Pits are married to the municipal administration | खड्ड्यांचे लग्न महापालिका प्रशासनाशी--शिवसेनेचे शिवाजी पेठेत अनोख्या पद्धतीने आंदोलन महापालिका प्रशासनाचा निषेध
शिवसेनेच्या वतीने रविवारी शिवाजी पेठेत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. सरदार तालीम ते शिवाजी मंदिर या मार्गावरील खड्ड्यांचे लग्न महापालिका प्रशासनाशी लावण्यात आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, नगरसेविका तेजस्विनी इंगवले, दीपक गौड, यशवंत पोवार, राहुल इंगवले, प्रकाश सरनाईक परिसरातील नागरिक उपस्थित होते.

ठळक मुद्देमहापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी अशा प्रकारे अभिनव आंदोलन करत आहे.

कोल्हापूर : शहरामध्ये खड्ड्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नागरिक हैरान झाले आहेत. महापालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने शिवसेनेच्या वतीने रविवारी अनोखे आंदोलन केले. शिवाजी पेठेतील सरदार तालीम ते शिवाजी मंदिर या मार्गावरील खड्ड्याला रांगोळी काढून महापालिका प्रशासन, सत्ताधारी यांच्याशी प्रतिकात्मक लग्न लावण्यात आले.

शहराध्यक्ष रविकिरण इंगवले म्हणाले, ‘शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या परिस्थितीला महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी जबाबदार आहेत. त्यांना जबाबदारी पार पाडता येत नसेल, तर त्यांनी खुर्ची सोडावी. शिवसेना स्टंट करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे; मात्र नागरिकांच्या हितासाठी स्टंटबाजी सुरूच राहील. महापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी अशा प्रकारे अभिनव आंदोलन करत आहे.

दीपक गौड म्हणाले, ‘खराब रस्त्यामुळे नागरिक शहर सोडून जाण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत; मात्र प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नाही. तातडीचा पर्याय म्हणून महापालिका पॅचवर्क करत आहे; मात्र पुन्हा रस्ते खराब होत आहेत; त्यामुळे नव्यानेच रस्ते करणे योग्य होणार आहे. यावेळी नगरसेविका तेजस्विनी इंगवले, स्नेहा इंगवले, सविता चौगुले, निकिता इंगवले, मंगल चौगुले, नयना माने, उमा कारेकर, तात्या साळोखे, सागर शिपेकर, बाळासाहेब भोसले, उमेश जाधव, संतोष यादव, आबाजी जगदाळे, राहुल इंगवले, विक्रम पाटील, सुशांत गायकवाड, प्रकाश सरनाईक, राकेश माने, आदी उपस्थित होते.

रस्ते शोधण्याची वेळ
खराब रस्त्यामध्ये मुरूम टाकल्याने नागरिकांना श्वसनाचे आणि मणक्याचे आजार वाढले आहेत. शहरामध्ये एकही असा रस्ता नाही तेथे खड्डे नाहीत; त्यामुळे नागरिकांना रस्ते शोधण्याची वेळ आली आहे. असे असतानाही महापालिका प्रशासनाचे डोळे उघडत नाहीत. याउलट तुटपुंजे एक कोटी ६२ लाख रुपये मंजूर करून जनतेची चेष्टा सुरू केली आहे. तातडीने रस्ते केले नाही, तर उग्र आंदोलन करू, असा इशारा यशवंत पोवार यांनी दिला.
-
जनतेने निष्क्रिय आमदार दिला
माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी १0 वर्षांत शहराचा विकास केला; मात्र जनतेचे रक्षण करण्याचे काम करणाऱ्याला घरी बसविले. काही लोकांमुळे त्यांचा पराभव झाला. त्यांच्यामुळे कोल्हापूर उत्तरला निष्क्रिय आमदार मिळाला आहे. पुढील पाच वर्षांत जनतेला नक्कीच याचा पश्चाताप होईल, असे रविकिरण इंगवले यांनी सांगितले, तसेच राज्याचा विकास भाजप-शिवसेनाच करू शकते, असेही ते म्हणाले.
 

 

Web Title: Pits are married to the municipal administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.