Chief Minister: We have decided; Uddhav: All should be equal! | मुख्यमंत्रीपदावरुन भाजपा-शिवसेनेचं ठरलं?; मुख्यमंत्री अन् उद्धव ठाकरे म्हणतात...
मुख्यमंत्रीपदावरुन भाजपा-शिवसेनेचं ठरलं?; मुख्यमंत्री अन् उद्धव ठाकरे म्हणतात...

मुंबई : विधानसभा निवडणुकीत युतीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार करतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रिपदाबाबत ठरलंय’ असे सांगत ते गुपित कायम ठेवले. तर उद्धव यांनी ‘सगळे समसमान असले पाहिजे’ असे सांगून मुख्यमंत्रिपदावर आपला दावा कायम ठेवला.

शिवसेनेच्या ५३व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात फडणवीस यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. युतीमध्ये मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे वाटून घेणार, पाचही वर्षे ते भाजपलाच मिळणार, अशा चर्चा होत आहेत. त्यावर ठाकरे व फडणवीस यांनी कोणताही खुलासा केला नाही. मीडियाला रोज चर्चा हवी असते. तुम्ही त्या भानगडीत पडू नका, आमचे सगळेच ठरले आहे, योग्य वेळी जाहीर करू. तुम्ही युतीच्या विजयासाठी सज्ज व्हा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. तर ‘मुख्यमंत्रिपदाबाबत आमचं ठरलंय, कोणी चिंता करू नका,’ असे उद्धवही म्हणाले.

‘माझे मोठे बंधू,’ असा उद्धव यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. भाजप-शिवसेना एकत्र आहेत आणि राहतील. वाघ-सिंहाची जोडी एकत्र येते, तेव्हा जंगलात राज्य कोणाचे हे सांगावे लागत नाही. ५६ पक्ष असोत की १५६ पक्ष असोत, जनता कोणाला कौल देणार हे स्पष्ट आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ नाही, आता आपल्याला साथ-साथ दौडायचे आहे. आमच्यात आता कोणतेही मतभेद नाहीत. युती करतानाच ते आम्ही संपविलेले आहेत. दुरावा नाहीसा झाला आहे, या शब्दात उद्धव यांनी प्रतिसाद दिला. युतीसाठी आज मैदान साफ आहे. पण मैदान साफ असले की पायात पाय अडकून पडण्याची भीती अधिक असते असा इशारा उद्धव यांनी दिला. अयोध्येत राममंदिर होणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. एमआयएमचे ओवेसी यांच्यावर टीका करताना त्यांनी तुम्ही स्वत:ला देशाचे भागिदार म्हणवता तर वंदे मातरम म्हणायची लाज का वाटते, असा सवालही केला.

यावेळी मंचावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, शिवसेनेचे नेते, मंत्री, खासदार उपस्थित होते.
शिवसेनेचे १८ खासदार, सातारामध्ये साडेचार लाखांवर मते घेणारे नरेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शिरुरमध्ये पराभूत झालेले शिवाजीराव आढळराव पाटील महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पक्षाचे उपनेतेपद देण्यात आले.

एका युतीची पुढची गोष्ट !
उद्धव आणि फडणवीस यांचे भाषण हे तुझ्या गळा, माझ्या गळा’ स्वरूपाचे होते. शिवसेना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावी, वर्धिष्णू व्हावी, अशी शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिली. एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक दाखवणार होतो पण आता एका युतीची पुढची गोष्ट ठरली आहे, असे उद्धव म्हणाले.

Web Title: Chief Minister: We have decided; Uddhav: All should be equal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.