bjp leader narayan react over sanjay rathod resign | Pooja Chavan Suicide Case: शिवसेना खून, बलात्कार करणाऱ्यांना पाठिशी घालतेय; नारायण राणेंचा आरोप

Pooja Chavan Suicide Case: शिवसेना खून, बलात्कार करणाऱ्यांना पाठिशी घालतेय; नारायण राणेंचा आरोप

ठळक मुद्देनारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोलसंजय राठोड यांना अटक झाली पाहिजे - नारायण राणेंची मागणीकारवाई होईपर्यंत शांत बसणार नाही - नारायण राणेंचा इशारा

मुंबई : अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case)  मृत्यू प्रकरणी चर्चेत आलेल्या आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. यानंतर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. भाजप नेते आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर भाष्य करत भाजपच्या दबावामुळे संजय राठोड यांचा राजीनामा घ्यायला लागला, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. (bjp leader narayan react over sanjay rathod resign)

राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही. इथे कुंपणच शेत खातेय. संजय राठोड दोषी असून चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहजतेने संजय राठोड यांचा राजीनामा घेतलेला नाही. विरोधी पक्षात असलेल्या भाजपाच्या दबावामुळे राजीनामा घ्यावा लागला आहे, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. 

आता शरद पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा: चंद्रकांत पाटील

संजय राठोड यांना अटक झाली पाहिजे

भाजपच्या महिला आघाडीने हा मुद्दा उचलून धरला. आरोप झाल्यानंतर तब्बल १८ दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांच्याकडून राजीनामा घेतला. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करून संजय राठोड यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी नारायण राणे यांनी यावेळी केली. शिवसेना बलात्कार, खून करणाऱ्यांना पाठिशी घालत आहे. विधानसभेत पूजा चव्हाणचा मुद्दा उचलून धरणार. कारवाई होईपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.

संजय राठोड यांचा राजीनामा म्हणजे सत्याचा विजय: तृप्ती देसाई

शरद पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत. त्यांनी यापूर्वीच ठाकरे बाणा दाखवायला हवा होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उशिरा का होईना, वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला त्याचे आम्ही स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना केली. 

सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं

सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांनी दिलेला राजीनामा म्हणजे सत्याचा विजय आहे, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे. याप्रकरणात संजय राठोड यांनी दिलेला राजीनामा ही पहिली पायरी आहे, असे तृप्ती देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे बोलले जात होते. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राज्य सरकारवर मोठी नामुष्की ओढवल्याने शिवसेनेने राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितले. अखेर आज संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा दिला. वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bjp leader narayan react over sanjay rathod resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.