आवाडे गटाच्या राजकारणाने समीकरणे बदलली : ताराराणी आघाडी स्वतंत्रपणे आखाड्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:17 AM2019-09-24T00:17:17+5:302019-09-24T00:19:02+5:30

आवाडे यांच्या जुन्या मतदारसंघातील १३ गावांचा समावेश हातकणंगले राखीव मतदारसंघामध्ये झाल्यापासून या मतदारसंघाचे राजकारणच बदलून गेले आहे.

The politics of the Awade group changed the equations | आवाडे गटाच्या राजकारणाने समीकरणे बदलली : ताराराणी आघाडी स्वतंत्रपणे आखाड्यात?

आवाडे गटाच्या राजकारणाने समीकरणे बदलली : ताराराणी आघाडी स्वतंत्रपणे आखाड्यात?

Next
ठळक मुद्देकाँग्रेसअंतर्गत सत्तासंघर्षामध्ये आवळे -आवाडे गटामध्ये २००४ पासून राजकीय संघर्ष उफाळून आला होता.

दत्ता बिडकर।
हातकणंगले : हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघामध्ये आवाडे गटाच्या बदलत्या राजकीय निर्णयाने काँग्रेसबरोबर शिवसेनेचेही मोठे नुकसान झाले आहे. २००४ पासून काँग्रेसच्या आवळे गटाला असहकार्य करणारा आवाडे गट शिवसेनेच्या सुजित मिणचेकर यांना नेहमीच सहकार्य करीत आल्यामुळे दोन वेळा या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा झेंडा फडकला.
यावेळी आवाडे गट ताराराणी आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्यामुळे शिवसेनेच्या सुजित मिणचेकर गटात चिंता वाढली असून, या मतदारसंघामध्ये अधिकच रंगत येणार आहे.

हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघामध्ये दररोज वेगवेगळे संदर्भ समोर येत आहेत. प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सोडून पक्षाला रामराम ठोकल्याने तालुक्यातील राजकारणाला नवी कलाटणी मिळाली आहे. आवाडे यांच्या जुन्या मतदारसंघातील १३ गावांचा समावेश हातकणंगले राखीव मतदारसंघामध्ये झाल्यापासून या मतदारसंघाचे राजकारणच बदलून गेले आहे. या १३ गावांबरोबरच जवाहर साखर कारखाना कार्यक्षेत्र आणि आवाडे समूहाचे इतर लहान-मोठे उद्योग-व्यवसाय याच मतदारसंघात असल्याने आवाडे गटाचा हातकणंगलेत दबदबा आहे. आवाडे गटाच्या चोरीछुपे पाठिंब्यावरच या मतदारसंघाची समीकरणे प्रत्येकवेळी बदलली आहेत. या निवडणुकीमध्ये आवाडे गट ताराराणी आघाडीच्या माध्यमातून
उघडपणे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने त्यांच्या एकगठ्ठा मताचा फटका काँग्रेस आणि शिवसेनेला बसणार आहे.
काँग्रेसअंतर्गत सत्तासंघर्षामध्ये आवळे -आवाडे गटामध्ये २००४ पासून राजकीय संघर्ष उफाळून आला होता.

२००४ च्या निवडणुकीमध्ये आवाडे गटाने जनसुराज्यच्या राजीव आवळे यांना छुपा पाठिंबा देऊन तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री जयवंतराव आवळे यांचा पराभव केला. २००९ च्या निवडणुकीच्या राजकीय साठमारीमध्ये आवाडे गटाचे कार्यकर्ते जनसुराज्य आणि शिवसेनेकडे विभागले गेले आणि काँग्रेसचे राजू जयवंत आवळे फक्त २००० मतांनी पराभूत झाले.
दोन आवळेंच्या भाऊबंदकीमध्ये शिवसेनेचे सुजित मिणचेकर निवडून आले. २०१४च्या निर्णायक निवडणुकीमध्ये पुन्हा आवाडे गटाने काँग्रेस पक्षाशी फारकत घेत आपले सर्व कार्यकर्ते चोरीछुपे शिवसेनेच्या पाठीशी उभे केले आणि जयवंतराव आवळेंचा पराभव झाला.

आवाडे गटाच्या सहकार्यामुळे शिवसेनेचे सुजित मिणचेकर दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले.
आवाडे गटाकडून हातकणंगले मतदारसंघामध्ये लढण्यासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे दोन माजी समाजकल्याण सभापती किरण कांबळे (हुपरी), शामराव गायकवाड (रुकडी), तसेच गतवेळी राष्ट्रवादीकडून लढलेले दत्ता घाटगे (मिणचे) यांच्यासह ऐनवेळी वेगळेच नाव समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आवाडे
गटाच्या लढण्याने या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचे मोठे नुकसान होणार असून, या मतदारसंघाचे चित्र बदलणार आहे, हे मात्र नक्की आहे.

ताकद दाखवावी लागणार
विधानसभेमध्ये आवाडे गटाने काँग्रेसशी फारकत घेऊन ताराराणी आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेकडे जाणारी मते यावेळी थांबली आहेत. आवाडे गटाच्या अस्तित्वासाठी यावेळी त्यांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे.

Web Title: The politics of the Awade group changed the equations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.