कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या मतांचा टक्का वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 01:34 PM2019-05-27T13:34:23+5:302019-05-27T13:50:09+5:30

आतापर्यंत दुसऱ्या किंवा तिसºया क्रमांकाच्या मतावरच समाधान मानाव्या लागणाºया शिवसेनेने यावेळी मात्र गेल्या २८ वर्षांची कसर भरून काढत कोल्हापूर व हातकणंगलेच्या दोन्ही जागा जिंकत मतांचा टक्काही वाढविला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात १९९१ पासून शिरकाव केलेल्या शिवसेनेची मतांची टक्केवारी १८ वरून ५६ तर हातकणंगलेसाठी ४५ वरून ४७ वर पोहोचली आहे. या निवडणुकीत कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक यांना ५६.३५ तर हातकणंगलेत धैर्यशील माने यांंना ४७.0२ टक्के मते मिळाली आहेत. शिवसेनेला आजवर मिळालेली ही सर्वोच्च मते आहेत.

Shiv Sena's votes increased in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या मतांचा टक्का वाढला

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या मतांचा टक्का वाढला

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत २८ वर्षांनी पहिल्यांदाच प्रथम क्रमांकाची मतेकोल्हापुरात १८ वरून ५६ वर, हातकणंगलेत ४५ वरून ४७ टक्क्यांवर

नसिम सनदी

कोल्हापूर : आतापर्यंत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाच्या मतावरच समाधान मानाव्या लागणाऱ्या शिवसेनेने यावेळी मात्र गेल्या २८ वर्षांची कसर भरून काढत कोल्हापूरहातकणंगलेच्या दोन्ही जागा जिंकत मतांचा टक्काही वाढविला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात १९९१ पासून शिरकाव केलेल्या शिवसेनेची मतांची टक्केवारी १८ वरून ५६ तर हातकणंगलेसाठी ४५ वरून ४७ वर पोहोचली आहे. या निवडणुकीत कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक यांना ५६.३५ तर हातकणंगलेत धैर्यशील माने यांंना ४७.0२ टक्के मते मिळाली आहेत. शिवसेनेला आजवर मिळालेली ही सर्वोच्च मते आहेत.

जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले हे दोन्ही मतदारसंघ सुरुवातीला शेकाप व कम्युनिस्ट पक्ष आणि त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचे पारंपरिक बालेकिल्ले; पण मंडल आयोगामुळे देशपातळीवर बदललेल्या राजकारणात हिंदुत्ववादी विचार घेऊन शिवसेनेने जिल्ह्यात विस्तारास सुरुवात केली होती. कोल्हापूर शहरात दिलीप देसाई यांच्या रूपाने १९९0  मध्ये शिवसेनेला पहिले आमदारही मिळाले होते.

शहरात प्रभाव असला तरी ग्रामीण भागात तो नव्हता. १९९१ पासून शिवसेनेने लोकसभेच्या रणांगणात उडी घेतली. १९९१ ते २0१९ अशी गेली २८ वर्षे सातत्याने कोल्हापूरची जागा शिवसेना स्वतंत्रपणे लढवित आहे, त्याचवेळी पूर्वीच्या इचलकरंजी आणि आताच्या हातकणंगले मतदारसंघातही सेनेने १९९८ पासून रिंगणात उतरण्यास सुरुवात केली.

१९९१ साली कोल्हापुरातून निवडणूक लढविणारे रामभाऊ फाळके हे पहिले उमेदवार ठरले. त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची १८ टक्के मते घेतली. काँग्रेसचे उदयसिंगराव गायकवाड ६५ टक्के मते घेऊन एक लाख ९४ हजार मताधिक्याने निवडून आले, तरी सेनेने पहिल्याच प्रयत्नात ताकद दाखविली. विष्णुपंत इंगवलेसारखे कामगार नेते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. यातून आत्मविश्वास दुणावल्यानंतर १९९६ मध्ये चित्रपट अभिनेते रमेश देव यांना रिंगणात उतरवले.

गायकवाड यांच्यासमोर देव यांचा टिकाव लागला नाही; पण त्यांनी तब्बल एक लाख ६८ हजार ४१४ इतकी दुसऱ्या क्रमांकावरची ३१.२५ टक्के मते घेतली. गायकवाड यांना ४३ टक्के, तर शेकापचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिले. १९९८ मध्ये विक्रमसिंह घाटगे यांनी काँग्रेसचे सदाशिवराव मंडलिक यांच्या विरोधात सेनेतून निवडणूक लढवली, त्यांना ४३ टक्के मते मिळाली, ५१ टक्के मतांसह मंडलिक ६१ हजार मताधिक्यांनी विजयी झाले.

१९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादी, काँग्रेस व सेना असा तिरंगी सामना झाला. यात मंडलिकांना ४५ तर गायकवाडांना ३१ टक्के मते मिळाली. मंडलिकांना विजय मिळाला तरी सेनेकडून मेजर शिवाजीराव पाटील यांनी २१.१५ टक्के अशी घसघशीत मते घेतली. २00४ मध्ये धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यानंतर सेनेत प्रवेश करून उमेदवारी घेतली. त्यांनी ४८ टक्के मते घेतली, राष्ट्रवादीच्या सदाशिवराव मंडलिकांकडून त्यांना १४ हजारांच्या निसटत्या मताधिक्याने पराभवाला सामोरे जावे लागले.

