Bhandara Fire Live Updates : दुर्घटनेच्या चौकशीसाठी डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 09:51 AM2021-01-09T09:51:39+5:302021-01-09T21:21:48+5:30

Bhandara Fire Live Updates : धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचे समजते. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.

Bhandara Fire Live Updates: fire in newborn care unit at Bhandara District General Hospital, unfortunate death of ten children, Narendra Modi, Uddhav Thackeray, Rajesh Tope expresses grief over the fire incident | Bhandara Fire Live Updates : दुर्घटनेच्या चौकशीसाठी डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत

Bhandara Fire Live Updates : दुर्घटनेच्या चौकशीसाठी डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत

Next
ठळक मुद्देया युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.

भंडारा :   भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचे समजते. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.

दोषींवर कठोर कारवाई होईल, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीत प्रकरणातील  बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली  असून ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज  सांगितले. बेफिकिरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
 

अतिशय दुर्देवी घटना, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश - अनिल देशमुख 
अतिशय दुर्देवी घटना आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, नॅशनल फायर कॉलेज आणि व्हिएनआयटी कॉलेज मिळून या घटनेचे फायर ऑडिट करतील. राज्य शासनाने मृताच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

- भंडारा जिल्हा रुग्णालयातील प्रकरणाची चौकशी एका महिन्यात करून अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येईल - संजय राठोड, महसूल मंत्री

- गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून रुग्णालयाची पाहणी

ज्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केलाय, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा - फडणवीस
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर ऑडिटचा प्रस्ताव 12 मे 2020 रोजी रुग्णालय प्रशासनाने आरोग्य उपसंचालक यांच्या मार्फत संचालक यांच्याकडे पाठविला होता, परंतु त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी हा हलगर्जीपणा केला आहे, त्या सर्वांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

घटना खरंच हृदयद्रावक - सुनील केदार
भंडारा येथील घटना खरंच हृदयद्रावक आहे. मन खिन्न करणारी ही घटना असून त्या निष्पाप चिमुकल्यांसोबत घडावी हे विश्वास करण्यालायक नाहीच आहे. त्या निष्पाप चिमुकल्यांच्या प्रती संवेदना प्रकट करतो व त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना, असे काँग्रेस नेते सुनील केदार यांनी म्हटले आहे.
 

सरकार दोषींवर कारवाई करेल, असा विश्वास आहे - रोहित पवार
भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागून त्यात १० नवजात बालकांच्या झालेल्या मृत्युच्या घटनेने खूप वेदना झाल्या. ज्या कुटुंबीयांवर हे दुःख कोसळले त्यांच्याप्रति माझ्या सहवेदना आहेत. या घटनेची योग्य चौकशी करुन सरकार दोषींवर कारवाई करेल, असा विश्वास आहे, असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

ही हत्या, महाराष्ट्र सरकार जबाबदार : राम कदम
भंडारा जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये 10 निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू हा प्रशासनच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. ही हत्या आहे. त्याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे, अशी टीका भाजपा नेते राम कदम यांनी केली आहे.

नऊ बालकांचे मृतदेह नातेवाईकांकडे सुपुर्द
नऊ नवजात मृत बालकांचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांकडे सुपुर्द करण्यात आले. त्यांच्या गावी वाहनाने मृतदेह रवाना करण्यात आले.

 दुर्घटनेबद्दल राज्यपालांकडून दु:ख व्यक्त
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशु केअर यूनिटला आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीच्या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजून तीव्र दु:ख झाले. घटनेत प्राण गमावलेल्या निष्पाप बालकांच्या कुटुंबीयांना आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

दहा बालकांना वाचवू शकलो नाही, याची खंत
राहुल गुप्ता, गौरव रेहपाडे, शिवम मडामे, प्रिन्स दहिकर या चारही युवकांनी एसएनसीयू सेंटरमध्ये शिरून नवजात बालकांना बाहेर काढले. यात त्यांना सात बालकांना जिवंत सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, परंतु दहा बालकांना ते वाचवू शकले नाहीत, याची खंत त्यांनी व्यक्त केली.

सर्व रुग्णालयातील शिशु केअर युनिटचे तात्काळ ऑडिट करा : अजित पवार
या घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशु केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

घटना अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावणारी - नितीन गडकरी
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावणारी आहे. ज्या कुटुंबांतील मुलांचा या घटनेत मृत्यू झाला त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना, असे ट्विट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

मन हेलावून टाकणारी घटना - नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली असून नवजात बाळांनी आपला जीव गमावला आहे. नवजात बाळांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो. तसेच जे बालक जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी भावना मी व्यक्त करतो, असे नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे. 

घटनेची सखोल चौकशी करण्याचे गृहमंत्र्यांकडून भंडारा पोलिसांना आदेश 
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग लागून  १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. सदर घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी भंडारा पोलिसांना दिले आहेत. आज दुपारी गृहमंत्री अनिल देशमुख घटनास्थळी भेट देणार आहे.

घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी - देवेंद्र फडणवीस 
भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.



 

घटना अत्यंत वेदनादायी - राहुल गांधी
भंडाऱ्यातील या घटनेवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामधील घटना अत्यंत वेदनादायी आहे. मृत बालकांच्या कुटुंबीयांचं मी सांत्वन करतो. मी महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो की, या घटनेतील मृत आणि जखमी बालकांच्या कुटुंबीयाना हरतऱ्हेची मदत करावी, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत - राजेश टोपे
या घटनेबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.


मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी ही घटना समजात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, याबाबत जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.
 

Web Title: Bhandara Fire Live Updates: fire in newborn care unit at Bhandara District General Hospital, unfortunate death of ten children, Narendra Modi, Uddhav Thackeray, Rajesh Tope expresses grief over the fire incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.