Voting starts in Kolhapur, 10% voting till 8am | Maharashtra Election 2019 : कोल्हापुरात उत्साहाने मतदानास प्रारंभ, ११ वाजेपर्यंत २0 टक्के मतदान

Maharashtra Election 2019 : कोल्हापुरात उत्साहाने मतदानास प्रारंभ, ११ वाजेपर्यंत २0 टक्के मतदान

ठळक मुद्देकोल्हापुरात उत्साहाने मतदानास प्रारंभ, ११ वाजेपर्यंत २0 टक्के मतदान पावसामुळे सकाळीच लावल्या रांगा

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी आज, सोमवारी सकाळी सात वाजल्यापासूनच नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्या. सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी २0.५३ टक्के मतदान झाले होते. दरम्यान, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील जवाहरनगर हायस्कूल येथील मतदान केंद्रातील एव्हीएम यंत्रात बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेस विलंब झाला. दुपारनंतर मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता असल्याने मतदारांनी सकाळपासूनच रांगा लावल्या आहेत.

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील जवाहर नगर हायस्कूलमधील मतदान यंत्र जवळपास सव्वा तास बंद होते. हे मतदान यंत्र बदलण्याची प्रक्रिया सुरू राहिल्यामुळे मतदारांना रांगेतच तिष्ठत उभे रहावे लागले.

महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ताराबाई पार्क येथील केंद्रीय जी.एस.टी. कार्यालयातील मतदान केंद्रावर आज सकाळी ८.३0 वाजता मतदान केले. दक्षिण मतदारसंघातील उमेदवार अमल महाडिक आणि ऋतुराज पाटील यांनी सकाळीच मतदान केले, मात्र त्यांना स्वत:ला मतदान करता आले नाही. या दोन्ही उमेदवारांचे मतदान अनुक्रमे हातकणंगले आणि कोल्हापूर उत्तर या मतदारसंघात आहे.

ताराबाई पार्क येथील मतदान केंद्रावर मालती माधव फाटक या ८० वर्षांच्या वृध्देने तर दिव्यांग केंद्रावर सुलोचना कृष्णाजी कुलकर्णी या ८३ वर्षांच्या वृध्देने मतदान केले. दिव्यांग मतदारांसाठी बहुतेक मतदान केंद्रावर व्हील चेअरची सोय करण्यात आली होती. दीपलक्ष्मी विश्वंभर सावंत या दिव्यांग मतदाराने ताराबाई पार्क येथील मतदानकेंद्रावर मतदान केले. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात कसबा बावडा येथील उलपे सभागृहात मतदारांनी पावणेसात वाजल्यापासूनच रांग लावली होती. येथे महिलांनी प्रथम मतदानाचा हक्क बजावला. पाचगाव येथेही मतदारांची रांग होती. प्रकाश बासराणी यांनी कुटुंबासह मतदान केले.

सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूल आणि महानगरपालिकेच्या सदगुरु गाडगे महाराज विद्यामंदिर येथील मतदान केंद्रांवर तसेच अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या पाचगाव परिसरामध्ये पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी भेट देवून पाहणी केली. मुक्त सैनिक वसाहत वालावलकर हायस्कुलमध्ये मतदानासाठी मतदारांची गर्दी होती. पाचगावसह मोरेवाडी परिसरात मतदानासाठी मतदारांची रिघ लागलेली होती.

कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील २१ आणि २२ क्रमांकाच्या सखी आणि आदर्श मतदान केंद्रातही महिलांनी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात रांगा लावून मतदान केले. पूर्वा घाटगे, अंकिता माळी, प्रतिक्षा खासनीस, ऐश्वर्या भोगावकर, किरण वाघे या नवमतदारांनीही या मतदानकेंद्रात सकाळीच रांगेत उभे राहून आपले पहिलेवहिले मतदान करण्याची संधी साधली.

सकाळी ९ वाजल्यापासून पावसाने थोडी उसंत घेतल्याने मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडत आहेत. हातकणंगले राखिव विधानसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ६.२६ टक्के मतदारांनी मतदान केले. यामध्ये १४, २०१ पुरुषांनी, ५,६९७ स्त्रियांनी असे एकूण १९, ८९८ मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान केले.

माजी आमदार के. पी. पाटील यांनी मुदाळ (ता.भुदरगड) येथील मतदान केंद्रात मतदान केले. कागल मतदारसंघातील उमेदवार आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल -लिंगनूर दुमाला येथे मतदान केले, त्यानंतर त्यांनी कसबा सांगाव येथील मतदान केंद्राला भेट दिली. या मतदार केंद्रात दिव्यांग मतदार लक्ष्मी श्रीपती कांबळे यांनी व्हीलचेअरवरुन मतदान केले. त्यांना आमदार हसन मुश्रीफ यांनी मतदान केंद्रापर्यंत नेले. समरजितसिंह घाटगे हे शिंदेवाडी येथे, संजयब् घाटगे यांनी व्हन्नाळी येथे तर खासदार संजय मंडलिक यांनी चिमगाव मध्ये मतदान केले. आमदार सतेज पाटील यांनी सकाळी शाळा नं ११ येथे मतदान केले.

सकाळी ११ वाजेपर्यंत २0.५३ टक्के मतदान झाले. चंदगड येथे १६.६३, राधानगरी येथे २४.१0, कागल येथे २८.२0, कोल्हापूर दक्षिणमध्ये १९, करवीरमध्ये २१.१५, कोल्हापूर उत्तर मध्ये १८.२५, शाहूवाडीत २१, हातकणंगले येथे १९, इचलकरंजी येथे १८, आणि शिरोळ येथे २0 टक्के मतदान झाले. तत्पूर्वी सकाळी ९ वाजेपर्यंत ७.९३ टक्के मतदान झाले. चंदगड येथे ८.२५, राधानगरी येथे ६.४0, कागल येथे ८.१0, कोल्हापूर दक्षिणमध्ये ९, करवीरमध्ये १२.२२, कोल्हापूर उत्तर मध्ये ६.२७, शाहूवाडीत ९.३0, हातकणंगले येथे ७, इचलकरंजी येथे ७.0७, आणि शिरोळ येथे ७.0२ टक्के मतदान झाले होते.

दरम्यान, पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी सकाळच्या सत्रात बाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सकाळीच मतदान केंद्रांची पाहणी केली.

Web Title: Voting starts in Kolhapur, 10% voting till 8am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.