२00९ मध्ये तिरंगी लढतीत विजय देवणे यांनी १७ टक्के मते घेतली. २0१४ मध्ये राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक व शिवसेनेकडून संजय मंडलिक यांच्यात सामना रंगला, यात ऐनवेळी सेनेत आलेल्या मंडलिकांनी ४६ टक्के मते घेऊनही ३५ हजारांच्या मताधिक्यांनी महाडिक विजयी झाले. २0१९ मध्ये मंडलिकांनी ५६.३५ टक्के मते घेत महाडिकांवर विजय मिळविला. महाडिकांना ३६.१९ टक्के मते मिळाली.

तत्कालीन इचलकरंजी आणि आताच्या हातकणंगले मतदारसंघात १९९८ पासून सेनेने निवडणूक लढविण्यास सुरुवात केली. काँग्रेसच्या कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या विरोधात सेनेकडून निवेदिता माने यांनी प्रबळ आव्हान उभे केले. आवाडेंनी ४७.७ टक्के मतांनी विजय मिळविला, माने यांना ४५.४१ टक्के मते मिळाली. १२ हजार इतक्या कमी मतांनी माने यांना पराभव स्वीकारावा लागला.

१९९९ मध्ये पुंडलीक जाधव यांना तिसऱ्या क्रमांकावरची १२.४२ टक्के मते मिळाली. २00४ मध्ये डॉ. संजय पाटील यांनी सेनेकडून लढताना राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांच्या विरोधात ४१ टक्के मते घेतली; पण त्यांना एक लाख मतांनी पराभूत व्हावे लागले. २00९ मध्ये रघुनाथदादा पाटील यांना शिवसेनेच्या इतिहासातील ५.६२ टक्के इतके निच्चांकी मते मिळाली तरी ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

स्वाभिमानीचे राजू शेट्टी ४९ टक्के मतांनी विजयी झाले. २0१४ मध्ये शिवसेनेने आपला उमेदवार उभा न करता महायुती म्हणून शेट्टी यांना पाठिंबा दिला. आता २0१९ मध्ये धैर्यशील माने यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात तब्बल ४७.0२ टक्के इतकी आजवरची मतदारसंघातील सर्वोच्च टक्केवारी घेऊन विजय मिळविला.

आयातीत उमेदवारांच्या पराभवाची मालिका खंडित

आतापर्यंत सेनेने कोल्हापुरात आठवेळा तर हातकणंगलेत पाचवेळा निवडणूक लढवली आहे. यात १९९१ चा कोल्हापुरातून रामभाऊ फाळके, २00९ मध्ये विजय देवणे आणि हातकणंगलेतून २00४ चा पुंडलीक जाधव यांचा अपवाद वगळता दरवेळी सेनेची मदार आयातीत उमेदवारांवरच राहिली आहे. इतर पक्षांतील डावललेल्यांना उमेदवारी दिली यापैकी कोणीही विजयापर्यंत पोहोचू शकला नाही.

अपवाद फक्त यावेळी खासदार झालेल्या संजय मंडलिक व धैर्यशील माने यांचा आहे. संजय मंडलिक यांनी पाच वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविली; पण त्यांना मागीलवेळी यश आले नाही. दुसऱ्या प्रयत्नात मात्र ते सेनेसोबत एकनिष्ठ राहिल्याने उमेदवारी आणि विजय दोन्ही मिळविता आले. धैर्यशील माने हे दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेत आले आणि विजयी झाले. आयातीत उमेदवार असतानाही पहिल्याच प्रयत्नात विजयाचा गुलाल उधळून आयातीत उमेदवाराच्या पराभवाची मालिका माने यांनी खंडित केली.

कोल्हापूर मतदारसंघ

वर्ष         उमेदवार                                 मिळालेली मते          टक्केवारी
१९९१     रामभाऊ फाळके                       ७५,१७७                     १८ टक्के
१९९६     रमेश देव                                 १, ६८, ४१४                 ३१.२५
१९९८     विक्रमसिंह घाटगे                    ३,0,६३५३                  ४३
१९९९     मेजर शिवाजीराव पाटील         १,६३,८६६                  २१.१५
२00४    धनंजय महाडिक                     ३, ८७,१६९                  ४८
२00९    विजय देवणे                            १,७२, ८२२                 १७
२0१४   संजय मंडलिक                         ५,७४,४0६                  ४६
२0१९   संजय मंडलिक                         ७,४९, 0८५                ५६.३५

हातकणंगले मतदारसंघ

वर्ष              उमेदवार                           मिळालेली मते            टक्केवारी
१९९८          निवेदिता माने                    ३,३२,६२३                      ४५.४१ 
१९९९         पुंडलीक जाधव                    १00६९७                        १२.४२ 
२00४         डॉ. संजय पाटील                ३,२१,२२३                        ४१ 
२00९         रघुनाथदादा पाटील             ५५, 0५0                       ५.६२ 
२0१९         धैर्यशील माने                       ५,८५,७७६                     ४७.0२
 

 

Web Title: Shiv Sena's votes increased in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.