‘आमचं ठरलंय’ आता प्राधिकरण नकोच, ४० गावांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 02:51 PM2019-09-05T14:51:46+5:302019-09-05T14:53:19+5:30

त्रासदायक ठरत असल्याचे स्पष्ट करत कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण रद्द करण्याचा निर्धार विविध ४० गावांनी केला. आता प्राधिकरण नकोच असं ‘आमचं ठरलंय’. आमचा उद्रेक होण्याची वाट सरकारने पाहू नये, असा इशारा या गावांमधील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि प्रतिनिधींनी दिला

'We are determined' no longer need authority, 5 villages resolved | ‘आमचं ठरलंय’ आता प्राधिकरण नकोच, ४० गावांचा निर्धार

कोल्हापुरात प्राधिकरणाबाबत आयोजित बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध ४० गावांतील सरपंच, सदस्य, प्रतिनिधी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्दे‘आमचं ठरलंय’ आता प्राधिकरण नकोच ४० गावांचा निर्धार; उद्रेक होण्याची वाट पाहू नका

कोल्हापूर : त्रासदायक ठरत असल्याचे स्पष्ट करत कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण रद्द करण्याचा निर्धार विविध ४० गावांनी केला. आता प्राधिकरण नकोच असं ‘आमचं ठरलंय’. आमचा उद्रेक होण्याची वाट सरकारने पाहू नये, असा इशारा या गावांमधील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि प्रतिनिधींनी दिला.

येथील अजिंक्यतारा कार्यालयात आमदार सतेज पाटील यांनी प्राधिकरणामध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांच्या अडचणी समजून घेण्यासाठी बैठक घेतली.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत म्हणाले, ‘प्राधिकरणातील गावांची स्थिती बिकट आहे. आमचा उद्रेक होण्याची वाट सरकारने पाहू नये.’ वडणगेचे सरपंच सचिन चौगुले म्हणाले, प्राधिकरणाबाबत पालकमंत्र्यांनी दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही. पाचगावचे संग्राम पाटील म्हणाले, बांधकाम परवाने कमी खर्चात, वेळेत देण्याचा निर्णय लवकर व्हावा.

वाशीचे संदीप पाटील म्हणाले, पिंपरी-चिंचवड वगळता राज्यातील कोणतेही प्राधिकरण यशस्वी झालेले नाही; त्यामुळे आम्हाला प्राधिकरण नको. निगवेचे दिनकर आडसूळ म्हणाले, प्राधिकरणाने जमिनी घेतल्या, तर पिकवून काय खायचे हा प्रश्न आहे. नागरिक, शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणारे प्राधिकरण रद्द व्हावे.

शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे म्हणाले, विकास करण्याऐवजी त्रास होणार असेल, तर मग प्राधिकरण कशाला? आमच्या ग्रामपंचायती सक्षम आहेत. सध्या प्राधिकरण महापुरात वाहून गेल्यासारखी स्थिती आहे.

या बैठकीत आमदार पाटील यांनी मार्गदर्शन केले. शरद निगडे, अशोक पाटील, अमर मोरे, आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिंगणापूरचे अर्जुन मस्कर, वळीवडेचे प्रकाश शिंदे, गडमुडशिंगीचे प्रदीप झांबरे, गोकुळ शिरगावचे सरपंच एम. के. पाटील, शंकरराव पाटील, सर्जेराव मिठारी, संदीप पाटील, के. पी. पाटील, साताप्पा कांबळे, उजळाईवाडीचे डी. जी. माने, काकासो पाटील, उत्तम आंबवडे, नंदकुमार मजगे, सुनील गुमाने, न्यू वाडदेचे दत्तात्रय पाटील, सचिन कुर्ले, चिंचवाडचे अनिल पाटील, गांधीनगरचे सेवाराम तलरेजा, मोरेवाडीच्या सुनंदा कुंभार, तामगावचे निवास जोंधळेकर, बालिंगा अतुल बोंद्रे, आदी उपस्थित होते.

प्राधिकरणाविरोधातील गावे

पाचगाव, शिंगणापूर, वळीवडे, कंदलगाव, निगवे दुमाला, न्यू वाडदे, उजळाईवाडी, पीरवाडी, नेर्ली, तामगाव, वडणगे, कळंबा, मोरेवाडी, बालिंगा, नागदेववाडी, गोकुळ शिरगाव, सरनोबतवाडी, टोप-संभापूर, आंबेवाडी, प्रयाग चिखली, उचगाव, शिरोली पुलाची, कणेरीवाडी, कणेरी, भुयेवाडी, पाडळी खुर्द , आदी गावांचा प्राधिकरणाला विरोध आहे. गांधीनगर, गडमुडशिंगी, चिंचवाड ग्रामपंचायतीतील काही सदस्यदेखील विरोधात आहेत.

परवान्यांबाबत ग्रामपंचायतींना पत्रे द्या

गावठाण हद्दीतील बांधकाम परवाने ग्रामपंचायतींकडून देण्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. मात्र, अद्याप त्याबाबत काहीच झालेले नाही. परवाने देण्याबाबतचे पत्र प्राधिकरणाने ग्रामपंचायतींना द्यावे, अशी मागणी नेर्लीचे प्रकाश पाटील यांनी केली.


प्राधिकरणाबाबत सरपंच, सदस्यांनी मांडलेल्या अडचणी

१) गुंठेवारी झालेल्या प्लॉटवर बांधकाम परवाने व ग्रामपंचायतींना विकासात्मक कामांच्या मंजुरी मिळविणे कठीण झाले आहे.
२) गावठाणमधील बांधकाम परवाना घेताना नगररचना कार्यालयाचा अभिप्राय घ्यावा लागतो. त्यास विलंब होत असल्याने लोकांना बँक कर्ज मिळविण्यात अडचण निर्माण होत आहे.
३) ग्रामपंचायतींच्या अधिकारावर गदा आल्याने ग्रामपंचायतींच्या विकासाला मर्यादा आली आहे.
४) प्राधिकरणाच्या बांधकाम शुल्काचा परिणाम ग्रामीण भागात इमारती बांधताना होत आहे; त्यामुळे नवे बांधकाम होण्यात अडथळे निर्माण होत आहेत.
 

 

Web Title: 'We are determined' no longer need authority, 5 villages resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.