विधानसभेला विजयी आमदारांची ही होती रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 03:00 PM2019-11-08T15:00:19+5:302019-11-08T15:02:37+5:30

विधानसभा निवडणुकीत कुणाचा पराभव कशामुळे झाला, याची चर्चा अजूनही गावोगावी सुरू असली तरी विजयी उमेदवारांच्या गुलालामागे त्यांनी निश्चित केलेली अशी एक रणनीती होती. ती रणनीती यशस्वीपणे राबविल्यामुळेच त्यांना विजयापर्यंत जाते आले. काही उमेदवारांनी विधानसभा डोळ््यांसमोर ठेवून अगोदरपासूनच काही जोडण्या केल्या होत्या, तर काहींनी ऐनवेळी काही योजना आखल्या व त्या त्यांना यशापर्यंत घेऊन गेल्या.

These were the strategies of the winning MLAs in the Assembly | विधानसभेला विजयी आमदारांची ही होती रणनीती

विधानसभेला विजयी आमदारांची ही होती रणनीती

Next
ठळक मुद्देविधानसभेला विजयी आमदारांची ही होती रणनीती कुणाचा पराभव कशामुळे झाला, याची चर्चा अजूनही गावोगावी

विश्र्वास पाटील

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत कुणाचा पराभव कशामुळे झाला, याची चर्चा अजूनही गावोगावी सुरू असली तरी विजयी उमेदवारांच्या गुलालामागे त्यांनी निश्चित केलेली अशी एक रणनीती होती. ती रणनीती यशस्वीपणे राबविल्यामुळेच त्यांना विजयापर्यंत जाते आले. काही उमेदवारांनी विधानसभा डोळ््यांसमोर ठेवून अगोदरपासूनच काही जोडण्या केल्या होत्या, तर काहींनी ऐनवेळी काही योजना आखल्या व त्या त्यांना यशापर्यंत घेऊन गेल्या.

१. कोल्हापूर उत्तर : आमदार चंद्रकांत जाधव : हातात काँग्रेसचा झेंडा, परंतु कालच्या भाजपमधील सहकाऱ्यांना न दुखावता त्यांची मदत मिळविण्यात यशस्वी. नवीन चेहरा, मतदारांपर्यंत पोहोचण्यात मर्यादा; परंतु तरीही माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याबद्दलची नाराजी एकत्रित केल्याने पहिल्याच प्रयत्नात आमदार. कसबा बावड्यातून आमदार सतेज पाटील यांनी दिलेले मताधिक्य ठरले निर्णायक. आमदार पाटील यांचे जिल्हाध्यक्षपद जाधव यांच्या पथ्यावर.

. कोल्हापूर दक्षिण : आमदार ऋतुराज पाटील : ऋतुराज पाटील यांनी प्रचारात कुठेही ते श्रीमंत बापाचा मुलगा आहे, हा संदेश लोकांत जाणार नाही याची दक्षता घेतली. विरोधी आमदार अमल महाडिक हे शांत, सौम्य स्वभावाचे असल्याने त्यांच्यावर थेट टीका करण्यात पाटील गटाला मर्यादा होत्या. त्यामुळे त्यांना ही निवडणूक काही करून पाटील-महाडिक अशा पारंपरिक राजकीय वळणावर नेणे आवश्यक होते. ती नेण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे उमेदवार म्हणून अमल यांची प्रतिमा फारशी उपयोगी ठरली नाही.

मागच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या पराभवास ज्या ज्या गोष्टी कारणीभूत झाल्या, त्या यावेळी दुरुस्त केल्या गेल्या. एकही छोटा कार्यकर्ताही विरोधात जाणार नाही, याची दक्षता घेतली. मुख्यत: सहा महिने मतदार यादी हातात घेऊन जे मतदार नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर आहेत, त्यांना भेटून मतदानासाठी आणण्यात मोठी यंत्रणा कामास लावली.

३. करवीर : आमदार पी. एन. पाटील : या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली ताकद आहे. आमदार सतेज पाटील यांना मानणाराही गट आहे; परंतु मागच्या तीन-चार निवडणुकीत या दोन्ही गटांची या ना त्या कारणाने पी. एन. पाटील यांना मनापासून मदत झाली नाही. या वेळेला आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीला काही करून सोबत घ्यायचे असे धोरण राहिले. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपतराव पवार यांनी उलट भूमिका घेतली तरी त्या पक्षाचे सामान्य कार्यकर्ते आपल्या पाठीशी राहतील असे प्रयत्न झाले.

शेकापक्षाचा गट असलेल्या गावांतील मतदानावर नजर टाकल्यास हा डाव यशस्वी झाल्याचे दिसते. गगनबावड्यात पी. जी. शिंदे गटाची मदत झालीच; शिवाय राजेंद्र सूर्यवंशी काही वेगळी भूमिका घेणार नाहीत, याची दक्षता घेतली. माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे पन्हाळ्यातील मताधिक्य कमी करण्यात आलेले यश.

