In Udagir robbery by using duplicate key; 40 lakhs cash and 20 gm gold looted | उदगिरात बनावट चावीने कुलूप उघडून रोख ४० लाख आणि २० तोळे सोने पळविले
उदगिरात बनावट चावीने कुलूप उघडून रोख ४० लाख आणि २० तोळे सोने पळविले

ठळक मुद्दे२० तोळे सोने लंपास 

उदगीर (जि़ लातूर) : शहरातील सहजीवन कॉलनीतील एका घराचे  रविवारी दुपारी अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीने कुलूप उघडले. घरातील रोख ४० लाखांसह २० तोळ्यांची सोन्याची बिस्किटे लंपास केल्याची घटना घडली. याबाबत सोमवारी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पोलिसांनी सांगितले, उदगीरमधील शेल्हाळ रोडवरील सहजीवन कॉलनीत चंद्रकांत गोपाळराव सोनफुले यांचे घर आहे़ ते रविवारी दुपारी कुटुंबियांसह नातेवाईच्या विवाहासाठी देगलूर रोडवरील राधेकृष्ण मंगल कार्यालयात गेले होते़ त्यांनी आपल्या घरास कुलूप लावले होते़ दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीने कुलूप उघडून घरामध्ये प्रवेश केला़ बेडरुममधील सुटकेसमध्ये ठेवलेला १० तोळे वजनाचा सोन्याचा एक तुकडा, ५ तोळे, तीन तोळे, दोन तोळे वजनाचा प्रत्येकी एक सोन्याचा तुकडा असे एकूण २० तोळे सोने (किंमत ३ लाख रुपये) आणि लोखंडी कपाटात शेती विक्रीतून आलेले रोख ४० लाख रुपये असे एकूण ४३ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. 

दरम्यान, विवाह सोहळा आटोपून कुटुंबिय घरी परतले असता, चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ त्यामुळे या घटनेची माहिती उदगीर शहर पोलीस ठाण्याला कळविण्यात आली़ त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली़ याबाबत उदगीर शहर पोलीस ठाण्यात सोमवारी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागोराव जाधव हे करीत आहेत़

श्वानपथक घुटमळले
चोरट्यांच्या शोधासाठी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते़ श्वान पथक तिथेच घुटमळले़ दरम्यान, चोरीचा शोध लावण्यासाठी लातूरच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तळ ठोकून आहेत़ अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली़


Web Title: In Udagir robbery by using duplicate key; 40 lakhs cash and 20 gm gold looted
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.