Vandalism looted 3 thousand jewels on Sunday | कोल्हापूर रविवार पेठेत भरदिवसा घरफोडी ८० हजारांचे दागिने लंपास
कोल्हापूर रविवार पेठेत भरदिवसा घरफोडी ८० हजारांचे दागिने लंपास

कोल्हापूर : बंद घराचे कुलूप काढून चोरट्याने दोन तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. रविवारी भरदुपारी १२ वाजता हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु ते सापडले नाहीत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस त्यांचा माग काढत आहेत. सुनीता संभाजी कांबळे (वय ५४) यांनी याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली.

रविवार पेठ परिसरात सिद्धिविनायक मंदिराजवळ सुनीता संभाजी कांबळे राहतात. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास त्या व मुलगा स्वप्निल दोघेजण घराला कुलूप लावून, चावी कापडात गुंडाळून घराबाहेर असलेल्या मशीनमध्ये ठेवून गेले. ओढ्यावरील रेणुका मंदिरात दर्शन घेऊन तेथून त्यांनी भाजी खरेदी केली. त्यानंतर मुलगा स्वप्निल नाष्टा करण्यासाठी हॉटेलमध्ये गेला; तर सुनीता घरी आल्या. ठेवलेल्या जागेवरील चावी घेऊन दरवाजाजवळ येताच त्यांना दरवाजा उघडा दिसला. आत पाहिले असता तिजोरी उघडी दिली. सोन्याचा डबाही खाली पडलेला होता. त्यातील सोनाचा नेकलेस, टॉप्स व मंगळसूत्र असे दोन तोळे सोन्याचे दागिने व किरकोळ रक्कम चोरीस गेल्याचे लक्षात आले. सुनीता यांनी मुलगा स्वप्निल याला फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर दोघांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

चोरटा जवळचाच
सुनीता कांबळे यांनी दारात कापडात लपवून ठेवलेली चावी घेऊन चोरट्याने ही चोरी केल्याचा संशय आहे. पाळत ठेवून जवळच्याच व्यक्तीने चोरी केल्याचा पोलिसांचा संशय आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवून पोलीस तपास करीत आहेत.
 

 

Web Title: Vandalism looted 3 thousand jewels on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.