कोल्हापुरातील विभागीय क्रीडा संकुलातील काही 'शूटिंग रेंज'चे होणार खासगीकरण?, नेमका 'नेम' कोणाचा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 18:35 IST2025-12-02T18:32:49+5:302025-12-02T18:35:42+5:30
नेमका नेम कोणाचा? : क्रीडाप्रेमींची ही रेंज सरकारीच राहावी अशी भूमिका

संग्रहित छाया
कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलात ऑलिम्पिक दर्जाची शूटिंग रेंज झाली. पुणे, मुंबई, नवी दिल्लीला सरावासाठी जाणाऱ्या नेमबाजांचा खर्च वाचला. मात्र, या शूटिंग रेंजमधील काही लेन सुरुवातीला खासगी संस्थेला दिल्या जाणार असल्याची हालचाल सुरू असल्याने सर्वसामान्य नेमबाजपटूंना पूर्णक्षमतेने सरावाला संधी मिळणार नाही. त्यामुळे या शूटिंग रेंजवर कोणाचा नेम आहे, असा आरोप खेळाडूंकडून होऊ लागला आहे.
सध्या चालू असलेल्या शूटिंग रेंजमधील शुल्क सर्वसामान्य नेमबाजपटूंना परवडणारे आहे. मात्र, खासगीकरण झाल्यास नवनवीन सोयींच्या नावाखाली भविष्यात शुल्कात अनियमित वाढ होऊन त्यावर सरकारचे नियंत्रण राहणार नाही. सध्या १० मीटरमधील २७ पैकी ९ लेन, २५ मीटरमधील ८ पैकी २ लेन सुरू आहेत. तर ५० मीटरमधील १३ पैकी १० चालू आहेत. या रेंजमधील लेन खासगी अकॅडमीस दिल्यास नुकसान सोसावे लागणार असल्याचा आरोप नेमबाजपटूंनी केला आहे. त्यामुळे कोणाच्या दबावाखाली निर्णय घेऊन लेन अकॅडमीला देऊ नये, अशी खेळाडूंची मागणी आहे.
आंतरराष्ट्रीय नेमबाजपटूंकडून पाठपुरावा
सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडू आपल्यासारखे नेमबाज घडावेत, या उद्देशाने ऑलिम्पियन आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत आदींनी सातत्याने शूटिंग रेंजसाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे ही राज्य सरकारची रेंज सरकारच्याच मालकीची राहावी, असा क्रीडाप्रेमींचा आग्रह आहे.
खासगीकरण करू नका : सतेज पाटील
छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलमध्ये नेमबाजीचा सराव करण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी असतात. ही शूटिंग रेंज सर्वसामान्य घरातील खेळाडूंना परवडणारी आहे. त्यामुळे या रेंजचे खासगीकरण करू नका, अशी विनंती काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे २८ ऑगस्ट केली. त्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे समजते. परंतु या विषयांवर पालकमंत्रीही फारसे काही बोलत नाहीत.
काही खेळाडूंनी शूटिंग रेंजचे खासगीकरण करत आहेत, असा अपप्रचार सुरू केला आहे. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. येत्या ५ डिसेंबरला त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होईल. त्यात याप्रकरणी चर्चा होऊन वस्तुस्थिती सर्वांसमोर येईल. अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. - सुहास पाटील, क्रीडा उपसंचालक, छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल