१३६२ शेतकऱ्यांची अनुदानासाठी धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:59 AM2020-12-04T04:59:03+5:302020-12-04T04:59:03+5:30

शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय म्हणून बहुतांश शेतकरी शेती करण्यास धजावत नाहीत. त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत शेतीस फटका बसतो. पाण्याचे ...

1362 farmers rush for subsidy | १३६२ शेतकऱ्यांची अनुदानासाठी धावाधाव

१३६२ शेतकऱ्यांची अनुदानासाठी धावाधाव

googlenewsNext

शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय म्हणून बहुतांश शेतकरी शेती करण्यास धजावत नाहीत. त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत शेतीस फटका बसतो. पाण्याचे प्रमाण कमी असल्याने शेती उत्पादनात वाढ होत नाही. त्यामुळे शेती करण्याकडे युवा शेतकरी धजावत नसल्याचे पाहून केंद्र शासनाने सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून गेल्या काही वर्षापासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत ठिबक व तुषारला अनुदान देण्यात येते. त्यात अल्पभुधारक आणि बहुभुधारक शेतकऱ्यांना कमी जास्त प्रमाणात अनुदान आहे.

या योजनेमुळे सिंचनाच्या क्षेत्रात वाढ होण्यास मदत झाली असली तरी अनुदान मात्र वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची फरफट होत असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धावाधाव सुरु आहे.

अनुदान मिळण्यात आहेत अडचणी

दरवर्षी शासनाकडून उशिरा अनुदान उपलब्ध करून देण्यात येत असल्याने विलंबाने शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अद्याप अनुदान उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे गतवर्षीच्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळाला नाही.

५५%

मिळते अनुदान

ठिबकसाठी अल्पभुधारक शेतकऱ्यास हेक्टरी ६१ हजाराचे अनुदान मिळत असले तरी प्रत्यक्षात १ लाख १२ हजारापर्यंत खर्च होतो. तसेच तुषारसाठी हेक्टरी १२ हजार ४५ रुपयांचे अनुदान देण्यात येते. प्रत्यक्षात २८ हजारांपेक्षा अधिक खर्च होतो. साधारणत: ५५ टक्के अनुदान मिळते.

शेतातील पाण्याचा योग्य वापर व्हावा तसेच शेती उत्पादन वाढावे म्हणून गेल्या वर्षी ३० हजार रुपये खर्च करून तुषार योजना राबविली. मात्र अद्यापही अनुदान मिळाले नाही. वर्षभरापासून पाठपुरावा सुरु आहे.

- बालाजी पाटील, शेतकरी

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा शासनाकडून अनुदान उपलब्ध झाले नाही. १३६२ शेतकऱ्यांच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. निधी उपलब्ध होताच तात्काळ तो खात्यावर वर्ग करण्यात येईल.

- दत्तात्रय गावसाने, जिल्हा कृषी अधिकारी

Web Title: 1362 farmers rush for subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.