१३०० कि.मी. प्रवासानंतर घर मिळाले, जोडीदारही मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 05:38 AM2020-07-29T05:38:45+5:302020-07-29T05:39:01+5:30

वाघाचा संसार फुलणार : अभयारण्यातील प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज

1300 km Got a house after the trip, get a mate too! | १३०० कि.मी. प्रवासानंतर घर मिळाले, जोडीदारही मिळणार!

१३०० कि.मी. प्रवासानंतर घर मिळाले, जोडीदारही मिळणार!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : तब्बल १३०० किलोमीटरचा प्रवास करून गेल्या काही महिन्यांपासून बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात स्थिरावलेल्या ‘टी-१सी-१’ वाघाचा संसार फुलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात नियुक्त केलेल्या समितीच्या बैठकीत अभयारण्यात वाघीण सोडण्यावर एकमत झाले. तत्पूर्वी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज असल्याचे समितीतील सदस्यांनी स्पष्ट केले.
ज्ञानगंगा अभयारण्यातील वाघाच्या अधिवासाबद्दल एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक एम. एस. रेड्डी अध्यक्ष असून राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे, वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे डॉ. बिलाल हबीब आणि अकोल्याचे विभागीय वनाधिकारी एम. एन. खैरनार हे सदस्य आहेत. राष्टÑीय व्याघ्र प्राधिकरणाने निर्देशित केलेले मानद वन्यजीव सदस्य जयंत वडतकर हेही सदस्य आहेत. सोमवारी अमरावतीत या समितीची बैठक झाली. ‘टी-१सी-१’ काही महिन्यांपासून या अभयारण्यात स्थिरावला आहे. या पार्श्वभूमीवर वाघांच्या अधिवासाबाबत हा परिसर किती योग्य आहे? या ठिकाणी वाघीण सोडण्यापूर्वी काय काळजी घ्यायची, यावर बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक वाघ हा क्षेत्र, अन्न किंवा वाघीण यासाठी जंगल सोडतो. ‘टी-१सी-१’ गेल्या काही महिन्यांपासून ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावला आहे. त्याला अन्नासोबत योग्य अधिवास याठिकाणी मिळाल्याचे सध्यातरी दिसत आहे, अशी माहिती वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे डॉ. बिलाल हबीब यांनी दिली. या अभयारण्यात वाघ किंवा वाघीण सोडण्याआधी सुरक्षित कॉरिडॉर आणि अभयारण्यातील चराई, रस्ता या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

यवतमाळपासून बुलडाण्यापर्यंत...
यवतमाळ जिल्ह्यातील टीपेश्वर अभयारण्यातून सुरू झालेला या वाघाचा प्रवास ‘ज्ञानगंगा’मध्ये येऊन थांबला. टीपेश्वरमध्ये २०१६ जन्मलेल्या या ‘टी-१सी-१’ वाघाने जूनमध्ये टीपेश्वर सोडले. तेलंगणातील आदिलाबाद, पुढे नांदेड विभाग करीत तो किनवटला पोहोचला. पैनगंगा अभयारण्यात त्याने बराच काळ घालविला.
आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात त्याने हिंगोली जिल्ह्यात प्रवेश केला. नोव्हेंबरच्या सुरुवातीला त्याने अकोला विभागात प्रवेश केला आणि महिन्याच्या शेवटी बुलडाणा जिल्ह्यात पोहोचला. चिखली, खामगाव करीत एक डिसेंबरला तो ज्ञानगंगा अभयारण्यात पोहोचला. रेडिओ कॉलरमुळे त्याचा हा सर्व प्रवास जगासमोर आला. तब्बल १५० दिवसांमध्ये महाराष्टÑ आणि तेलंगणातील सात जिल्ह्यांचा प्रवास पूर्ण करून तो बुलडाण्यात स्थिरावला.

Web Title: 1300 km Got a house after the trip, get a mate too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