मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शंभर वाघांचा सांभाळ करण्याची क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 06:34 PM2019-11-02T18:34:25+5:302019-11-02T18:34:54+5:30

मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत शंभर वाघांचा सांभाळ करण्याची क्षमता आहे. या अधिवासात शंभर वाघ गुण्यागोविंदाने तेथे राहू शकतात.

Capacity to handle a hundred tigers in the Melghat Tiger Project | मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शंभर वाघांचा सांभाळ करण्याची क्षमता

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शंभर वाघांचा सांभाळ करण्याची क्षमता

Next

- अनिल कडू 
 अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत शंभर वाघांचा सांभाळ करण्याची क्षमता आहे. या अधिवासात शंभर वाघ गुण्यागोविंदाने तेथे राहू शकतात. दरम्यान आजमितीस मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत केवळ ५० वाघ आहेत. देशात सर्वप्रथम अस्तित्वात आलेल्या ९ व्याघ्र प्रकल्पांमधील एक आणि महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणजे मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. जैविक विविधता व वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धनात मेळघाटचे योगदान सर्वाधिक आहे.

मेळघाटात साग, ऐन, अर्जून, हलदु, बांबू या प्रमुख वृक्ष प्रजातींसह वृक्षाच्या ९०, झुडपांच्या ६६, तृणांच्या ३७६, वेलींच्या ५६, गवताच्या ९९ प्रजाती आहेत. यात औषधी वनस्पतींचाही समावेश आहे. वन्य प्राण्यांमध्ये वाघ, बिबट, रानकुत्रे, तडस, रानगवे, सांबर, चितळ, भेडकी, चौसिंगा, अस्वल, मोर, सायळ, माकड यांचे सुद्धा वास्तव्य आहे. २६३ पेक्षा अधिक पक्षी, ९६ प्रकारचे मासे, ५४ प्रकारचे सरपटणारे प्राणी, उडती खार आणि रंग बदलणारा सरडा या मेळघाटच्या जमेच्या बाजू आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आज ५० वाघांसह अत्यंत दुर्मिळ असलेला रानपिंगळाही मेळघाटात आहे. हा रानपिंगळा सर्वप्रथम १८७२ मध्ये जगासमोर आला. नंतर पुढे साधारणत: शंभर वर्षात रानपिंगळ्याचे कुठेच अस्तित्व आढळून आले नाही. रानपिंगळा जगातून नामशेष झाल्याचे बोलले जात असतानाच १९९७ ला मध्यप्रदेश, ओरीसा व महाराष्ट्रात त्याचे अस्तित्व दिसून आले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गंत चौराकुंड क्षेत्रात फालतू नामक वनमजुराने त्यास हुडकून काढले आणि हा फालतू चक्क रानपिंगळ्याच्या प्रेमातच पडला. मेळघाटचे ऋतुमानानुसार बदलणारे नैसर्गिक सौंदर्य, येथील समृद्ध वन्यजीव संपदा, जैवविविधता आणि वन्यजीव बघण्याकरिता पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढीवर आहे. यात विदेशी पर्यटकही ब-यापैकी आहेत. दरम्यान सततच्या पावसामुळे पर्यटकांची निराशा होत आहे.
 
जंगल सफारीला पावसामुळे ब्रेक
 सेमाडोह निसर्ग निर्वचन संकुलात दाखल झालेले पर्यटक जंगल सफारीपासून वंचित राहत आहे. जंगल सफारीचा पिपल पडावा ते अँगल नालापर्यंतचा रस्ता पावसामुळे, नाल्यांवरील पुलावर खड्डे पडल्यामुळे बंद पडला आहे. कुवापाटी-बुजरूकदोड-कोलकास दरम्यानचा जंगल सफारी मार्ग सुरू असला तरी तो केव्हाही बंद राहतो. या मार्गावर पर्यटकांना जंगल सफारीचा आनंद घेता येत नाही.  हमखास दिसणारे प्राणीही या पावसामुळे पर्यटकांच्या नजरेसमोर फिरकत नाहीत.

वन्यजीव सप्ताह
यंदा वेगवेगळ्या उपक्रमांतर्गंत मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केल्या गेला. देशात दरवर्षी  २ ते ८ ऑक्टोंबरपर्यंत वन्यजीव सप्ताह साजरा केल्या जायचा. पुढे १९८३ पासून हा सप्ताह १ ते ७ ऑक्टोबर असा साजरा केला जातो. तर तत्कालिन पंत्प्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या दुरदर्शीपणातूनच वन्यजीवांना कायदेशीर संरक्षण प्राप्त झाले आहे. त्यांच्याच प्रयत्नातूनच १ एप्रिल १९७३ ला भारतात व्याघ्र प्रकल्पाची योजना कार्यान्वित झाली.

Web Title: Capacity to handle a hundred tigers in the Melghat Tiger Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.