रस्ते १,८०० कोटींनी खड्ड्यात!, कोकणात सर्वाधिक नुकसान; अतिवृष्टीचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 07:17 AM2021-07-31T07:17:13+5:302021-07-31T07:18:32+5:30

राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे १ हजार ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे.

1,800 crore roads in potholes, highest damage in Konkan; Consequences of excess rainfall | रस्ते १,८०० कोटींनी खड्ड्यात!, कोकणात सर्वाधिक नुकसान; अतिवृष्टीचा परिणाम

रस्ते १,८०० कोटींनी खड्ड्यात!, कोकणात सर्वाधिक नुकसान; अतिवृष्टीचा परिणाम

Next

मुंबई  : राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे १ हजार ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते व पुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वाधिक सुमारे ७०० कोटी रुपयांचे नुकसान एकट्या कोकण विभागात झाले असून, त्याखालोखाल पुणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर व नाशिक विभागाचा क्रम आहे. 

जिल्हानिहाय होणार पाहणी
- कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील हानीची पाहणी करण्यासाठी जिल्हानिहाय मुख्य अभियंत्यांची व समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
- अद्यापही अनेक ठिकाणी पाऊस सुरू असून, दरडी साफ करण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे काही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे, तर अनेक ठिकाणी नुकसानग्रस्त रस्त्यांची छायाचित्रे व ड्रोन चित्रीकरणाच्या माध्यमातून प्राथमिक हानीचा अंदाज काढण्यात आला आहे.  

२९० रस्ते बंद
- प्राथमिक अंदाजानुसार २९० रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते, ४६९ रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाली होती तर १४० पूल व मोऱ्या पाण्याखाली गेले होत्या. 
- नुकसानीच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. ३ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीत राज्यातील परिस्थितीचा पुनश्च आढावा घेतला जाईल. 
- राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या नुकसानीबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली.

Read in English

Web Title: 1,800 crore roads in potholes, highest damage in Konkan; Consequences of excess rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.