सावध व्हा! राज्यात कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 06:50 AM2021-01-07T06:50:39+5:302021-01-07T06:51:19+5:30

Bird Flu In Maharashtra: ठाण्यात बगळे मृतावस्थेत; पाच राज्यांत लाखाे पक्ष्यांचा मृत्यू

Bird flu crisis now in the state after Corona | सावध व्हा! राज्यात कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचे संकट

सावध व्हा! राज्यात कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचे संकट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे/नवी दिल्ली : कोरोना महामारीत अनेक राज्यांत बर्ड फ्लूचा फैलाव वाढत असल्याने नवे संकट उभे राहिले आहे. राज्यात बर्ड फ्लूचे संकट आल्याने चिंता वाढली आहे. पंजाब, राजस्थान, झारखंड पाठोपाठात ठाण्यात पक्षी मृतावस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.


मध्य प्रदेश व अन्य काही जवळच्या राज्यात बर्ड फ्लूची साथ आली असतानाच ठाणे येथील विजय गार्डन या सोसायटीच्या उद्यानातील तब्बल १५ बगळे बुधवारी दुपारी मृतावस्थेत आढळून आले. ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी यांना एकत्र करून लॅबमध्ये तपासणीकरिता पाठवले आहे. यामागचे कारण तपासणीचा अहवाल आल्यावरच कळणार असल्याचे वनाधिकारी नरेश मुठे यांनी सांगितले.


पंजाब, राजस्थान, झारखंड आणि मध्य प्रदेश या चार राज्यांमध्ये पक्षी मोठ्या प्रमाणात मरून पडलेले सापडत आहेत. त्या राज्यांमध्ये बर्ड फ्लूबाबत ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये काही राज्यांमध्ये अनेक पक्ष्यांचा मृत्यू हाेत असून पाच राज्यांनी बर्ड फ्लूमुळे हे मृत्यू हाेत असल्याचा दुजाेरा दिला आहे. त्यामुळे या आजाराचा धाेका लक्षात घेऊन अनेक राज्यांनी ॲलर्ट जारी केला आहे. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.केरळमध्ये काही दिवसांपूर्वी १२ हजार बदकांचा मृत्यू झाला हाेता. त्यानंतर हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्येही अनेक पक्षी मृतावस्थेत आढळले हाेते. हे मृत्यू बर्ड फ्लूमुळे हाेत असल्याचे स्पष्ट झाले आहेत. केरळच्या अलाप्पुझा आणि कोट्‌टायम या दाेन जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूच्या एच५एन८ या स्ट्रेनमुळे ३६ हजार पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेजारील कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांनी केरळमधील पाेल्ट्री उत्पादनांवर बंदी घातली आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये स्थलांतरीत करणाऱ्या एका जातीचे शेकडाे पक्षी मृतावस्थेत आढळले हाेते. हरयाणामध्येही जवळपास विविध पाेल्ट्री फार्ममधील सुमारे चार लाख पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये १० जिल्ह्यांमध्ये शेकडाे कावळ्यांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर बर्ड फ्लूला दुजाेरा मिळाला. 


परराज्यातील पक्ष्यांची वाहतूक बंद
नाशिक : राजस्थान, हिमाचल प्रदेशपाठोपाठ मध्य प्रदेशात बर्ड फ्लूने पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याचे पाहून जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने आत्तापासूनच सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. संशयित क्षेत्रावरून पक्ष्यांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी दिली.
स्थलांतरित पक्ष्यांमुळे 
बर्ड फ्लू परतला
भारतातून गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बर्ड फ्लू हद्दपार झाला हाेता. परंतु, गेल्या महिन्यात पक्ष्यांचे मृत्यू व्हायला लागले. ज्या भागात स्थलांतरीत पक्षी हिवाळ्यात वास्तव्यास येतात, तेथेच बर्ड फ्लू पसरल्याचे दिसत आहे. या पक्ष्यांमुळे बर्ड फ्लू परतला, असे केंद्रीय पशुसंवर्धन व मत्स्यपालन मंत्री गिरीराज सिंग यांनी सांगितले.
२५ नमुने पॉझिटिव्ह
n राजस्थानच्या झालावाड, बारांक, जयपूर व कोटा जिल्ह्यांत कावळ्यांच्या मृत्यूशिवाय कोटाच्या राजगंज मंडीत २०० पेक्षा जास्त कोंबड्या मृत आढळल्या. ११० नमुन्यांतील २५ चे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. 
n बर्ड फ्लूला दुजाेरा मिळाल्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये काेणत्याही प्रकारच्या पाेल्ट्री फार्ममधील पक्षी, अंडी, मासाेळी इत्यादींची कत्तल, खरेदी-विक्री तसेच निर्यातीस बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने केरळ आणि हरियाणामध्ये विशेष पथके पाठविण्यात आली आहेत.
स्वतंत्र नियंत्रण कक्ष : बर्ड फ्लूचा संसर्ग राेखण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. नवी दिल्लीमध्ये स्वतंत्र नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आले असून पाेल्ट्री फार्ममध्ये विशेष दक्षता घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

ही काळजी घ्या
n काही राज्यांमध्ये एच५एन८ हा ‘बर्ड फ्लू’ विषाणूचा स्ट्रेन आढळला आहे. याचा मानवी संसर्ग झाल्याचे भारतात अद्याप निदर्शनास आलेले नाही. 
n संसर्ग राेखण्यासाठी कच्ची अंडी, कच्चे मांस खाऊ नका. मांस याेग्य प्रकारे शिजवून घ्या.

Web Title: Bird flu crisis now in the state after Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.