शिवसेनेच्या 'त्या' नेत्यांची नावं मुख्यमंत्र्यांसमोरच जाहीर करणार; नारायण राणेंनी वात पेटवली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 02:51 PM2021-10-08T14:51:45+5:302021-10-08T14:54:46+5:30

चिपी विमानतळावरून विमानांच्या उड्डाणाआधी वादांचं उड्डाण; राणेंचं शिवसेनेवर शरसंधान

bjp leader narayan rane slams shiv sena ahead of chipi airport inauguration | शिवसेनेच्या 'त्या' नेत्यांची नावं मुख्यमंत्र्यांसमोरच जाहीर करणार; नारायण राणेंनी वात पेटवली

शिवसेनेच्या 'त्या' नेत्यांची नावं मुख्यमंत्र्यांसमोरच जाहीर करणार; नारायण राणेंनी वात पेटवली

Next

मुंबई: शिवसेना वि. नारायण राणे संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत. त्याआधी केंद्रीय नारायण राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. विकास प्रकल्पांना आधी विरोध करायचा आणि प्रकल्प पूर्ण झाले की श्रेय घ्यायला यायचं, ही शिवसेना नेत्यांची वृत्ती असल्याचं म्हणत राणेंनी तोफ डागली आहे. त्यामुळे उद्या शिवसेना वि. नारायण राणे नाट्याचा नवा अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

विकासाच्या आड कोण येतं ते जनतेला माहीत आहे. सिंधुदुर्गातील जनता त्याची साक्षीदार आहे. उद्घाटनाची परवानगी मी आणली. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन त्यांना उद्घाटनासाठी ८ दिवसांत परवानगी देण्याची विनंती केली. त्यांनी ती तातडीनं मान्य केली आणि ९ ऑक्टोबर तारीख दिली. शिवसेना नेत्यांनी विमानतळासाठी काय केलं, त्यांची औकात काय, असे प्रश्न राणेंनी विचारले. 

नुसतं कावकाव करून काही होत नाही. त्याचा काही उपयोग नसतो. कायदेशीर कामं करावी लागते. सध्या सिंधुदुर्गात अनेक विकासकामं सुरू आहेत. तिथल्या कंत्राटदारांना सर्वाधिक त्रास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून होतो. सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंत्राटदारांनी गाड्या घेतल्या. याला अडवणूक वगैरे म्हणत नाहीत. हा सगळा हप्तेबाजीचा प्रकार आहे, असा घणाघाती आरोप राणेंनी केला. उद्या होणाऱ्या कार्यक्रमात त्या नेत्यांची नावं जाहीर करेन, असंदेखील राणे म्हणाले.

...तेव्हा विनायक राऊतांचं विमानतळाविरोधात आंदोलन
सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळाचं उद्घाटन उद्या होईल. १९९७-९८ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी उड्डाण मंत्री असताना ग्रीनफिल्ड विमानतळांची घोषणा केली. तेव्हा सिंधुदुर्गात विमानतळ व्हावं यासाठी मी त्यांची भेट घेऊन विमानतळ मंजूर करून घेतला. १५ ऑगस्ट २००९ रोजी भूमिपूजन झालं. त्यावेळी तिथे काही जण आंदोलन करत होते. घोषणाबाजी सुरू होती. जमीन संपादित करू नका, आम्हाला विमानतळाची गरज नाही, अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यांचं नेतृत्त्व शिवसेना खासदार विनायक राऊत करत होते. आता तेच विमानतळ आम्ही सुरू केलं म्हणत श्रेय घेत आहेत, असं राणेंनी सांगितलं.

Web Title: bjp leader narayan rane slams shiv sena ahead of chipi airport inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.