नैसर्गिक फुलांची पसरली चादर !, दुर्लक्षित मसाई पठारावर मारा फेरफटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 01:22 PM2020-09-25T13:22:10+5:302020-09-25T13:26:23+5:30

पन्हाळा - पावसाला परतीचे वेध लागल्यावर सह्याद्रीतील बहरलेला निसर्ग डोळे भरून पाहण्यासारखा असतो. हिरव्यागार निसर्गाची मानवाने केलेली सारी वर्णने याचिदेही याचिडोळा पाहायला मिळतात ती आत्ताचं ! सह्याद्रीतील कोणत्याही घाटात, पठारावर, सड्यांवर, खोलदऱ्यांत, पाउलवाटांच्या सभोवती हमखास हे दृश्य नजरेस पडतं. या स्वर्गीय सौंदर्याचा पृथ्वीवरील कालावधीही फारसा लांबलचक नसतो.

Take a tour of the Masai Plateau, which is full of natural flowers | नैसर्गिक फुलांची पसरली चादर !, दुर्लक्षित मसाई पठारावर मारा फेरफटका

नैसर्गिक फुलांची पसरली चादर !, दुर्लक्षित मसाई पठारावर मारा फेरफटका

googlenewsNext
ठळक मुद्देनैसर्गिक फुलांनी फुलल्या रानवाटा दुर्लक्षित मसाई पठारावर मारा फेरफटका

नितीन भगवान

पन्हाळा - पावसाला परतीचे वेध लागल्यावर सह्याद्रीतील बहरलेला निसर्ग डोळे भरून पाहण्यासारखा असतो. हिरव्यागार निसर्गाची मानवाने केलेली सारी वर्णने याचिदेही याचिडोळा पाहायला मिळतात ती आत्ताचं ! सह्याद्रीतील कोणत्याही घाटात, पठारावर, सड्यांवर, खोलदऱ्यांत, पाउलवाटांच्या सभोवती हमखास हे दृश्य नजरेस पडतं. या स्वर्गीय सौंदर्याचा पृथ्वीवरील कालावधीही फारसा लांबलचक नसतो.

तो कधी बहरेल नि कधी लुप्त होईल ?  हे सांगणंही तसं कठीण. सह्याद्रीत, निसर्गात सतत भटकंती करणाऱ्या भटक्यांना अशा स्थळांचा चांगला अंदाज असतो. सप्टेंबर महिन्यात अशाच निसर्गात रममाण व्हायचे असेल तर पन्हाळ्याच्या पश्चिमेस असणारे मसाई पठार नैसर्गिक फुलांनी बहरुन गेले आहे येथील स्वर्गीय अनुभूती डोळे भरुन पहायची असेल तर मसाई पठारावर फेरफटका व्हायलाच हवा.

मसाई पठार परिसर दुर्लक्षित आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गडाच्या पश्चिमेस असणाऱ्या या पठारवर बुधवारपेठ मधुन सरळ पठारावर जाता येते. सुरवातीच्या पठारावर वाहन लावुन पुढचा प्रवास पायी चालायला सुरुवात केल्यानंतर कांही अवधीतच आपल्याला भव्यदिव्य फुलांच निसर्ग दर्शन होणार असल्याची जाणीव होते. ही मसाई पठारच्या निसर्गाच्या वेगळेपणाची किमया ! सह्याद्रीचे जे विशाल दर्शन घडते, त्या सह्याद्री पर्वतरांगेच्या विस्तीर्ण पठारावर आपण असतो.

सध्याच्या वातावरणात हिरवाईने फुललेल्या व वाट काढत वारा अंगावर झेलत निघताना इथल्या निसर्गाचा गंध, निसर्गाचा आवाज सारंच रम्य ! खरंतर पावसाळा संपतानाच्या दिवसात फुलांचे वेड संपत नाही. माहित असलेली-नसलेली सृष्टीतील असंख्य झाडे, वेली फुलतात. त्यामुळे या भागातील जंगलप्रवास अनोखा, चैतन्यदायी, गूढरम्य, भौतिकसुखाची विसर पडणारा ठरतो.

इथल्या पायवाटांवरून चालताना, संवेदनशील मन मातीत, झाडाझुडुपात, पाखरांत, रानवाटात गुंतून पडत नि वेळेचं भानही राहिलं नाही. हा सारा परिसर सध्या तरी एका अद्भूत निसर्गशक्तीचे माहेरघर बनून राहिला आहे. पाहाताना नजरेला दिसणारे दृश्य निव्वळ विहंगम पायाखालची हिरवाई आकाशातल्या निळाईशी स्पर्धा करते त्यावर लक्ष ठेवण्यासाठीच जणू जमिनीवर उतरू पाहणाऱ्या ढगांची पळापळ सुरु असते

मसाई पठार सारख्या उन्हाळ्यात ओसाड पडणाऱ्या असंख्य कड्यांवर पावसाळ्यात नंदनवन फुलतं. हे वैभव पुढे हिवाळ्याचा काही काळ टिकून असतं. खरंतर पाऊस पडायला लागला की जमिनीवर पडलेल्या बिया, जमिनीतले कंद फुलतात. जमिन हिरवीगार होते. पठारावर, डोंगर उतारांवर रानफुले फुलतात. विविध जाती, रंग, आकार यांमुळे ती लक्षवेधक ठरतात. सप्टेंबर अखेर पर्यंत या फुलांची सड्यांवर चादर पसरते.

उन्हाळ्याच्या दिवसांत तर हे सडे तव्यासारखे तापतात. पावसाळ्यात यांवर पाणी साचते. तळी, डबकी बनतात. शेवाळे आणि दगडफुलाचे आवरण इथे हमखास भेटते. या पठारावरील वनस्पतींचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची फुले होतं. पिवळी, गुलाबी, निळी, पांढरी, जांभळी फुले पाहून मन मोहुन जाते.

मसाई पठार सारखी सौंदर्याची परिसीमा गाठणारी पुष्कळ ठिकाणं सह्याद्रीत आहेत. दीर्घकाळ रमलेला यंदाचा पाऊस परततोयं ! सह्याद्री हिरव्यागार रंगाची सर्वत्र बेमालूम उधळण करतो आहे. निसर्गातील हिरवाई आपल्याला जगण्याची नवी उर्जा प्रदान करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिथे पोहोचल्यावर मिळणारा आनंद केवळ स्वर्गीय असतो.

हे दृश्य इथून पुढच्या काळात दिवसागणिक धूसर होत जाईल. त्याची नजाकत अनुभवण्यासाठी आपलीही पाऊलं घराबाहेर पडायला हवीत ! आपल्या सह्याद्रीचा पश्चिम घाटमाथा जितका जंगलसंपदेने समृद्ध तितकाच विस्तीर्ण पठारानेही समृध्द आहे. अशाच मसाई पठाराची ही सफर आपण अनुभवावी निसर्गाचा आनंद घ्या. पठारवर पाऊलं वळायला लागली की त्यांना महत्व येईल. त्यांच्या जोपासनेचे, संवर्धनाचे महत्व समाजाच्या लक्षात येईल. निसर्ग जपला जाईल.

Web Title: Take a tour of the Masai Plateau, which is full of natural flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.