जेष्ठ मूर्तीकार, चित्रकार के. आर. कुंभार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 03:30 PM2020-08-20T15:30:49+5:302020-08-20T15:33:19+5:30

चित्रकारिता, पोस्टर्स, मूर्तिकला अशा कलांमध्ये मुक्त मुशाफिरी आणि सर्जनशील निर्मिती करणारे ज्येष्ठ चित्रकार, मूर्तिकार के. आर. कुंभार (वय ८१) यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने कोल्हापूर स्कूल परंपरेतील महत्त्वाचा तारा निखळला आणि के. आर.युगाचा अंत झाला.

Senior Sculptor, Painter K. R. Potter dies | जेष्ठ मूर्तीकार, चित्रकार के. आर. कुंभार यांचे निधन

जेष्ठ मूर्तीकार, चित्रकार के. आर. कुंभार यांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्देजेष्ठ मूर्तीकार, चित्रकार के. आर. कुंभार यांचे निधनकोल्हापूर स्कूल परंपरेतील तारा निखळला

कोल्हापूर : चित्रकारिता, पोस्टर्स, मूर्तिकला अशा कलांमध्ये मुक्त मुशाफिरी आणि सर्जनशील निर्मिती करणारे ज्येष्ठ चित्रकार, मूर्तिकार के. आर. कुंभार (वय ८१) यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने कोल्हापूर स्कूल परंपरेतील महत्त्वाचा तारा निखळला आणि के. आर.युगाचा अंत झाला. त्यांनी कलापूर बिरूदावलीत आपले मोलाचे योगदान दिले. गणेशोत्सव दोन दिवसांवर आला असतानाच मूर्ती करणारा हा कसबी कलावंत देवाला प्रिय झाला.

गेल्या चार-पाच दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र खासगी दवाखान्यात उपचार घेत असताना बुधवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुले उदय कुंभार, राजेंद्र कुंभार, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

के. आर. कुंभार यांचे पूर्ण नाव कृष्णात राजाराम कुंभार; पण त्यांची ओळख के. आर. अण्णा या नावानेच झाली होती. कुटुंबाचा मूर्ती बनवण्याचा परंपरागत व्यवसाय. वयाच्या सातव्या वर्षापासून ते मूर्ती बनवायचे. यातून त्यांना चित्रकलेची आवड निर्माण झाली. आईसोबत मूर्ती, चुली बनवून ते विकून यायचे आणि मिळणाऱ्या पैशातून ते चित्रकलेचे साहित्य विकत घ्यायचे.

एक कलाकार म्हणून त्यांना आईने त्यांना घडवले. शास्त्रशुद्ध शिक्षणासाठी कलामंदिरमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी टी. के. वडणगेकर व गणपतराव वडणगेकर हे संस्थेचे काम पाहायचे. के. आर. अण्णांचे चित्रकलेतील कौशल्य बघून त्यांनी त्यांनी त्यांना एकाच वर्षी तीन परीक्षा द्यायला लावल्या आणि त्यात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. विद्यार्थिदशेत असतानाच त्यांनी सलग तीन वर्षे व्यक्तिचित्रांसाठी राज्य पुरस्कार मिळवला. पुढे डिप्लोमा केल्यानंतर काही काळ जी. कांबळे यांच्याकडे सिनेपोस्टर्स बनवण्यास सुरुवात केली.

इंदिरा गांधी ते राजीव गांधी यांच्यापर्यंतच्या विविध पक्षांच्या प्रचाराचे फलक त्यांनी बनवले. ॲड. गोविंद पानसरे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार असताना त्यांच्या प्रचाराचे पोस्टर के. आर. यांनीच रंगवले; जे शिवाजी चौकात झळकले होते.

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे भव्य तैलचित्रही त्यांनी बनवले. आजवर त्यांच्या चित्रांची नवी दिल्लीच्या महाराष्ट्र महोत्सव, गोव्यातील कला अकादमी, गुलमोहर आर्ट गॅलरी, शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शने भरली आहेत.

सिनेपोस्टर्समध्ये काम

जी. कांबळे यांच्याकडे सिनेपोस्टर्स बनवण्याचे काम शिकल्यानंतर ते मुंबईला गेले. तेथे व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत सेहरा ते अशी ही बनवाबनवी अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांची कामे केली. राजकपूर यांच्या आर. के, स्टुडिओ, देवानंद, बी. आर. चोप्रा, भालजी पेंढारकर, अनंत माने, सचिन पिळगावकर, महेश कोठारे अशा नावाजलेल्या निर्माता-दिग्दर्शकांच्या चित्रपटांचे पोस्टर्स त्यांनी बनवले. यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री असताना १९६२ साली शिवाजी पार्कमधील त्यांच्या सभेच्या बॅकग्राऊंड पोस्टरची जबाबदारी व्ही. शांताराम यांच्याकडे होती. ४० बाय ३०० चे भव्य पोस्टर के. आर. यांनी स्टुडिओला गुंडाळून एस. विलास यांच्या साहाय्याने बनवले होते.

गणेशमूर्तींमधील पायोनिअर

के. आर. कुंभार यांचा आकर्षक गणेशमूर्ती बनवण्यात हातखंडा होता. कोल्हापुरात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बनवण्याची सुरुवात त्यांनी केली. १९६४ मध्ये त्यांनी चार फूट उंचीची बैठी गणेशमूर्ती साकारली होती, जी पाहण्यासाठी जनसागर लोटला होता. वन पीस मूर्ती, वेस्ट कट मोल्ड पद्धतीने त्यांनी गणेशमूर्ती साकारल्या. पोटल्या गणपतीची मूर्ती ही त्यांची खासियत.

गणपतीचे डोळे तर ते अतिशय रेखीव कोरायचे. अगदी चार दिवसांपूर्वीपर्यंत त्यांनी मंडळांच्या गणेशमूर्तींचे डोळ्यांचे काम पूर्ण केले. शाहूपुरी कुंभार गल्लीत एक गणपतीचे मंदिर असावे, अशी येथील नागरिकांची इच्छा होती. म्हणून त्यांनी व्हाईट सिमेंटमध्ये पंचमुखी व दशभूजा असलेली गणेशमूर्ती बनवून प्रतिष्ठापित केली.
 

Web Title: Senior Sculptor, Painter K. R. Potter dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.