कोल्हापुरातील मराठा आंदोलन स्थगित : मंत्री उपसमितीची शिष्टाई यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 01:10 AM2018-09-02T01:10:33+5:302018-09-02T01:11:59+5:30

मराठा आरक्षणाबाबतची वैधानिक कार्यवाही नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे २२ मागण्यांचे लेखी आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाच्या उपसमितीने आंदोलकांना दिले. त्यामुळे गेले ४२ दिवस कोल्हापुरात सुरू असलेले सकल मराठा समाजाचे आंदोलन स्थगित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शनिवारी घेण्यात आला.

 The postponement of the Maratha movement in Kolhapur: The success of the minister's sub-committee is successful | कोल्हापुरातील मराठा आंदोलन स्थगित : मंत्री उपसमितीची शिष्टाई यशस्वी

कोल्हापुरातील मराठा आंदोलन स्थगित : मंत्री उपसमितीची शिष्टाई यशस्वी

Next
ठळक मुद्दे२२ मागण्यांचे लेखी आश्वासन : नोव्हेंबरची ‘डेडलाईन’

कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबतची वैधानिक कार्यवाही नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे २२ मागण्यांचे लेखी आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाच्या उपसमितीने आंदोलकांना दिले. त्यामुळे गेले ४२ दिवस कोल्हापुरात सुरू असलेले सकल मराठा समाजाचे आंदोलन स्थगित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शनिवारी घेण्यात आला.
दरम्यान, मंत्रिगटाने शाहू जन्मस्थळावर येऊन लेखी आश्वासन दिल्याने शाहू छत्रपतींच्या विनंतीला मान देऊन आंदोलन स्थगित केल्याची माहिती आंदोलकांनी पत्रकार परिषदेत दिली;

पण सरकारने नोव्हेंबरपर्यंत मागण्यांची पूर्तता न केल्यास १ डिसेंबरला पुन्हा मुंबईवर वाहन मोर्चा काढून सरकारला सळो की पळो करून सोडू, असाही इशारा यावेळी देण्यात आला. शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळनंतरच कोल्हापुरातील आंदोलन स्थगित करण्याबाबत राजकीय क्षेत्रातून वेगवान हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनेक सामाजिक क्षेत्रांतील नेत्यांना पुढे करून या आंदोलनाबाबत फोनवरून चर्चा केली. त्यानंतर शनिवारी दिवसभर आंदोलकांच्या समन्वयकांशी गोपनीय चर्चा, बैठका घेण्यात आल्या.

त्यामध्ये शाहू छत्रपती यांचाही पुढाकार होता. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात सुमारे तासभर मंत्रिगटाच्या उपसमितीची बैठक घेतली. यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख तसेच पाच आमदारांची सुमारे तासभर बैठक बंद खोलीत झाली. त्यानंतर या मंत्रिगटाच्या उपसमितीने कसबा बावड्यातील लक्ष्मीविलास पॅलेस या शाहू जन्मस्थळी येऊन आंदोलकांना लेखी आश्वासन दिले. त्यानंतरच हे आंदोलन स्थगित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

सकल मराठा समाजाच्यावतीने गेले ४२ दिवस कोल्हापुरात दसरा चौकात ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू होते. दिवसेंदिवस त्या आंदोलनाची तीव्रता वाढत गेली होती. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी आमंत्रण दिल्यानंतरही शाहू छत्रपती यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर मुंबईत चर्चेसाठी न जाण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलनाची धग अधिकच वाढत गेली. आंदोलनाचे लोण संपूर्ण महाराष्टÑभर पसरू लागले. त्यातच जिल्ह्यातील गावागावांतून ही धग वाढत होती. त्यानंतर मुंबईवर वाहन मोर्चा, गोलमेज परिषद, आदी घेण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला होता. शासनाने त्याचा धसका घेतल्याने शनिवारी काहींची शिष्टाई यशस्वी ठरली आणि दसरा चौक, शिवाजी चौक येथे सुरू असलेले ठिय्या आंदोलन स्थगित झाले.

मराठा आरक्षणप्रश्नी मंगळवारी मुंबईकडे निघणाऱ्या वाहन मोर्चाचा धसका शासनाने घेतला. त्यानंतरच खरे चर्चेची खलबते सुरू झाले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनीही हे आंदोलन स्थगित करण्याबाबत चर्चेत सहभाग घेतला. शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळनंतर समाजातील काही नामवंतांशी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन कसे थांबविता येईल याबाबत सल्ला घेतला. त्यानंतरच खरी शिष्टाई सुरू झाली. सायंकाळीच मंत्री पाटील यांनी सिंधुदुर्गमध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी भोजनावेळी आंदोलन स्थगितीबाबत चर्चा केली.

शनिवारी सकाळी मंत्री पाटील यांनी मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक व दिलीप देसाई यांच्याशी फोनवरून चर्चा केली; तर राणे यांनी ‘स्वाभिमान’चे सचिन तोडकर यांच्याशी चर्चा केली; तर मंत्री एकनाथ नाईक यांनी शिवसेनेचे हर्षल सुर्वे व इंद्रजित सावंत यांच्याशीही चर्चा केली. त्यानंतर हा प्रश्न शाहू छत्रपती यांच्या पुढाकाराने सोडवावा, अशी विनंती पालकमंत्री पाटील यांनी केली. त्यानुसार सकाळी दिलीप देसाई, वसंतराव मुळीक, हर्षल सुर्वे, तोडकर, स्वप्निल पार्टे, सावंत यांनी न्यू पॅलेसवर शाहू छत्रपती आणि इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ‘पुढारी’चे मुख्य संपादक
डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशीही सकारात्मक चर्चा केली.

