Kolhapur Crime: शिरोळमध्ये जुन्या वादातून तरुणाचा खून, सातजणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:49 IST2025-06-10T17:48:58+5:302025-06-10T17:49:14+5:30
खुनामागे अन्य कारण?

Kolhapur Crime: शिरोळमध्ये जुन्या वादातून तरुणाचा खून, सातजणांना अटक
शिरोळ : जुन्या भांडणाचा वाद मनात धरून येथे तरुणाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. दीपक दशरथ मगदूम (वय २०, रा. शिवाजीनगर, शिरोळ) असे मृताचे नाव असून, खूनप्रकरणी परवेज सरदार शेख (वय २०, रा. शिवाजी चौक), रोहन जुगनू कांबळे (२२, रा. रमाबाई सोसायटी), प्रज्योत अनिल साळोखे (२३, रा. केडीसीसी बँकेसमोर), ऋषिकेश राजू कांबळे (२१, रा. दत्तनगर क्रांती चौक), शुभम संतोष पाटील (वय १८, रा. काळी मस्जिदजवळ), प्रतीक गजानन सावंत (वय २२, रा. दत्तनगर क्रांती चौक), विनायक किशोर साळुंखे (वय २३ रा. चिंचवाड फाटा, सर्व रा. शिरोळ) या सातजणांना शिरोळ पोलिसांनी अटक केली.
याप्रकरणी दीपक याचा मित्र अमोल संतोष सावंत (२०, रा. शिवाजीनगर) याने पोलिसांत तक्रार दिली. ही घटना सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास शिरोळ नदीवेस रस्त्यावरील तीन तिकटी येथील शेताजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आणि दीपक यांच्यात यापूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून परवेज शेखने दीपक याला सोमवारी रात्री कुरुंदवाडला जायचे असल्याचे सांगून मोटारसायकलवरून नदीवेस रस्त्यावरील शेताजवळ आणले. यावेळी शेख याने दीपकच्या डोक्यात पाठीमागून दगड घातला. त्या ठिकाणी लपून बसलेल्या रोहन कांबळे, प्रज्योत साळोखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंखे यांनी दीपकला ओढत शेतात नेले, तेथे त्याला दगडाने मारहाण केली. यादरम्यान रोहन कांबळेने कोयत्याने वार केल्याने दीपक रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेनंतर आरोपींनी पलायन केले.
दरम्यान, तक्रारदार अमोल याने मित्राकरवी रुग्णवाहिकेतून दीपकला मिरज येथील येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मंगळवारी सकाळी पोलीस उपाधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके आणि पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. दीपक याचा उपचारादरम्यान सोमवारी दुपारी मृत्यू झाला.
खुनामागे अन्य कारण?
जुन्या वादातून दीपकचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले असले, तरी गांजा विक्रीबाबत त्याने टीप दिली होती. या कारणातून की अन्य कारणांतून खून झाला, याचादेखील पोलिस तपास करीत आहेत.
मारा रे याला !
घटनास्थळी आल्यानंतर परवेजने मारे रे याला, असे म्हणत दीपकच्या डोक्यात पाठीमागून दगड घातला. अगोदरच दबा धरून शेतामध्ये बसलेल्या उर्वरित आरोपींनी त्याला ओढत शेतात नेऊन दगडाने मारहाण केली. शिवाय तक्रारदार अमोलला तुला बघून घेतो, अशी धमकी देत आरोपींनी पलायन केले.