Rainy Break: The pace of farming, the cloudy atmosphere throughout the day, and sporadic show | पावसाची विश्रांती : शेतीकामांना वेग, दिवसभर ढगाळ वातावरण, तुरळक सरी
पावसाची विश्रांती : शेतीकामांना वेग, दिवसभर ढगाळ वातावरण, तुरळक सरी

ठळक मुद्देपावसाची विश्रांती : शेतीकामांना वेगदिवसभर ढगाळ वातावरण, तुरळक सरी

कोल्हापूर : गेले चार दिवस दमदार हजेरी लावलेल्या पूर्वमोसमी पावसाने शुक्रवारी (दि. १४) पूर्णपणे उघडीप दिली. काही ठिकाणी तुरळक सरीही कोसळल्या.

दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने हवेत उष्मा जाणवत होता. पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने ऊन पडले असतानाही शेतकऱ्यांनी पेरणी आटोपण्यावर भर दिला. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून ऊन झेलतच पेरणीत मग्न असल्याचे चित्र शिवारात दिसत होते. बियाणे, खते, औषधांच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवरही झुंबड उडाल्याचे चित्र होते.

जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाने दमदार हजेरी लावली. गुरुवारी दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली, तर पुन्हा रात्री पाऊस बरसला. शुक्रवारी सकाळीदेखील किरकोळ सरी कोसळल्या; पण त्यानंतर ऊन आणि ढग यांचा लपंडाव दिवसभर सुरू राहिला. आभाळ भरून येत होते; पण पाऊस पडत नव्हता. हवेत उष्माही जाणवत होता, पण वारे सुटले असल्याने त्याची तीव्रता जाणवत नव्हती.

दरम्यान, गेले चार दिवस जिल्ह्यात पावसाने हजेरी लावणाऱ्या होरपळणाऱ्या ऊस पिकाला जीवदान मिळाले आहे. आता ऊस पिकाची वाढ वेगाने होणार आहे. चांगला पाऊस झाल्याने उसातील पाला काढण्यासह शेवटचा खताचा मिरगी डोस देण्याची लगबगही वाढली आहे.

 

 


Web Title: Rainy Break: The pace of farming, the cloudy atmosphere throughout the day, and sporadic show
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.