Make a suicide attempt by killing his wife by strangling her for a dowry | हुंड्यासाठी पत्नीचा गळा दाबून खून करून रचला आत्महत्येचा बनाव
हुंड्यासाठी पत्नीचा गळा दाबून खून करून रचला आत्महत्येचा बनाव

ठळक मुद्देआरोपी पतीस अटक पत्नीने आत्महत्या केल्याचा रचना बनाव

रेणापूर/ पानगाव (जि़ लातूर) : लग्नातील राहिलेला हुंडा घेऊन ये, असे म्हणत शारीरिक व मानसिक छळ करीत पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला़ दरम्यान, पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याची घटना कामखेडा (ता़ रेणापूर) येथे घडली़ याप्रकरणी पतीविरुध्द शुक्रवारी रात्री उशिरा रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

रोहिणी योगेश फुले (१८, रा़ कामखेडा) असे मयत विवाहितेचे नाव आहे़ पोलिसांनी सांगितले की, लोहा तालुक्यातील इंदरानगर येथील सत्यभामा धोंडिबा गुंठे यांची मुलगी रोहिणी हिचा विवाह रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील योगेश ज्ञानोबा फुले (२३) याच्याशी २ एप्रिल २०१९ रोजी झाला होता़ विवाहावेळी मुलास एक लाख रुपये व दोन तोळे सोने देण्याचे ठरले होते़ यापैकी मयत रोहिणीच्या कुटुंबियांनी ५० हजार रुपये व दोन तोळे सोने दिले होते़ उर्वरित रक्कम विवाहानंतर देण्याचे ठरले होते़

दरम्यान, आरोपी पती योगेश फुले हा पत्नी रोहिणीस हुंड्यातील राहिलेले ५० हजार रुपये घेऊन ये, तसेच तुझ्या आई- वडिलांनी आपले लग्न सामुहिक विवाह सोहळ्यात का लावून दिले, असे म्हणून शारीरिक व मानसिक त्रास देत असे़ तसेच मारहाणही करीत़ ११ सप्टेंबर रोजी दुपारी मयत रोहिणीस पती योगेश याने मारहाण करून तिचा गळा आवळला़ त्यात तिचा जागीच मृत्यू झाला़ दरम्यान, याची माहिती कोणालाही होऊ नये म्हणून योगेशने मयत पत्नीच्या गळ्यास फास लावून घरातील आडूला लटकाविले आणि तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचला़

शवविच्छेदनानंतर मयत रोहिणीचा गळ दाबल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले़ याप्रकरणी मयत रोहिणीची आई सत्यभामा गुंठे यांच्या फिर्यादीवरुन रेणापूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा योगेश ज्ञानोबा फुले याच्याविरुध्द कलम ३०२, २०१, ३०४ (ब), ४९८ (अ) भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी आरोपी योगेशला अटक केली आहे़ अधिक तपास पोनि. गोरख दिवे, पोहेकॉ़ मुक्तार शेख हे करीत आहेत़
 


Web Title: Make a suicide attempt by killing his wife by strangling her for a dowry
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.