४. कागल : आमदार हसन मुश्रीफ : कागलच्या राजकारणात प्रमुख चार गट. त्यांतील तीन गटांचे उमेदवार रिंगणात होते. राहिला तो खासदार संजय मंडलिक गट. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपासूनच या गटावर सर्व लक्ष केंद्रित केले. आम्ही दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्या विचारानेच राजकारण करतो, असा धोशा वारंवार लावला. याउलट समरजित घाटगे यांच्याकडून मात्र मंडलिक गटाला फारसे विश्वासात घेतले गेले नाही.

ही निवडणूक तिरंगी झाली की आपोआप सोपी होते, हे लक्षात घेऊन अत्यंत नियोजनबद्धपणे लढत तिरंगी करण्यात यश आल्यावरच विजयाचा निम्मा पाया घातला गेला. उत्तूरमध्ये अडचण आहे म्हटल्यावर गडहिंग्लजला श्रीपतराव शिंदे यांना आपलेसे करण्यात यशस्वी. सोबतीला आया-बहिणींचा गजर, दंडवत आणि आप्पाच्यावाडीच्या फेऱ्या वाढविल्या.

५. शाहूवाडी : आमदार विनय कोरे : माजी आमदार सत्यजित पाटील यांचे गेल्या निवडणुकीत शाहूवाडी तालुक्यातून २३३०० मताधिक्य कसे कमी करायचे यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी सर्जेराव पाटील-पेरिडकर, कर्णसिंह गायकवाड, बाबा लाड हे मनापासून राबले. पाटील यांचे शाहूवाडीतील मताधिक्य यंदा सहा हजारांवर खाली आल्यावर कोरे यांनी गुलाल लावला. पन्हाळ्यातून मतविभागणी होऊ नये म्हणून पारंपरिक विरोधक असलेल्या अमर पाटील यांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द देऊन ते रिंगणात राहणार नाहीत, याची दक्षता घेतली.

६. राधानगरी : आमदार प्रकाश आबिटकर : नेते बाजूला गेले तरी सामान्य माणूस व मुख्यत: तरुण पिढी बाजूला जाणार नाही, याची दक्षता घेतली. त्यात यश आल्यानेच विजय सोपा. विरोधी बाजूकडून मतविभागणी व्हावी यासाठी जरूर प्रयत्न झाले; परंतु त्यास यश आले नाही. मतदार संघात उमेदवार म्हणून कोणत्याही मुद्द्यावर नकारात्मक वातावरण होऊ दिले नाही. सगळेच प्रश्न सुटलेले नाहीत; परंतु तरीही आपल्या प्रश्नांसाठी आमदारांकडून किमान काही प्रयत्न तरी झाले आहेत, हे लोकांच्या मनांवर बिंबवण्यात यश आल्याने गुलाल.

७. हातकणंगले : आमदार राजूबाबा आवळे : सलग तीन पराभव झाल्याने एकवेळ संधी द्या, असे भावनिक आवाहन करीत ते निवडणुकीला सामोरे गेले. विरोधातील उमेदवार शिवसेनेचे सुजित मिणचेकर यांच्याविरोधात कोणतीही टीका केली नाही. हा आरक्षित मतदारसंघ असल्याने जातीचा प्रभाव जास्त राहतो, हे लक्षात घेऊन मातंग समाजात मतविभागणी होणार नाही याची दक्षता घेतलीच; शिवाय नवबौद्ध समाजात मतविभागणी कशी होईल, असे अप्रत्यक्षपणे प्रयत्न केले.

८. इचलकरंजी : आमदार प्रकाश आवाडे : केंद्र सरकारच्या नोटाबंदी व जी.एस.टी.च्या धोरणांमुळे यंत्रमाग व्यावसायिक त्रस्त झाले होते. त्यांची सरकारबद्दलची नाराजी होती; परंतु त्यांना चांगला पर्याय हवा होता. मोदी यांच्यावर भाळलेला मतदार ‘हाता’ला मतदान करण्यास तयार नव्हता. त्यामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा त्याग करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची खेळी प्रचंड यशस्वी. वस्त्रोद्योगाला मंदीतून बाहेर काढण्यासाठी हातात सत्तेची सूत्रे असूनही तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर काही करू शकले नाहीत, हे लोकांच्या मनांवर बिंबविण्यात यशस्वी.

९. शिरोळ : आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर : पाच वर्षांपासूनची तयारी. स्वत: फारसे धार्मिक नसतानाही गेल्या वर्षभरात जैन समाजाच्या विविध धार्मिक कार्यक्रमांत पुढाकार घेऊन समाजाचे पाठबळ मिळेल असा प्रयत्न. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळविण्यात काही प्रमाणात यश व काँग्रेस कार्यकर्त्यांची मदत यांची मोट बांधून विजय मिळवला.

१०.चंदगड : आमदार राजेश पाटील : चंदगड तालुक्यात आपल्याला चांगली मते मिळू शकतात. त्याला जोड म्हणून गडहिंग्लज तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे, मुख्यत: दिवंगत नेते बाबा कुपेकर यांना मानणारे कार्यकर्ते आपल्यासोबत कसे राहतील, असा आटोकाट प्रयत्न केला व त्यात यश आल्यामुळेच चंदगड तालुक्यात दोन नंबरची मते मिळूनही विजयी. नवीन उमेदवार या प्रतिमेचा गडहिंग्लज तालुक्यात झाला फायदा.
 

 

Web Title: These were the strategies of the winning MLAs in the Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.