फिरायला गेलेल्या वंजारवाडी येथील पाच मित्रांवर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 05:10 PM2020-03-03T17:10:34+5:302020-03-03T17:11:47+5:30

वंजारवाडी गावावर शोककळा

five friends death from Wanjarwadi on Mumbai-Pune highway | फिरायला गेलेल्या वंजारवाडी येथील पाच मित्रांवर काळाचा घाला

फिरायला गेलेल्या वंजारवाडी येथील पाच मित्रांवर काळाचा घाला

Next
ठळक मुद्देगावात चूलही पेटली नाही सहावा मित्र बालंबाल बचावला

अहमदपूर (जि. लातूर) : अलिबाग येथे फिरण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील वंजारवाडी येथील पाच मित्रांचा टेम्पो उलटल्याने रविवारी मध्यरात्री मुंबई- पुणे महामार्गावरील लोणावळ्यानजीक खोपोली बोर घाटात मृत्यू झाला़ या घटनेची माहिती मिळताच सोमवारी दिवसभर वंजारवाडी गावावर शोककळा पसरली होती़ गावातील प्रत्येक कुटुंबातून आक्रोश करण्यात येत होता़

वंजारवाडी हे ७५० लोकसंख्येचे गाव आहे़ गावातील अमोल चिलमे, नारायण गुंडाले, निवृत्ती उर्फ अर्जुन गुंडाले, गोविंद नलवाड, विठ्ठल नलवाड हे कामानिमित्ताने गेल्या काही वर्षांपूर्वी पुणे येथे गेले होते़ पुणे तळेगाव एमआयडीसीमध्ये ते काम करीत होते़ गावात शेती व्यवसाय करणारे प्रदीप चोले हे आपल्या मित्रांना भेटण्यासाठी पुण्याला गेले होते़  दरम्यान, गावाकडून मित्र आला आहे म्हणून या सर्वांनी रविवारी सुट्टी असल्याने अलिबाग येथे दुचाकीवरुन फिरायला जाण्याचे नियोजन केले होते़ त्यानुसार हे सहाजण रविवारी अलिबाग येथे फिरुन परतत होते़ तेव्हा हा अपघात झाला़

या घटनेची माहिती मिळताच सोमवारी सकाळपासून गावात दु:खाचे वातावरण होते़ मयत प्रदीप चोले यांच्या पश्चात आई- वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे़  मयत नारायण गुंडाले व निवृत्ती गुंडाले यांच्या पश्चात आई आहे़ गोविंद नलवाड यांच्या पश्चात आई- वडिल, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे़ अमोल चिलमे यांच्या पश्चात आई- वडिल, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे़उत्तरीय तपासणी करून पाचही मृतदेह अहमदपूरला आणण्यासाठी खा. श्रीरंग बारणे, शिवसेनेचे आ. महेंद्र थोरवे, तहसीलदार दीपक आखडे, इरेश चपळवार, गुरुनाथ साकिलकर, महेबुब जमादार, मुकुंद बेंबडे यांनी सहकार्य केले.

सख्ख्या भावांचा मृत्यू; वृद्ध आई एकटीच
अपघातात नारायण गुंडाळे व निवृत्ती गुंडाळे या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला़ ते अविवाहित असल्याने कुटुंबात केवळ ७० वर्षीय आईच आहे़ घटनेची माहिती मिळताच आई धायमोकलून रडत होती़ अमोलचे आई-वडील थकले असल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आली आहे़

सहावा मित्र बालंबाल बचावला
त्यांच्यासोबत असलेला सहावा मित्र विठ्ठल नलवाड हा लघुशंकेसाठी जरा बाजूला गेला असल्याने तो बालंबाल बचावला. या घटनेची माहिती समजताच शिवसेना उपजिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी हे सोमवारी सकाळी घटनास्थळी पोहोचले.  

Web Title: five friends death from Wanjarwadi on Mumbai-Pune highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.