कोणत्याच सुविधा नसताना संस्थात्मक अलगीकरणाचा हट्ट का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 02:59 PM2020-07-16T14:59:01+5:302020-07-16T15:12:09+5:30

धामोड येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीत गेल्या दोन दिवसापासून कोरोना निगेटीव्ह अहवाल येऊनही यातना सोसत असलेल्या ग्रामस्थांनी आज तीव्र संताप व्यक्त केला.

Why the hustle of institutional segregation when there are no facilities? | कोणत्याच सुविधा नसताना संस्थात्मक अलगीकरणाचा हट्ट का ?

कोणत्याच सुविधा नसताना संस्थात्मक अलगीकरणाचा हट्ट का ?

Next
ठळक मुद्देकोणत्याच सुविधा नसताना संस्थात्मक अलगीकरणाचा हट्ट का ?धामोड ग्रामपंचायत प्रशासनाची आडमुठी भूमिका

श्रीकांत ऱ्हायकर

धामोड- धामोड येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीत गेल्या दोन दिवसापासून कोरोना निगेटीव्ह अहवाल येऊनही यातना सोसत असलेल्या ग्रामस्थांनी आज तीव्र संताप व्यक्त केला.

या इमारतीत कोणत्याही भौतिक सुविधा तर नाहीतच, शिवाय येथे कॉरंटाईन असलेल्या व्यक्तींना जेवण,चहा, नाष्टाही विचारला जात नव्हता. म्हणुन या लोकांनी येथील अस्वच्छतेचा व्हिडिओ थेट आरोग्य राज्यमंत्र्यांना पाठवल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. राधानगरी तहसीलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन सर्व व्यक्तींना होम कॉरंटाईन करत विषयावर पडदा टाकला.

धामोड ( ता.राधानगरी ) येथील एका ५५ वर्षीय व्यक्तीला चार दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली. या व्यक्तीने धामोड येथील दोघा डॉक्टरांबरोबर भोगावती येथेही उपचार घेतले होते. त्यामुळे संपर्कात आलेल्या सर्वच लोकांनी राधानगरी कोविड सेंटरकडे स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली. त्यात सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे  ग्रामपंचायत प्रशासनाने या सर्वांना संस्थात्मक कॉरंटाईन केले. पण त्यांना ज्या प्राथमिक शाळेत कॉरंटाइन केले,तेथे ना शौचालय, ना बाथरूम. संपूर्ण परिसर दुर्गंधीयुक्त झाल्याने सर्वत्र डासांचे साम्राज्य होते. या लोकांना जेवण तर सोडा, साधा चहा देखील या दोन दिवसात विचारला गेला नाही. त्यामुळे येथील लोकांची तिथल्या अस्वच्छतेचा व्हिडीओ करून तो थेट आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांना पाठवला. त्यामुळे राधानगरीच्या तहसीलदार मीना निंबाळकर व गटविकास अधिकारी संदिप भंडारे यांनी घटनास्थळी भेट देऊन कॉरंटाईन झालेल्या लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण हे सर्व लोक तेथील अस्वच्छतेच्या प्रश्नावर अडून होते. समजूतीअंती या सर्वांना त्यांच्या-त्यांच्या घरी कॉरंटाईन केले.

 संपर्क यादी बनवताना दुजाभाव

पॉझीटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी बनवतानाच दुजाभाव केला गेला आहे. प्रतिष्ठीत लोकांची नावे वगळून सामान्यांना स्वॅब देण्याची सक्ती केली गेली. आता हे सर्व लोक संस्थात्मक कॉरंटाईन तर प्रतिष्ठीत लोक आपापल्या घरात निवांत असल्याचे या कक्षातील एका तरुणाने बोलून दाखवले. आरोग्य मंत्र्यांच्या एका फोनने आजची यंत्रणा हलली खरी. पण इथल्या परिसर स्वच्छतेचा प्रश्न मात्र कायमस्वरूपी निकाली निघणार का ?असाही प्रश्न या निमित्ताने समोर येतो.

Web Title: Why the hustle of institutional segregation when there are no facilities?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.