Aurangabad marathon India's first handicap mountaineer Shekhar Gaud to run | #क्रॉसदलाईन: भारताचे पहिले दिव्यांग गिर्यारोहक शेखर गौडही महामॅरेथॉनमध्ये धावणार

#क्रॉसदलाईन: भारताचे पहिले दिव्यांग गिर्यारोहक शेखर गौडही महामॅरेथॉनमध्ये धावणार

औरंगाबाद : रशियातील सर्वात उंचीवर असणारे माऊंट एल्ब्रुस शिखर सर करणारे पहिले दिव्यांग (ट्रिपल अॅम्प्युटी) गिर्यारोहक शेखर गौड हे १५ डिसेंबर रोजी होणाऱ्या लोकमत महामॅरेथॉनचे प्रमुख आकर्षण असणार आहे. शेखर गौड हे महामॅरेथॉनमध्ये सक्रिय सहभाग घेऊन धावणार आहेत. हैदराबाद येथील शेखर गौड यांनी ऑगस्ट महिन्यात १५ हजार ५०० फूट उंचीवरील माऊंट एल्ब्रुस शिखर सर करीत इतिहास रचला होता. त्यानंतर दोनच महिन्यांनी दक्षिण आफ्रिकेतील १९ हजार ३४१ फूट उंचीवरील माऊंट किलिमांजरो हे शिखर सर करणारे ते पहिले भारताचे दिव्यांग गिर्यारोहक ठरले.

तर लोकमत महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यास गौड आतुर आहेत. २८ वर्षीय गौड म्हणाले, “मला लोकमत महामॅरेथॉनमध्ये धावणे निश्चितच आवडेल. लोकमत समूहाचा हा उपक्रम खरच प्रशंसनीय आहे. मॅरेथॉनसारख्या चळवळीला चालना देण्यासाठी 'लोकमत'ने पुढाकार घेतल्याचे समजल्याने मला आनंद वाटतोय. या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन औरंगाबादमध्ये मित्र करण्याचा माझा मानस आहे." असे गौड म्हणाले

गौड हे अवघ्या १८ वर्षांचे असताना त्यांनी अपघातात त्यांचा डावा पाय, उजव्या पायाची बोटे आणि उजवा हात गमावला. गौड हे फोनवर बोलताना त्यांचा अचानक तोल गेला आणि त्यांना शॉक लागला. या दुर्दैवी अपघातानंतरही त्यांनी हार मानली नाही आणि ते साहसी खेळाकडे वळले.

पुढे बोलताना गौड़ म्हणाले की, "माऊंट एल्ब्रुस शिखर सर केल्यानंतर हातात घेतलेला तिरंगा हा माझ्यासाठी संस्मरणीय क्षण होता. दिव्यांग व्यक्ती काही करू शकत नाही असे म्हणणाऱ्यांना मला चूक ठरवायचे होते आणि अशक्य हे काहीच नसत हे दाखवून द्यायचे होते”. शेखर गौड यांनी ११ मॅरेथॉन्सदेखील यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत, तसेच २०० कि. मी. ब्रेव्हेटर सायकलिंग इव्हेंटदेखील पूर्ण केला आहे. रॉक क्लायबिंग, गुहेत चालणे, स्विमिंगही त्यांनी केले. मात्र, त्यानंतर त्यांनी सायकल चालवणे व धावणे यावर विशेष लक्ष केंद्रित केले. विशेष म्हणजे त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी अशी सायकल राईडही केली. यावेळी त्यांना उत्तर भारतीयांकडून जबरदस्त पाठिंबाही मिळाला.

गौड हे त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या पालकांना देतात. "मी माझ्या पालकांना 'सॅल्यूट' करतो. माझ्या पालकांनी माझ्यासाठी खूप त्याग केला. त्यांच्यासाठी मला खूप काही करायचे आहे, असे गौड यांनी सांगितले. गौड यांची उपस्थिती हे लोकमत महामॅरेथॉनसाठी केवळ आकर्षणच ठरणार नसून सहभागी धावपटूंचा आत्मविश्वास वाढवणारी व प्रेरणादायक ठरेल.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aurangabad marathon India's first handicap mountaineer Shekhar Gaud to run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.