अब्दुल सत्तार गद्दार, त्यांना मातोश्रीची पायरी चढू देणार नाही - चंद्रकांत खैरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 04:44 PM2020-01-04T16:44:59+5:302020-01-04T17:06:43+5:30

Aurangabad Zilla Parishad President Election : 'अब्दुल सत्तार गद्दार आहेत.'

chandrakant khaire attacks on abdul sattar after aurangabad zp president election | अब्दुल सत्तार गद्दार, त्यांना मातोश्रीची पायरी चढू देणार नाही - चंद्रकांत खैरेंची टीका

अब्दुल सत्तार गद्दार, त्यांना मातोश्रीची पायरी चढू देणार नाही - चंद्रकांत खैरेंची टीका

googlenewsNext

मुंबई : औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून शिवसेनेचा वाद विकोपाला गेल्याचे समोर आले आहे. यातच शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तारांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यावर भाष्य करत त्यांच्यामुळेच औरंगाबाद जिल्हा परिषदचे उपाध्यक्षपद भाजपाला मिळाल्याचा आरोप केला आहे. 

शिवसेना संघटनेशी त्यांनी गद्दारी केली. मातोश्रीसारख्या पवित्र ठिकाणी हिरव्या सापाला येऊ देणार नाही, त्यांनी खरा रंग दाखवला. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहे. तसेच, अब्दुल सत्तार यांना 'मातोश्री'ची पायरी चढू देणार नाही, अशा शब्दांत चंद्रकांत खैरे यांनी  अब्दुल सत्तार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

याशिवाय, शिवसेनेने अब्दुल सत्तारांना विधानसभेचे तिकीट दिले. निवडून आल्यानंतर महाविकास आघाडी झाल्यानेच त्यांना मंत्रिपद दिले. मात्र, त्यांनी भाजपाशी हात मिळवणी केल्यामुळे औरंगाबाद जिल्हा परिषदचे उपाध्यक्षपद भाजपाला मिळाले असेही यावेळी चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. त्याला पक्षात घेतले, तिकीट दिलं, मंत्रिपद दिले, अध्यक्षपदही दिले, जुने कार्यकर्ते ओरडू लागले. आम्ही लाठ्याकाठ्या, दगडं खाऊन शिवसेना मोठी केली, जेलमध्ये गेलो, लॉक अपमध्ये होतो, असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

तसेच, शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी मध्यस्थी करु नये. सत्तार यांना ‘मातोश्री’ची पायरी चढू देणार नाही, त्यांना काढलेच पाहिजे. सत्तारांनी आधी काँग्रेसला शिव्या दिल्या. सत्तार आणि दानवे यांची ही मिलीभगत आहे, प्रत्येक निवडणुकीत ते हेच करतात, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला.

दरम्यान, शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीतील नाराजीनाट्य समोर आले आहे. कॅबिनेट मंत्रिपदाऐवजी राज्यमंत्रिपद दिल्याने अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, औरंगाबद जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून शिवसेनेचा वाद विकोपाला गेल्याचे समोर आले आहे. 

शिवसेनेत स्थानिक राजकरणात निर्णय घेण्याचे अधिकार
जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सत्तार यांना आपल्या मर्जीचा अध्यक्षपद बसवावा अशी इच्छा होती. मात्र त्यांना शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी काही जुमानले नाही. त्यामुळे शिवसेनेत स्थानिक राजकरणात सत्तार यांना निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने त्यांची नाराजी अधिकच वाढली. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राजीनाम्याची नवी खेळी करून दाखवली असल्याची चर्चा सुरू आहे.

कॅबिनेट मंत्रीपद मिळाले नाही
ठाकरे सरकारमध्ये अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद मिळणार अशी चर्चा सुरवातीपासूनच होती. तर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले जाणार असल्याचे बोलले जात होते. तर सत्तार यांना सुद्धा हिच अपेक्षा होती. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्रीपद तर सत्तार यांना राज्यमंत्रीपद दिले. त्यामुळे सुद्धा सत्तार नाराज होते.

(औरंगाबादमधील शिवसेनेचा वाद विकोपाला; अब्दुल सत्तारांबाबत चंद्रकात खैरे करणार गौप्यस्फोट?)

Web Title: chandrakant khaire attacks on abdul sattar after aurangabad zp president election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.