अतिवृष्टी अनुदानापासून २ हजार शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:26 IST2020-12-30T04:26:27+5:302020-12-30T04:26:27+5:30
वाढवणा बु. : उदगीर तालुक्यातील बहुतांश गावात परतीच्या पावसाने अतिवृष्टीचे रूप धारण केले हाेते. यातून शेतकऱ्यांच्या हाती आलेले सोयाबीनचे ...

अतिवृष्टी अनुदानापासून २ हजार शेतकरी वंचित
वाढवणा बु. : उदगीर तालुक्यातील बहुतांश गावात परतीच्या पावसाने अतिवृष्टीचे रूप धारण केले हाेते. यातून शेतकऱ्यांच्या हाती आलेले सोयाबीनचे पीक पूर्णत: पाण्यात वाहून गेले. त्यामुळे शेतकरी हतबल झाला. मात्र, शासनाने याची दखल घेत हेक्टरी दहा हजारांची मदत जाहीर केली. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले. मात्र, अद्यापही वाढवणा परिसरातील दाेन हजार शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. सध्याला शेतकरी मदतीअभावी आर्थिक संकटात सापडला आहे.
उदगीर तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नासाडी परतीच्या पावसाने केली. हाती आलेल्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. त्यावर उपाय म्हणून शासनाने तुटपुंजी मदत दिली. मात्र, काही गावांतील संयुक्त आणि वैयक्तिक खातेदार शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. वाढवणा बु. येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आतापर्यंत एकुर्का रोड, अनुपवाडी, किनी, उमरगा मन्ना, इस्मालपूर, कल्लूर, खेर्डा, डांगेवाडी या गावांतील शेतकऱ्यांना अनुदान वाटप झाले आहे. तर वाढवणा खु., वाढवणा बु. येथील शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत. याची दखल शासन घेत आहे ना लोकप्रतिनिधी. वाढवणा खु. येथील जवळपास ८०० शेतकरी तर वाढवणा बु. १२०० शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत. या अनुदानासाठी बँकांकडे शेतकरी खेटे घालत आहेत.
यादीनुसार अनुदान वाटप...
सध्या बँकेकडे अतिवृष्टी अनुदानाच्या वाढवणा बु., वाढवणा खु. येथील शेतकऱ्यांच्या नावाची यादी अद्यापही आलेली नाही. मात्र, एकुर्का रोड, किनी यल्लादेवी, उमरगा मन्ना, कल्लूर, इस्मालपूर, अनुपवाडी, खेर्डा, डांगेवाडी या गावातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान आलेले वाटप करण्यात आले आहे.
- डी.सी. कवाणकर, शाखा व्यवस्थापक, जिल्हा बँक वाढवणा बु.
अनुदान लवकर जमा करावे...
अतिवृष्टी होऊन आता तीन महिने झाले, नुकसान भरपाई म्हणून शासनाने अनुदान जाहीर केले आहे. मात्र, अद्यापही आम्हाला अनुदान मिळालेले नाही. लवकरात लवकर सरकारने आमच्या अनुदानाची रक्कम खात्यात जमा करावी.
- नागेश पाटील, वाढवणा खु., ता. उदगीर