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोलेंची बिनविरोध निवड झाली. यानंतर हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पटोलेंकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. पटोले विधानसभा अध्यक्षपदी स्थानापन्न झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांचं अभिनंदन केलं. 'नाना पटोले शेतकऱ्यांचे नेते आहेत. भाजपासोबत असतानाही त्यांनी त्यांचा आक्रमक बाणा कायम ठेवला. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत म्हणून त्यांनी थेट खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपामधून बाहेर पडले. त्यांचा स्वभाव अतिशय बंडखोर आहे. कोणाचीही भीडभाड न बाळगता ते त्यांची मतं व्यक्त करतात,' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पटोलेंचं तोंडभरुन कौतुक केलं. 

नाना पटोलेंचं कौतुक करताना उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. पटोलेंकडे पाहत 'अध्यक्ष महोदय म्हणावंच लागतं का?', असा प्रश्न विचारत उद्धव यांनी फडणवीसांचा चिमटा काढला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. 'आपली २५ वर्षांची मैत्री आहे. त्यामुळे ते नातं लक्षात घेऊन तुम्ही वेळोवेळी सुधारणा सुचवाल अशी अपेक्षा करतो,' असं मुख्यमंत्री म्हणाले. यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पटोलेंचं अभिनंदन केलं. अध्यक्ष दोन्ही बाजूंना सांभाळून घेण्याचं काम करतात. तुम्हीही त्याच पद्धतीनं काम कराल आणि विरोधी पक्षाला न्याय द्याल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
 

Web Title: cm uddhav thackeray taunts bjp leader devendra fadnavis in maharashtra assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.