आता अ‍ॅप करणार मधुमेही रुग्णांची नोंदणी, प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 06:52 PM2020-02-12T18:52:22+5:302020-02-12T18:52:56+5:30

मुंबई : उच्च रक्तदाब रुग्णांवरील उपचार व पाठपुरावा करण्यासाठी चार जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यात येणाऱ्या ‘सिम्पल’ ॲप आता दुसऱ्या ...

App will now register diabetic patients, start using them on a practical basis | आता अ‍ॅप करणार मधुमेही रुग्णांची नोंदणी, प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू

आता अ‍ॅप करणार मधुमेही रुग्णांची नोंदणी, प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू

Next

मुंबई : उच्च रक्तदाब रुग्णांवरील उपचार व पाठपुरावा करण्यासाठी चार जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यात येणाऱ्या ‘सिम्पल’ ॲप आता दुसऱ्या टप्प्यामध्ये नऊ जिल्ह्यात वापरण्यात येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून आता मधुमेह रुग्णांची देखील नोंद ठेवण्यात येणार असून त्यासंदर्भातला पथदर्शी प्रकल्प वर्धा जिल्ह्यात सुरु आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली.

राज्यात सध्या भंडारा, वर्धा, सिंधुदूर्ग आणि सातारा या चार जिल्ह्यांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या ॲपचा वापर केला जात आहे. बदलत्या जीवनशैलीशी निगडित उच्च रक्तदाबाच्या आजारावर नियंत्रणासाठी ‘इंडिया हायपरटेन्शन कंट्रोल इनिशिएटिव्ह’ (आयएचसीआय) यांच्या मदतीने हे ॲप तयार करण्यात आले आहे. या चार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रावर त्याचा वापर सुरु असून रुग्णांची नोंदणी त्याद्वारे केली जात आहे.

रुग्णांची नोंदणी ते त्यांचा पुढील 30 पाठपुरावा या ॲपच्या माध्यमातून करण्यात येतो. विशेष म्हणजे या ॲपमध्ये नोंदणी केलेल्या रुग्णांची रक्तदाबाची तपासणी उपचार मोफत केले जात आहे. त्याचबरोबर त्यांना संपूर्ण महिनाभराच्या गोळ्या देखील मोफत दिल्या जातात. या ॲपमुळे रक्तदाबाच्या रुग्णांचा पाठपुरावा करणे सोपे झाले आहे. रुग्णाला उपचार सुरु करुन 30 दिवस पूर्ण होताच पुढील पाठपुराव्यासाठी त्याला मोबाईलवर एसएमएस पाठविला जातो. एखादा रुग्ण 30 दिवसानंतरही उपचाराला आला नाही तर त्याची यादी केली जाते. ती यादी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्टाप नर्सकडे जाते. त्यावरुन नर्स त्या रुग्णाला संपर्क केला जातो. त्याला रुग्णाकडून प्रतिसाद न मिळाल्यास ती यादी एएनएम, आशा यांना दिली जाते. आशा वर्कर संबंधित रुग्णाच्या घरी भेट देऊन उपचाराबाबत पाठपुरावा करते.

महाराष्ट्रासह अन्य पाच राज्यांमध्ये या ॲपचा वापर सुरु असून आतापर्यंत भंडारा, वर्धा, सिंधुदूर्ग आणि सातारा या चार जिल्ह्यांमध्ये 1 लाख 27 हजार 882 रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. राज्यातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, पुणे, रत्नागिरी, ठाणे, पालघर, कोल्हापूर आणि सांगली या नऊ जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यात ‘सिम्पल’ ॲपचा वापर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केला जाणार आहे. सध्या या जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, एएनएम, औषध निर्माता यांचे प्रशिक्षण सुरु आहे. उच्च रक्तदाबाबरोबरच मधुमेहाच्या रुग्णांची नोंदणीदेखील या ॲपवर करण्यात येणार असून त्यासंदर्भातील प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प वर्धा जिल्ह्यात सुरु झाला आहे, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

उच्च रक्तदाब नियंत्रणाबरोबरच धोकादायक रुग्णांचे निदान करुन त्यांच्यावर पुढील उपचार करणे यामुळे सोपे झाले आहे. उच्च रक्तदाबामुळे निर्माण होणाऱ्या हृदय विकार आणि पक्षघाताच्या आजारावर मात करण्यासाठी हा उपक्रम यशस्वी ठरेल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: App will now register diabetic patients, start using them on a practical basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.