मोठी बातमी! आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, ऊर्जा उपकरण निर्मिती झोन राज्याच्या हातून गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 09:56 AM2022-11-12T09:56:38+5:302022-11-12T09:56:55+5:30

राज्यात नवीन उद्योग उभारण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू असतानाच केंद्राकडून ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मिळविण्याच्या आठ राज्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्र माघारला आहे.

Another project outside Maharashtra! Energy equipment manufacturing zone passed to the state | मोठी बातमी! आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, ऊर्जा उपकरण निर्मिती झोन राज्याच्या हातून गेला

मोठी बातमी! आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, ऊर्जा उपकरण निर्मिती झोन राज्याच्या हातून गेला

googlenewsNext

दीपक भातुसे

मुंबई :

राज्यात नवीन उद्योग उभारण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू असतानाच केंद्राकडून ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मिळविण्याच्या आठ राज्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्र माघारला आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मिळवण्यात मध्य प्रदेशच्या औद्योगिक विकास महामंडळाने बाजी मारली असून याबाबतचे केंद्र सरकारने मध्य प्रदेश सरकारला पाठवलेले पत्र ‘लोकमत’च्या हाती लागले आहे. बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाईस पार्कनंतर ऊर्जा उपकरण निर्मिती झोनही त्यामुळे महाराष्ट्राच्या हातून गेला आहे. यासंदर्भात खुलासा करताना शिंदे फडणवीस सरकारने यासाठी आधीच्या महाविकास आघाडी सरकारला दोषी ठरवले आहे.

वेदांत-फॉक्सकॉन, टाटा-एअरबस हे प्रकल्प गुजरातला गेल्याने आधीच शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत आहे. बल्क ड्रग पार्क गेल्यावरूनही विरोधकांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यातच ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मिळवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) प्रयत्नशील होती. या प्रकल्पासाठी महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू आणि तेलंगणा ही आठ राज्ये प्रयत्नशील होती. महाराष्ट्राकडून एमआयडीसीने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता. 

या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने या आठ राज्यांकडून आलेल्या प्रस्तावांचे एका एजन्सीमार्फत मूल्यमापन केले. त्या मूल्यमापनात मध्य प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाच्या  प्रस्तावाला सर्वांत जास्त गुण देण्यात आले. एजन्सीच्या शिफारशीनुसार मध्य प्रदेशच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या प्रकल्प सुकाणू समितीने २२ ऑक्टोबर २०२२ रोजी मंजुरी दिली आणि २ नोव्हेंबर २०२२ रोजी या प्रकल्पाबाबत मध्य प्रदेशच्या मुख्य सचिवांना केंद्र सरकारने प्रकल्प मंजुरीचे पत्र दिले.

झोन निर्मितीसाठी ४०० कोटींचे अनुदान  
या झोन निर्मितीसाठी केंद्र सरकार ४०० कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. यापूर्वीच्या महाराष्ट्राच्या हातून गेलेल्या बल्क ड्रग पार्कसाठी १ हजार कोटी, तर मेडिकल डिव्हाईस पार्कसाठी ४०० कोटी रुपये केंद्राकडून मिळणार आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या हातात यातील एकही प्रकल्प लागला नाही.

शिंदे-फडणवीस सरकारचा खुलासा
- केंद्र सरकारच्या फेब्रुवारी २०२२ अर्थसंकल्पात २०२२-२३ साठी या झोनचा घोषणा करण्यात आली होती.
- ५ वर्षासाठी ४०० कोटी रुपये या झोनसाठी मिळणार होते
- याची अधिसूचना: १३ एप्रिल २०२२ रोजी काढण्यात आली
- एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट दाखल करण्याची अंतिम तारीख: ८ जून २०२२ ही होती.
या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते.

Web Title: Another project outside Maharashtra! Energy equipment manufacturing zone passed to the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.