'मी कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?', तरुणानं थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 07:25 PM2020-08-25T19:25:35+5:302020-08-25T19:26:34+5:30

"निगेटिव्ह, पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये माझे काही बरे वाईट झाले, तर सर्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल"

'Am I Corona positive or negative?', The youth sent a letter directly to the Chief Minister Uddhav Thackeray | 'मी कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?', तरुणानं थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र 

'मी कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?', तरुणानं थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र 

ठळक मुद्दे"महानगरपालिकेतर्फे जी कोविड १९ अँटीजन (रॅपिड टेस्ट) तपासणी केली जाते, ही तपासणी खरंच कोविड सारख्या गंभीर महामारीचे निदान करते का?"

अहमदनगर : एका तरुणाला आपला कोरोना रिपोर्ट  पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, असा प्रश्न पडला असून त्याने या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवले आहे. महापालिकेने रॅपिड टेस्ट केल्यानंतर या तरुणाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह दिला. मात्र, या तरुणाने जिल्हा रुग्णालयात टेस्ट केल्यानंतर त्याचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह देण्यात आला. त्यामुळे असा प्रश्न या तरुणाला पडला आहे. यावरून कोरोना चाचणीत घोळ होत असल्याचे दिसून येत आहे.

या २४ वर्षीय तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये म्हटले आहे की, "अहमदनगर शहर महानगरपालिकेतर्फे जी कोविड १९ अँटीजन (रॅपिड टेस्ट) तपासणी केली जाते, ही तपासणी खरंच कोविड सारख्या गंभीर महामारीचे निदान करते का? याबद्दल शंका आहे. मी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर जिल्हा प्रशासन, अहमदनगर जिल्हा रुग्णालय यांच्या वतीने आयोजित कोविड-१९ अँटीजन तपासणी उपक्रमांतर्गत जुने नगर जिल्हा रुग्णालय येथे तपासणी केली. तपासणीनंतर दहा मिनिटांतच मला कोविड १९ ची लागण झाल्याचे सांगण्यात आले," असे या तरुणाने म्हटले आहे.

यापुढे या तरुणाने पत्रात म्हटले आहे की, "मी खूप घाबरून गेलो व टेन्शन आले. परंतु मला चाचणीची शंका आली. कारण, तिथे प्रत्येक व्यक्तीला पॉझिटिव्ह सांगत होते. मित्राशी चर्चा केल्यानंतर त्यानं मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चाचणी करण्याचा सल्ला दिला. अजिबात विलंब न करता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो व तिथे स्वॅब दिला. दोन दिवसांनी, २३ ऑगस्टला सिव्हिल हॉस्पिटलचा रिपोर्ट घेतला, त्यात मी निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. २४ ऑगस्टला मी पुन्हा रॅपिड टेस्ट केली, ती पुन्हा पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह? असा प्रश्न मला पडला आहे."

याचबरोबर, "रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्यानं मी उपचारसाठी जिल्हा रुग्णालय येथे गेलो, तर तिथले डॉक्टर बोलले तुम्ही निगेटिव्ह आहात. तुम्हाला उपचारांची गरज नाही. खासगी हॉस्पिटलमध्ये गेलो तर त्यांनी वेगळाच सल्ला दिला. तुम्ही एचआरसीटी करा, हे रिपोर्ट आम्ही ग्राह्य धरत नाही. एचआरसीटी केल्यावर तुम्हाला नेमका काय त्रास आहे ते कळेल. पण माझ्या माहितीनुसार एचआरसीटीमध्ये निमोनियाची लक्षणे कळून येतात," असे या तरुणाने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

'कोरोना टेस्टच्या नावावर जनतेची लूट सुरू आहे. त्यामुळे आपण स्वतः यामध्ये लक्ष घालून सदर प्रकरणात योग्य ती कारवाई करावी व रॅपिड टेस्ट बंद करावी. मी स्वतः आता गोंधळून गेलेलो आहे की मी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह? या सर्व निगेटिव्ह, पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये माझे काही बरे वाईट झाले, तर सर्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल,' असेही या तरुणाने पत्रात म्हटले आहे.

Web Title: 'Am I Corona positive or negative?', The youth sent a letter directly to the Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.