खादी भांडारच्या वतीने आवाहन
लातूर : मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती लातूरच्या वतीने खादी वूलन, रेशम, पोली साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. खादीप्रेमी ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष शिवसांब चवंडा, वसंतराव नागदे, ईश्वरराव भोसीकर, महाव्यवस्थापक किनगावकर, भांडार व्यवस्थापक बी. एम. पोतदार आदींनी केले आहे,
सदाभाऊ खोत यांचे सोमवारी व्याख्यान
लातूर : तालुक्यातील चांडेश्वर येथे सोमवारी सायंकाळी ६ वाजता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास आ. गोपीचंद पडळकर, भाजप जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, मनीष बंडेवार, अजितसिंह पाटील कव्हेकर यांची उपस्थिती राहणार आहे.
खाडगाव परिसरात स्वच्छतेची मागणी
लातूर : शहरातील खाडगाव रोड परिसरात स्वच्छतेची मागणी होत आहे. या परिसरात नियमित घंटागाडी येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. त्यामुळे मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याकडे शहर महापालिकेने लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
पथदिवे दुरुस्तीसाठी विशेष मोहीम
लातूर : लातूर महापालिकेच्या वतीने शहरातील पथदिवे दुरुस्तीसाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. शहरातील बार्शी रोड, अंबाजोगाई रोड, गंजगोलाई, रेणापूर नाका, औसा रोड आदी मुख्य रस्त्यावरील काही पथदिवे बंद होते. ते दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. त्याची दखल घेत मनपाच्या वतीने पथदिवे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
शिकाऊ उमेदवारांनी अर्ज करावेत
लातूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ लातूर विभागाच्या वतीने वेगवेगळ्या व्यवसायाकरिता शिकाऊ उमेदवार म्हणून ऑनलाईन पद्धतीने जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. १४ जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. शिकाऊ उमेदवारांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.
माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती
लातूर : जिल्ह्यात ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद दिसून येत असून ५८ टक्के उपस्थितीचे प्रमाण झाले आहे. शाळांच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. शिक्षण विभागाच्या वतीने शाळांना भेटी देण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहे. नवीन वर्षात विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.