छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 09:01 IST2025-05-20T08:59:04+5:302025-05-20T09:01:16+5:30
Chhagan Bhujbal Oath News: भुजबळ हे गेले काही महिने नेतृत्वापासून दूरदूरच होते. मग अचानक कसे चर्चेत आले? भुजबळांना अचानक कसे मंत्रिपद मिळाले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
मविआचा लोकसभेचा कल पलटवून विधानसभेला प्रचंड बहुमत मिळवत महायुतीने राज्यात पुन्हा सत्ता स्थापन केली. परंतू, मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते छगन भुजबळ यांना काही केल्या स्थान मिळाले नव्हते. यामुळे भुजबळ नाराजही होते. अधून मधून अजित पवारांवर ते टीकाही करायचे. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाचेही त्यांनी उंबरठे झिजविले होते. आता अखेर सोमवारी रात्री उशिरा भुजबळ मंगळवारी सकाळी मंत्रिपदाची शपथ घेणार असे जाहीर करण्यात आले आहे.
भुजबळ हे गेले काही महिने नेतृत्वापासून दूरदूरच होते. मग अचानक कसे चर्चेत आले? भुजबळांना अचानक कसे मंत्रिपद मिळाले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत. धनंजय मुंडे हे मस्साजोगचे सरपंच धनंजय देशमुख हत्या प्रकरणात अडकले आहेत, मुख्य आरोपी वाल्मिक कराड त्यांचा खास असल्याने मुंडेंवर आरोप होत आहेत. अखेर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. यामुळे ओबीसी नेता म्हणून भुजबळांची वर्णी लावण्यात आली आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते होते. मंत्रिपदावरून पक्षात वाद होऊ नये म्हणून अजित पवारांनी ते काही महिने आपल्याकडेच ठेवले होते. परंतू, भुजबळांना काही दिले नव्हते. आता या महापालिका, नगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने भुजबळांना नाराज ठेवणे परवडणारे नाही. याच कारणातून भुजबळांना हे खाते देण्याचा घाट घालण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
छगन भुजबळ कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सकाळी दहा वाजता राजभवनात राज्यपाला भुजबळांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. ५० लोकांच्या उपस्थितीतच हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यासाठी सोमवारी रात्रीपासूनच तयारी सुरू करण्यात आली. निमंत्रितांना मंगळवारी सकाळी ९ वाजता राजभवनातील कार्यक्रमस्थळी हजर राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.