Threatened by Abhay Kurundkar, Raju Gore's application in Panvel court | अभय कुरूंदकरकडून धमकी, राजू गोरे यांचे पनवेल न्यायालयात अर्ज
अभय कुरूंदकरकडून धमकी, राजू गोरे यांचे पनवेल न्यायालयात अर्ज

ठळक मुद्देअभय कुरूंदकरकडून धमकीराजू गोरे यांचे पनवेल न्यायालयात अर्ज

कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकरने ८ नोव्हेंबरला पनवेल न्यायालयाबाहेर सुनावणीला आल्यानंतर ‘तक्रारी करतोस काय, बघून घेतो’ अशी धमकी दिली आहे, अशी लेखी तक्रार शुक्रवारी पनवेल सत्र न्यायालयात न्यायाधीश राजेश अस्मर यांच्याकडे केली असल्याची माहिती अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी दिली.

तक्रारीत म्हटले आहे की, माझी पत्नी अश्विनी बिद्रे-गोरे हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. ८ नोव्हेंबरला मी पनवेल न्यायालयाबाहेर हजर होतो. सोबत एसीपी संगीता शिंदे-अल्फान्सो, नवी मुंबई क्राईम विभागाचे एसीपी अजय कदम सोबत होते.

यावेळी पोलीस बंदोबस्तात संशयित आरोपी अभय कुरुंदकरला न्यायालयातून बाहेर नेत असताना त्याच्यासोबत एक मुलगीही होती. ‘हा तक्रारी करतो, याला बघून घ्यायला पाहिजे, काकांना सांगून एखाद्या गुन्ह्यात अडकवले पाहिजे’ असे वक्तव्य केले होते. अभय कुरुंदकरसोबत असणारी ती मुलगी कोण ? काका म्हणून तीने कोणाचा उल्लेख केला. याबाबत चौकशी व्हावी.

आरोपी साहेब कसा....

अभय कुरुंदकर हा बडतर्फ आहे; मात्र पोलीस दलात त्याचे असंख्य मित्र आहेत. पनवेल न्यायालयात त्याला सुनावणीसाठी आणल्यानंतर ४० ते ५० गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक येतात. गोरे कुटुंबाकडे ते रागाने पाहत असतात. ड्यूटीवरील पोलीस कुरुंदकरला साहेब म्हणून बोलावतात. कुटुंबीयांकडून आणलेल्या पिशव्या खाद्यपदार्थ न तपासता देतात. खुनातील आरोपीला अशी वागणूक दिली जात असल्याबद्दलही राजू गोरे यांनी तक्रारीतून आक्षेप घेतला आहे.
 

 

Web Title: Threatened by Abhay Kurundkar, Raju Gore's application in Panvel court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.