“माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करू शकले नाहीत”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 02:20 PM2021-04-03T14:20:59+5:302021-04-03T14:23:34+5:30

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

bjp leader pravin darekar criticised cm uddhav thackeray over corona situation | “माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करू शकले नाहीत”

“माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करू शकले नाहीत”

Next
ठळक मुद्देप्रवीण दरेकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाकोरोना काळात केंद्राची महाराष्ट्राला सर्वाधिक मदत - दरेकरमुख्यमंत्री स्वतः राजकारण करत आहेत - दरेकर

मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊन होणार का, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी रात्री राज्यातील जनतेला संबोधित केले. यावरून आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपसह मनसे, काँग्रेस आणि अन्य पक्षांनीही लॉकडाऊन नको, अशी भूमिका घेतली आहे. यातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करू शकले नाहीत, अशी टीका दरेकर यांनी केली आहे. (pravin darekar criticise cm uddhav thackeray)

प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी कोरोना परिस्थिती, आरोग्य यंत्रणा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण या मुद्द्यांवरून टीका केली. मुख्यमंत्री हतबल आहेत. माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री त्यांच्या कुटुंबाचंही संरक्षण करू शकले नाहीत, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

आरोग्य यंत्रणा अपयशी ठरली

राज्यातील आरोग्य यंत्रणा फोल ठरली आहे. कोरोना परिस्थितीत काय उपयायोजना करायच्या, हे सांगत नाहीत. कोरोनाच्या संकटात जनतेला मदत काय करणार, यावर मुख्यमंत्री बोलत नाहीत, असे दरेकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आमची काळजी करू नये. कोरोनाची पहिली लाट आली, तेव्हाही आम्ही रस्त्यावर उतरून काम करत होतो. मुख्यमंत्र्यांनी जनतेमध्ये जाऊन लॉकडाऊनमुळे होत असलेले नुकसान समजून घ्यावे, असा सल्ला दरेकरांनी दिला.

राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास, मुख्यमंत्र्यांचं भाषणच कळलं नाही; फडणवीसांचा टोला 

मुख्यमंत्री स्वतः राजकारण करत आहेत

आम्ही राजकारण करत नाही. मुख्यमंत्री म्हणतात विरोधक राजकारण करत आहेत. मात्र, जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री स्वत: विरोधकांवर शेरेबाजी, टोलेबाजी, टीका करतात. हे राजकारण नाही का, अशी विचारणा दरेकर यांनी केली आहे. 

केंद्राची महाराष्ट्राला सर्वाधिक मदत

माध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली. जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला किती निधी आला, हे एकदा तपासून पाहावे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वाधिक मदत केली. केंद्र सरकारने अन्नधान्यांपासून ते कोरोनाच्या लसीपर्यंत सर्व सुविधा महाराष्ट्राला दिल्या आहेत. आव्हाड यांना याची कल्पना नसावी. परंतु, आम्ही त्यांना आकडेवारीच पाठवून देऊ, असे दरेकर म्हणाले.

दरम्यान, कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने २० लाख कोटींचे पॅकेज गेल्या वर्षभरात दिले. देशातील अन्य राज्यांनीही जनतेसाठी पॅकेज दिले. केवळ महाराष्ट्राने एक पैशांचेही पॅकेज दिले नाही. मात्र, त्याऐवजी लोकांचे वीज कनेक्शन कापणे, लोकांना त्रास देणे यावरच भर दिला. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दे, टोलेबाजी कर, सल्ला देतात त्यांना उत्तर दे यातच वेळ घालवला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 

Read in English

Web Title: bjp leader pravin darekar criticised cm uddhav thackeray over corona situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.