३२ गुंठे जमिनीत पेरुचे ८० हजारांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:34 IST2020-12-13T04:34:04+5:302020-12-13T04:34:04+5:30
किनगाव येथील शेतकरी बस्वराज हुडगे व त्यांचे तीन भाऊ अशा चौघांत एकूण ८ एकर शेती आहे. प्रत्येकजण दोन- दोन ...

३२ गुंठे जमिनीत पेरुचे ८० हजारांचे उत्पन्न
किनगाव येथील शेतकरी बस्वराज हुडगे व त्यांचे तीन भाऊ अशा चौघांत एकूण ८ एकर शेती आहे. प्रत्येकजण दोन- दोन एकर शेती कसत आहेत. दरम्यान, पारंपारिक शेतीतून फारशे उत्पन्न निघत नसल्याने बस्वराज हुडगे यांनी फळबाग लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० जानेवारी २०२० रोजी ३२ गुंठे शेत जमिनीत ५५० पेरुच्या रोपांची लागवड केली. दरम्यान, ही रोपे वाढून फळधारणा होईपर्यंत म्हणून त्यांनी त्यात काकडीचे आंतरपीक घेतले. खर्च वगळता त्यांना ३५ हजार रुपये मिळाले. त्यानंतर भुईमुग घेतले. त्यात खर्च वजा करता २५ हजार मिळाले.
दरम्यान, ११ महिन्यांत पेरुच्या रोपांना फळधारणा होण्यास सुरुवात झाली. साधारणत: एका झाडास ५० ते ६० फळांची लागवड झाली आहे. एका फळाचे वजन ३०० ग्रॅम ते ५०० ग्रॅमपर्यंत आहे. दोन झाडांमध्ये दहा फुट रुंदी व सात फुट लांबी ठेवली आहे. या रोपांना स्प्रिंकलच्या माध्यमातून पाणी दिले. रोपांची व्यवस्थित देखभाल केली. पेरुतून ८० हजारांचे उत्पन्न मिळाले असल्याचे शतकरी हुडगे यांनी सांगितले.
एक लाखाचे आर्द्रक...
आंतरपीक म्हणून यापूर्वी काकडी, भुईमुगाचे उत्पादन घेतले आहे. सध्या आर्द्रक असून ते लाखापर्यंत होईल. कुटुंबात १८ जण असून अजूनही एकत्र कुटुंब पध्दती आहे. जिद्दीने आधुनिक पध्दतीने शेती केल्यास निश्चित चांगले उत्पादन मिळते, असे बस्वराज हुडगे यांनी सांगितले.
आधुनिक शेती महत्त्वाची...
आम्ही पारंपारिक शेती न करता नेहमी नवनवीन प्रयोग करीत असतो. तसेच शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केल्यास निश्चित शेती फायदेशीर ठरते, असेही हुडगे यांनी सांगितले.
***