समीर देशपांडे : लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्याचे आरोग्य केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय येथे पार्किंग व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला आहे. यामध्ये सुधारणा केली नाही तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये या ठिकाणी वाहतूक करताना अडचणी उद्भवणार हे निश्चित. या आवारामध्ये १३ चहा गाडे बेकायदेशीररीत्या असून, याबाबत सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
भंडारा येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी सीपीआरला भेट दिली असता पार्किंग व्यवस्थेवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले. प्रवेशद्वारावर महाराष्ट्र पोलीस बलाचे सुरक्षा रक्षक असल्यामुळे या ठिकाणी वाहनांची फारशी गर्दी नसते. खासगी वाहनांना आत सोडताना येथे चौकशीही केली जाते. मात्र, पुढे पुढे आत गेले की, चारचाकी आणि दुचाकी वाट्टेल तशा लावल्याचे चित्र दिसून येते.
या ठिकाणी अस्ताव्यस्त पार्किंग होत असल्याने वाहतूक पोलीस शाखेने येेथे पार्किंगचे पट्टेही ओढले आहेत; परंतु सध्या या ठिकाणी पट्ट्यांबाहेर लावल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाई होत नसल्याने अनेकजण बेफिकीर झाल्याचे दिसून येते. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयासमोरून उजव्या बाजूच्या पहिल्या वळणावर एकाने चारचाकी चुकीच्या पद्धतीने लावली होती. तर पुढच्या वळणावर खडीच्या ढिगाशेजारी एकाने जीप लावली होती. जुन्या अपघात विभागाकडे जातानाही चारचाकी लावण्याला मनाई असताना या ठिकाणीही दोन गाड्या लावण्यात आल्या होत्या.
आतील विविध विभागांसमोरही दुचाकी अस्ताव्यस्त लावण्यात आल्याचे चित्र दिसून आले. एड्स नियंत्रण कक्षाच्या आवारात अनेक दुचाकी याच पद्धतीने लावण्यात आल्या होत्या. सीपीआरच्या परिसरात १३ बेकायदेशीर चहा गाडे सुरू आहेत. रुग्णांना आणि नातेवाइकांच्या सोयीसाठी चहा, नाश्ता, जेवणाची सोय उपलब्ध हाेणे आवश्यक आहे. मात्र, या १३ गाड्यांना कोणीही परवानगी दिलेली नाही. याने लावला म्हणून त्याने या तत्त्वावर हे गाडे लागले आहेत. हे अतिक्रमण झालेले गाडे काढण्याच्या जेव्हा नोटीस काढण्यात आली तेव्हा गाडेधारक न्यायालयात गेले. याप्रकरणी २०१७ पासून सुनावणी सुरू आहे. अजूनही निकाल लागलेला नाही.
चौकट
सीपीआरसाठी एकच प्रवेशद्वार
सध्या सीपीआरसाठी एकच प्रवेशद्वार सुरू आहे. नियंत्रणासाठी अशा पद्धतीने एकच प्रवेशद्वार असणे सोयीचे आहे, असे सीपीआर प्रशासनाचे म्हणणे आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर हे प्रवेशद्वार तातडीने उघडण्यात येते, असे सांगण्यात आले.
कोट
सीपीआर आवारातील पार्किंग व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी अनेक निर्णय याआधी घेतले आहेत. आता पुन्हा याबाबत कडक कारवाई सुरू करण्यात येईल. शासकीय व खासगी सुरक्षा व्यवस्थेमुळे या ठिकाणी चांगली शिस्त लागली आहे. यातूनही ज्या त्रुटी असतील त्या दूर करू.
डॉ. विजय बरगे, वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर कोल्हापूर
१२०१२०२० कोल सीपीआर ०१/०२/०३/०४/०५
कोल्हापुरातील सीपीआरच्या आवारात पार्किंगसाठी पट्टे आखले असतानाही अनेकजणांनी वाहने या पट्ट्यांबाहेर लावल्याचे मंगळवारी दिसून आले. तसेच अनेक ठिकाणी दुचाकी गाड्याही अस्ताव्यस्त लावण्यात आल्या आहेत. नवजात शिशू विभागासमोर तर रुग्णवाहिकाही नीट जाणार नाही, अशी वाहने लावण्यात आली आहेत. (सर्व छाया.. नसीर अत्तार