मास्टरस्ट्रोक्सची मालिका; राजभवनात पार पडला शिंदे-फडणवीस यांचा शपथविधी सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 06:53 AM2022-07-01T06:53:39+5:302022-07-01T06:54:04+5:30

सरकार स्थापण्याचा दावा करण्यासाठी दुपारी राजभवनवर गेलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदाची सायंकाळी शपथ घेणार असल्याचे जाहीर करताच सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. 

A series of masterstrokes; The swearing in ceremony of Shinde-Fadnavis was held at Raj Bhavan | मास्टरस्ट्रोक्सची मालिका; राजभवनात पार पडला शिंदे-फडणवीस यांचा शपथविधी सोहळा

मास्टरस्ट्रोक्सची मालिका; राजभवनात पार पडला शिंदे-फडणवीस यांचा शपथविधी सोहळा

Next

मुंबई : अत्यंत नाट्यमय घटनांनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी राजभवनवर शपथ घेतली. मुख्यमंत्री पदाचे एकमात्र दावेदार मानले जात असलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नवे उपमुख्यमंत्री झाले. अत्यंत अनाकलनीय आणि एकामागोमाग धक्के देणारा घटनाक्रम या निमित्ताने देशाने अनुभवला. 

सरकार स्थापण्याचा दावा करण्यासाठी दुपारी राजभवनवर गेलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदाची सायंकाळी शपथ घेणार असल्याचे जाहीर करताच सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. 

 राजभवनवर शिंदे आणि फडणवीस दुपारी तीनच्या सुमारास पोहोचले, त्यांनी राज्यपालांची भेट घेतली, सत्ता स्थापनेचा दावा केला आणि नंतर दोघेही पत्रपरिषदेला सामोरे गेले. फडणवीस यांनी नेहमीच्या शैलीत बोलायला सुरुवात केली आणि  एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री असतील व मी मंत्रिमंडळात असणार नाही, असे त्यांनी सांगताच प्रचंड खळबळ उडाली. 

आपण मंत्रिमंडळात नसू, असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर अडीच तासांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी, फडणवीस हे मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असतील, असे जाहीर केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना दोनवेळा फोन करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या सांगण्यावरून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्विट केले. 

सरकारचे शनिवारी विश्वासमत
विधानसभेचे अधिवेशन २ आणि ३ जुलैरोजी होणार आहे. त्यामध्ये शिंदे सरकार विश्वासमत सिद्ध करेल तसेच विधानसभा अध्यक्षांचीही निवड होईल. 

बाळासाहेब, आनंद दिघेंना स्मरून शपथ
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना स्मरुन घेतली. शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ईश्वरसाक्ष शपथ घेतली. शिंदे आणि फडणवीस शपथविधीनंतर मंत्रालयात आले आणि त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. बैठकीत राज्यातील पाऊस, पीकपरिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. 

कर्ते करविते अमित शाह?
फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापासून वंचित का राहावे लागले, याची जोरदार चर्चा लगेच सोशल मीडियात सुरू झाली. भाजपच्या श्रेष्ठींनी त्यांचे महत्त्व कमी केले की मुंबईत, महाराष्ट्रात शिवसेनेला मोठा शह देण्याची भाजपची ही रणनीती आहे, या चर्चेने जोर धरला. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद बंडाच्या सुरवातीलाच कबूल करण्यात आले होते पण त्याविषयी गुप्तता बाळगली गेली. हे सर्व ऑपरेशन गृहमंत्री अमित शाह यांनी केले, असेही म्हटले जात आहे.

शिंदे महाराष्ट्राला मोठ्या उंचीवर नेण्याचे कार्य करतील -
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल मी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो. तळागाळातील नेते असलेले शिंदे महाराष्ट्राला मोठ्या उंचीवर नेण्याचे कार्य करतील. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ते प्रेरणादायी आहेत, असे पंतप्रधान     नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

...अन् राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदेंकडे देण्यात आली -
राज्याचे ३८-३९ आमदार आसाममध्ये गेले होते. तेव्हा त्यांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची अपेक्षा उपमुख्यमंत्रीपदापेक्षा अधिक असेल असे वाटत नाही. मात्र, भाजपमध्ये दिल्लीचा किंवा नागपूरचा आदेश आला की त्यात तडजोड नसते. हा आदेश आला व त्याचा परिणाम राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष     शरद पवार यांनी म्हटले आहे.

आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो -
महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा! असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
 

Web Title: A series of masterstrokes; The swearing in ceremony of Shinde-Fadnavis was held at Raj Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.