दुपारी चार वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर आल्यानंतर मंत्रिगट उपसमितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी शासकीय विश्रामगृहाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सुमारे तासभर ही बैठक बंद खोलीत झाली. या बैठकीस, मंत्री पाटील यांच्यासह मंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, ‘पुढारी’चे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आम. राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, डॉ. सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर तसेच आंदोलनातील समन्वयक दिलीप देसाई, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, सचिन तोडकर, हर्षल सुर्वे, स्वप्निल पार्टे, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, उपस्थित होते. बैठकीनंतर सर्वांनी एकत्रित कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू जन्मस्थळी येऊन आंदोलन स्थगितीची घोषणा केली.

सरकारच्या लेखी आश्वासनाने आंदोलन स्थगित
मुख्यमंत्र्यांनी ५ आॅगस्ट २०१८ ला मराठा आरक्षण वैधानिक कार्यवाही नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल, तसेच वेळ पडली तर विशेष अधिवेशन बोलावून कार्यवाही पूर्ण करण्याचे जाहीर केले आहे. विविध आंदोलनांमध्ये पोलिसांवर हल्ला असे गुन्हे वगळून इतर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील. सारथी संस्थेचे उपकेंद्र कोल्हापुरात व्हावे यासाठी सरकार सहमत आहे. ‘ओबीसी’ विद्यार्थ्यांना मिळणाºया सवलती मराठा विद्यार्थ्यांना दिल्या जातील. शाहू मिलच्या जागेत आंतरराष्टÑीय दर्जाचे स्मारक केले जाईल. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाची मागणी सरकारला मान्य आहे. यासह २२ मागण्यांबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या सहीने लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन सकल मराठा समाज ठोक मोर्चा आंदोलकांच्या संयोजकांनी स्थगित केले.

पालकमंत्र्यांनी मानले आंदोलकांचे आभार
मंत्री गटाच्या उपसमितीने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सकल मराठा समाज ठोक मोर्चाच्या आंदोलकांनी दसरा चौकात सुरू केलेले बेमुदत ठिय्या आंदोलन व मुंबईत होणारा वाहन मोर्चा स्थगित केला. आंदोलकांनी हा निर्णय घेऊन सकारात्मक विचार केल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शाहू जन्मस्थळी या आंदोलकांचे जाहीर आभार मानले.

शिवाजी, दसरा चौकातील आंदोलन स्थगित
मंत्रिगटाच्या उपसमितीने लेखी आश्वासन दिल्याने शिवाजी चौक येथे सकल मराठा शौर्यपीठातर्फे १८ दिवस सुरू असलेले ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात प्रसाद जाधव, उदय लाड, राजेंद्र चव्हाण, राजू जाधव, जयदीप शेळके, राहुल इंगवले, दीपा पाटील, अ‍ॅड. चारूलता चव्हाण, गायत्री राऊत, आदी सहभागी झाले होते. याशिवाय दसरा चौकातीलही सकल मराठा समाज ठोक मोर्चाच्या वतीने गेले ४२ दिवस सुरू असलेले ठिय्या आंदोलनही स्थगित करण्यात आले.

गोलमेज परिषद, वाहन मोर्चा स्थगित
मराठा आंदोलन स्थगित झाल्याने शौर्यपीठ आणि शिवाजी पेठ यांच्यावतीने आज, रविवारी शिवाजी तरुण मंडळामध्ये होणारी ‘गोलमेज’ परिषद रद्द करण्यात आली आहे. तसेच सकल मराठा ठोक मोर्चाच्या वतीने मंगळवारी (दि. ४) मुंबईत होणारा वाहन मोर्चाही स्थगित करण्यात आला आहे.

 

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार : पालकमंत्री
दिल्ली, हैदराबाद व कर्नाटक या ठिकाणी आरक्षणासंदर्भात अभ्यास सुरू आहे. त्यामुळे मराठा समाजाने सरकारवर विश्वास ठेवावा, की मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यास सरकार सकारात्मक आहे. दसरा चौकात सुरू असलेल्या आंदोलनातून काही मागण्या समोर आल्या. आजच्या बैठकीत सकल मराठा समाजाच्या आंदोलनाचे प्रतिनिधी यांच्यासोबत मागण्यांबाबत सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर मंत्री समितीने आंदोलकांना आंदोलन स्थगित करण्याची विनंती करून लेखी आश्वासन दिले. तसेच आज, रविवारपासून सणाचे दिवस सुरू होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आंदोलकांनी हे आंदोलन स्थगित केले. त्याबद्दल त्यांचे आभार.
- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

तर पुन्हा आंदोलन
सरकारने लेखी आश्वासन दिल्याने सकल मराठा समाजातर्फे सुरू करण्यात आलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे; परंतु सरकारने नोव्हेंबरपर्यंत आरक्षणासह इतर मागण्या मान्य न केल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल. - वसंतराव मुळीक, समन्वयक,
सकल मराठा समाज ठोक मोर्चा

लेखी आश्वासनामुळे आंदोलन स्थगित नाही
सरकारने लेखी आश्वासन दिल्यामुळे आम्ही हे आंदोलन स्थगित केले नसून, शाहू छत्रपती व डॉ. जयसिंगराव पवार यांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन स्थगित

Web Title:  The postponement of the Maratha movement in Kolhapur: The success of the minister's sub-committee is successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.