Rain in Kolhapur: कोल्हापुरात पावसाची रिपरिप सुरुच, शेती कामांना गती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 01:14 PM2022-05-20T13:14:42+5:302022-05-20T13:15:18+5:30

शहरात पावसाने जशी त्रेधातिरपीट उडवली तशीच ती ग्रामीण भागातही उडवली. मात्र, या पावसामुळे खरिपाच्या मशागती व पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.

Rains continue in Kolhapur, speed up agricultural work | Rain in Kolhapur: कोल्हापुरात पावसाची रिपरिप सुरुच, शेती कामांना गती

Rain in Kolhapur: कोल्हापुरात पावसाची रिपरिप सुरुच, शेती कामांना गती

googlenewsNext

कोल्हापूर : जोरदार वारे आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने काल, गुरुवारी संध्याकाळी कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला तासभर झोडपून काढले. काल सायंकाळपासून सुरु झालेल्या पावसाची आजही रिपरिप सुरुच आहे. या पावसाने मात्र उष्म्यापासून सुटका केली असून, शेती कामांनाही गती आणली आहे.

दोन दिवस वादळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. गुरुवारी पहिल्यादिवशीच अंदाज खरा ठरला. दरम्यान, दिवसभर आभाळ काळ्या ढगांनी भरलेलेच होते. संध्याकाळी पाचच्यासुमारास जास्तच काळवंडून आले, वारे सुटले आणि सहा वाजता जोरदार पाऊस सुरू झाला. आलेल्या या सरीमुळे लोकांची पळापळ झाली. आडोसा मिळेल तिथे लोक थांबले. पावसामुळे शहरात पाण्याचे लोट वाहू लागले. बऱ्याच सखल भागांना तळ्याचे स्वरूप आले. शहरात पावसाने जशी त्रेधातिरपीट उडवली तशीच ती ग्रामीण भागातही उडवली. या पावसामुळे खरिपाच्या मशागती व पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.

भाताच्या पेरण्या वेगावणार

धूळवाफ पेरण्यासाठी तर हा पाऊस खूपच गरजेचा आणि उपयुक्त आहे. आता भाताच्या पेरण्या वेगावणार आहेत. शिवाय सोयाबीन टोकणच्या कामांनाही गती येणार आहे. पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असला, तरी सध्या काढणी सुरू असलेल्या उन्हाळी पिकांचे मात्र नुकसान झाले आहे. भात, सोयाबीनच्या काढणीत व्यत्यय आला आहे. सध्या जनावरांच्या वर्षभरासाठीच्या वाळल्या वैरणीच्या बेडमी रचण्याचे काम सुरू होते. अचानक आलेल्या या पावसाने या कामाचाही खोळंबा केला आहे

मान्सूनची चाहूल

अंदमानात मान्सून दाखल झाला आहे. केरळला तो २७ मे पर्यंत दाखल होणार आहे. कोकण व कोल्हापुरात तो ३ जूनपर्यंत येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

आजही पाऊस बरसणार

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज शुक्रवारीदेखील वादळी पाऊस बरसणार आहे. पुढील सोमवारपर्यंत जिल्हयात अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे.

Web Title: Rains continue in Kolhapur, speed up agricultural work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.